विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या वाटचालीत जैव अर्थव्यवस्थेसह नॅनो सायन्सचे लक्षणीय योगदान असेल -  केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


चंदीगडमध्ये मोहाली येथे आयएनएसटी अर्थात अतिसूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था या देशातील पहिल्या नॅनो सायन्स संस्थेतील विद्यार्थी आणि अध्यापकांना जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित, संस्थेच्या भविष्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर दिला भर

Posted On: 03 DEC 2023 4:46PM by PIB Mumbai

 

चंदीगडमध्ये मोहाली येथे आयएनएसटी अर्थात अतिसूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था या देशातील पहिल्या नॅनो सायन्स संस्थेतील विद्यार्थी आणि अध्यापकांना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जिंतेद्र सिंह यांनी संबोधित केले. देशहितासाठी या क्षेत्रात उत्पादने/उपकरणे आणि तंत्रज्ञान विकसित करणे आणि संशोधन करणे यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली असून तिची भविष्यातील भूमिका मोठी असेल असे जितेंद्र सिंह  यावेळी म्हणाले.

भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीत जैव अर्थव्यवस्थेसह  अतिसूक्ष्म विज्ञानाचे  (नॅनो सायन्स) लक्षणीय योगदान असेल, असेही ते म्हणाले.

अतिसूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध आणि झपाट्याने वाढणाऱ्या शाखांमध्ये संशोधन करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्या क्षेत्रांमध्ये कृषी अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण शास्त्र, क्वांटम मटेरिअल्स, डिवाईस भौतिकशास्त्र, अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोफ्लुईडिक्सवर आधारित तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म जैवतंत्रज्ञान या उपशाखांचा समावेश आहे. आयएनएसटी ही केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतली स्वायत्त संशोधन संस्था आहे.

नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीमधील अत्याधुनिक संशोधन हे या संस्थेचे  मुख्य ध्येय आहे असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जागतिक आणि स्थानिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी ऊर्जा, पर्यावरण, कृषी, आरोग्य सेवा, क्वांटम मटेरियल इत्यादी क्षेत्रांच्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनासह ही संस्था संशोधन करते असे ते म्हणाले.

राष्ट्रासाठी नॅनोसायन्स ज्ञान हे आपले ब्रीदवाक्य असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1982140) Visitor Counter : 83