युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया पॅरा गेम्स दरम्यान वाढीव वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा भर

Posted On: 08 DEC 2023 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023

खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दरम्यान खेळाडूंना स्पर्धेच्या संघटनात्मक सहाय्याचा भाग म्हणून सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय पथके  आणि आवश्यक आरोग्य सेवा सुविधांची उपलब्धता यांचा समावेश आहे.

नॅशनल सेंटर ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड रिसर्च (एनसीएसएसआर) ने नवी दिल्ली येथे 10 ते 17 डिसेंबर दरम्यान खेलो इंडिया पॅरा गेम्ससाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिक तैनात केले आहेत.

पॅरा ऍथलीट्सना त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आव्हानांमुळे अनेकदा विशेष आणि संवेदनशील वैद्यकीय सेवेची गरज भासते हे लक्षात घेऊन कोणतीही  अनपेक्षित परिस्थिती उदभवल्यास ती हाताळण्यासाठी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

एनसीएसएसआर क्रीडा शास्त्र  आणि खेळाडूंच्या औषधांवर लक्ष केंद्रित करून प्रमुख क्रीडापटूंच्या दर्जेदार कामगिरीसाठी उच्च स्तरीय संशोधन, शिक्षण आणि नवोन्मेषाला पाठबळ पुरवते.

“सर्व सहभागी पॅरा ऍथलीट्सना सुरक्षितपणे स्पर्धेत खेळण्यासाठी  आणि स्पर्धेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सहाय्य मिळेल यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील खेलो इंडिया विभाग आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने एनसीएसएसआरने  शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत “ अशी माहिती एनसीएसएसआर चे प्रभारी संचालक कर्नल बिभू नायक यांनी दिली आहे.

“खेळाडूंच्या विशिष्ट गरजा आणि आव्हाने लक्षात घेऊन त्यांना लागणाऱ्या विशेष वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत,” असे ते म्हणाले.

वैद्यकीय सुविधांमध्ये खेळाच्या ठिकाणी समर्पित सहाय्यक कर्मचारी ,प्रत्येक ठिकाणच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये पुनरुत्थान कक्ष आणि प्रकृती स्थिर राखण्यासाठी  कक्ष स्थापन करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास त्वरित रुग्णालयात नेण्यासाठी खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या ठिकाणी पुरेशा संख्येने एएलएस आणि बीएलएस रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

तात्काळ वैद्यकीय आपत्कालीन सेवा तसेच इमेजिंग सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एम्स ट्रॉमा सेंटर, लोकनायक जयप्रकाश रुग्णालय , सफदरजंग रुग्णालय येथील स्पोर्ट इंज्युरी सेंटर आणि राम मनोहर लोहिया रुग्णालय यांसारख्या प्रमुख रुग्णालयांची मदत घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास  खेळाडूंसाठी  लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाने 50 खाटांच्या आयसीयू समर्पित सुविधेची व्यवस्था केली आहे.

सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेले वैद्यकीय कर्मचारी कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी  संवेदनशील असून त्यांना  पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पॅरा ऍथलीट्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पौष्टिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या क्रीडा पोषण तज्ञांनी त्यांचा आहार ठरवला  आहे.

वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, मानसोपचार तज्ञ, पोषणतज्ञ  यासह किमान 60 कर्मचारी स्पर्धेदरम्यान तीन ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. जेएलएन स्टेडियम, आयजी स्टेडियम आणि डॉ करणी सिंग शूटिंग रेंज येथे ही स्पर्धा होत आहे.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1984186) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu