माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील लाभार्थींनी साधला पंतप्रधानांशी संवाद
विकसित भारत संकल्प यात्रेमुळे ड्रोन आणि नॅनो युरिया सारखे तंत्रज्ञान लोकप्रिय होईल : नितीन गडकरी
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध : पीयूष गोयल
Posted On:
30 NOV 2023 4:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईतील चेतना कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तरुण आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, आमदार शिरीष चौधरी, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह मुंबई महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई महानगर पालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी पीयूष गोयल म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना कोणताही भेदभाव न करता सगळ्या योजनांचा लाभ मिळत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी सुविधांचा लाभ सर्वांना मिळेल, अशी शासनाची हमी आहे.

कार्यक्रमस्थळी उज्ज्वला गॅस योजना, पीएम-स्वनिधी योजना यांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
“विकसित भारत संकल्प यात्रा सारखे उपक्रम ड्रोनसारखे आधुनिक तंत्रज्ञान काय चमत्कार करू शकते हे लोकांना दाखवेल. “मी नॅनो खतांचा वापर केला आणि एक एकर शेतातून 85 टन उसाचे उत्पादन मला मिळाले, शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथून विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाभार्थ्यांशी झालेल्या संवादाचे थेट प्रक्षेपण पाहिले. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

ड्रोन आणि नॅनो-युरिया तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खतांच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होऊन अपव्यय कमी होतो, असे ते पुढे म्हणाले. यामुळे ऊस उत्पादनात प्रति एकर सुमारे 5000 रुपयांची बचत होते. नागपुरातील 40,000 नागरिकांनी वयोश्री वंदना योजनेचा नागरिकांनी लाभ घेतला आहे, इतरांनीही तो घ्यावा असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले.
सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध करण्याचा सल्ला यावेळी बोलताना गडकरी यांनी दिला.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुण्यातील महाराणा प्रताप गार्डन येथून विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी झालेल्या पंतप्रधानांचा संवाद पाहिला. यावेळी खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालघर जिल्ह्यातील विरठाण खुर्द येथून हा कार्यक्रम थेट पाहिला. यावेळी खासदार राजेंद्र गावितही त्यांच्या सोबत उपस्थित होते.
कल्याणच्या केळणी कोलम गावात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी गावकऱ्यांसोबत हा कार्यक्रम थेट पाहिला.


पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्याच्या आमोना ग्रामपंचायतीमधून हा कार्यक्रम थेट पाहिला.

तर पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील घोटगाव येथे लाभार्थ्यांची भेट घेतली.

***
R.Aghor/G.Deoda/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1981180)
Visitor Counter : 125