शिक्षण मंत्रालय
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) शैक्षणिक वर्ष 2024-2027 साठी मान्यता प्रक्रिया हँडबुक केले प्रकाशित
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2023 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
नवी दिल्लीतील शास्त्री भवनातील पत्र सूचना कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) अध्यक्ष प्रा. टी.जी. सीताराम यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे आणि सदस्य सचिव प्रा. राजीव कुमार यांच्या हस्ते आज शैक्षणिक वर्ष 2024-2027 साठीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) मान्यता प्रक्रिया हँडबुक प्रकाशित करण्यात आले. पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक शमीमा सिद्दीकी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पुढील तीन वर्षांसाठी लागू असणारे मान्यता प्रक्रिया हँडबुक तयार केले आहे, अशी माहिती प्रा. सीताराम यांनी माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना दिली. तांत्रिक आणि व्यवस्थापन कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम चालवण्यासाठी परिषदेकडून मान्यता मिळवताना संस्थांनी कोणत्या प्रक्रियांचे पालन करावे हे या हँडबुकमध्ये विस्तृत स्वरूपात विशद करण्यात आले आहे. प्रा. सीताराम यांनी शिक्षणाची गुणवत्ता, कार्यपद्धतीतील साधेपणा आणि अंमलबजावणीतील पारदर्शकता यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून मान्यता प्रक्रिया हँडबुकमध्ये या वर्षी समाविष्ट केलेल्या सुधारणा आणि तरतुदींवरही प्रकाश टाकला.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने विविध हितधारक आणि तज्ञांकडून मते आणि सूचना तसेच अभिप्राय मिळविण्यासाठी प्रथमच नवीन मान्यता प्रक्रिया हँडबुक (APH) चा मसुदा सार्वजनिक डोमेनमध्ये पोस्ट केला होता, असे त्यांनी सांगितले. विविध हितधारकांकडून 600 हून अधिक सूचना आणि टिप्पण्या प्राप्त झाल्या, ज्यांचे मूल्यमापन तज्ञ समितीने केले आणि अनेक सूचना अंतिम मसुद्यात समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बीसीए आणि बीबीए किंवा बीएमएस अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेच्या नवीन तरतुदीमुळे प्रारुप अभ्यासक्रमाद्वारे चांगली गुणवत्ता तसेच प्रगती, सक्षम, स्वनाथ इत्यादी शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्रता, अटल अकादमीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अध्यापन विकास कार्यक्रमात (एफडीपी) प्राध्यापकांचा सहभाग, गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, प्राध्यापक निधीसाठी संशोधन प्रोत्साहन, विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन सेल उपक्रम, सर्व तांत्रिक पुस्तकांची विनामूल्य उपलब्धता, स्टुडंट्स असेसमेंट पोर्टल (परख) मध्ये प्रवेश, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या इंटर्नशिप आणि प्लेसमेंट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट आणि इंटर्नशिप सुविधा प्रदान करणे शक्य होईल.
2047 पर्यंत भारताला एक तांत्रिक केंद्र बनवण्यासाठी देशातील सर्वांगीण, गुणात्मक, सर्वसमावेशक आणि सुलभ शिक्षणाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद वचनबद्ध आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद एक मार्गदर्शक, सुविधा प्रदान करणारी आणि आपल्या विविध हितधारकांच्या गरजा पूर्ण करणारी यंत्रणा आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1983123)
आगंतुक पटल : 202