आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पुण्यामधील सशस्त्र सेना दल वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) टेली-मानस सेलची स्थापना

Posted On: 01 DEC 2023 5:59PM by PIB Mumbai

 

पुण्यामधील सशस्त्र सेना दल वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहयोगाने, ‘टेलि-मानस सेलही एक समर्पित सेवा स्थापन करण्यात आली आहे.

या सेलचे (केंद्र) उद्घाटन आज सेना दल प्रमुख, पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हिएसएम जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार इंद्राणी कौशल आणि निम्हान्स (NIMHANS) च्या संचालक डॉ. प्रतिमा मूर्ती, यावेळी उपस्थित होत्या. हा कक्ष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या टेली मेंटल हेल्थ असिस्टन्स (टेली-मानसिक आरोग्य सहाय्य) आणि नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्‍स (सर्व राज्यांमध्ये सेवेचे जाळे) या उपक्रमाचा विस्तार म्हणून काम करेल.

भारताचा राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम, टेली मानसिक आरोग्य सहाय्य आणि नेटवर्किंग अॅक्रॉस स्टेट्स (टेली MANAS) ची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये केली होती, आणि 10 ऑक्टोबर 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस निम्हान्स (NIMHANS) येथे आयोजित जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमात कर्नाटकच्या राज्यपालांनी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची (DMHP) ची डिजिटल शाखा म्हणून त्याचा शुभारंभ केला होता.

प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात टोल-फ्री क्रमांक 14416 द्वारे व्यापक, एकात्मिक आणि सर्वसमावेशक 24 x 7 टेली-मानसिक आरोग्य सुविधा प्रदान करणे, ही टेलि-मानसच्या स्थापनेमागची संकल्पना आहे.

भारतीय लष्कराला वेगळ्या पातळीवरील तणावाचा सामना करावा लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन, सशस्त्र दलाच्या लाभार्थ्यांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित वातावरण, सांस्कृतिक आव्हाने आणि प्रादेशिक संघर्षाशी संबंधित विशिष्ट तणाव, यामुळे सशस्त्र दलांना मानसिक आरोग्य सेवा पुरवताना विशेष दृष्टीकोन आवश्यक ठरतो. सशस्त्र दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची आवश्यकता स्पष्ट झाली असून, त्याची सरकारने दखल घेतली आहे. सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांच्या मानसिक समस्यांचे निराकरण करताना येणाऱ्या विशिष्ट समस्या लक्षात घेऊन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने टेलि-मानस सेलच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सहाय्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

सध्या भारताच्या राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत, 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये, 46 टेलि-मानस सेल कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये टेलि-मानस हेल्पलाइन सुरु झाल्यापासून त्यावर मानसिक आरोग्याशी संबंधित 4 लाख 70 हजाराहून अधिक फोन कॉल्स प्राप्त झाले आहेत, आणि ही हेल्पलाईन दिवसाला 2000 पेक्षा जास्त कॉल्सना प्रतिसाद देत आहे.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981670) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu