पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील उद्योग संक्रमणाच्या आव्हानांवर अद्याप तोडगा निघालेला नाही - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
Posted On:
10 DEC 2023 4:25PM by PIB Mumbai
2019 मध्ये LeadIT चा प्रारंभ झाल्यापासून आंतरराष्ट्रीय अजेंड्यावर उद्योग संक्रमणाने मोठी झेप घेतल्यामुळे जागतिक औद्योगिक परिदृश्यात लक्षणीय बदल झाला आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सांगितले. असे असले तरीही, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील संक्रमणाच्या खऱ्या आव्हानांना अद्याप सामोरे जाणे बाकी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
दुबईतील COP28 शिखर परिषदेत न्याय्य आणि समान उद्योग संक्रमणासाठी भागीदारी या विषयावरील कार्यक्रमात बोलताना भूपेंद्र यादव यांनी या विषयावर सकारात्मक मत नोंदवले. हे आव्हान सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय यंत्रणांद्वारे हाताळले जाऊ शकते. या यंत्रणेने बौद्धिक संपदा अधिकार सारखे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे विकसित देशांकडून विकसनशील देशांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ होऊ शकते, असेही ते म्हणाले.
उद्योग संक्रमण व्यासपीठावरील भारत-स्वीडन संयुक्त घोषणापत्र ही केवळ दोन राष्ट्रांमधील भागीदारी नसून शाश्वत भविष्यासाठी असलेली आघाडी आहे, असे स्वीडनसोबतच्या सहकार्याबाबत बोलताना भूपेंद्र यादव म्हणाले. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याच्या आणि उद्योगांची पर्यावरणाशी सुसंगती साधून भरभराट होत असलेल्या जगाला आकार देण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाचा हा दाखला असल्याचे त्यांनी सांगितले.
भूपेंद्र यादव यांनी भविष्यातील उद्योगाला आकार देण्यासाठी नवोन्मेष, सहयोग आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी भागधारकांना एकत्र काम करण्याचे आवाहनही केले. एक असे उद्योग जगत जे शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी समृद्धी आणणारे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984740)
Visitor Counter : 97