पंतप्रधान कार्यालय
विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचा केला प्रारंभ
एम्स देवघर येथील 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण
देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची केली सुरुवात
सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी साध्य करण्यासाठी आणि देशभरातील नागरिकांपर्यंत लाभ पोहोचतील हे सुनिश्चित करण्याचा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश ”
''मोदी की गॅरंटी वाहन'' आतापर्यंत सुमारे 30 लाख नागरिक संलग्न असलेल्या 12,000 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये पोहोचले''
“विकसित भारत संकल्प यात्रेचे सरकारच्या पुढाकारातून जनचळवळीत रूपांतर झाले आहे”
“आतापर्यंत ज्यांना वंचित ठेवण्यात आले त्यांच्यापर्यंत सरकारी योजना आणि सेवा पोहोचवणे हे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट ”
"जिथे इतरांकडून अपेक्षा संपतात तिथे मोदींची हमी सुरू होते"
"भारताची नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि भारतातील गरीब कुटुंब हे विकसित भारताचे चार अमृत स्तंभ आहेत "
Posted On:
30 NOV 2023 1:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी सुरू केला. यापूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. या आश्वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा हा कार्यक्रम आहे. . झारखंडमधील देवघर, ओदीशातील रायगढ़, आंध्र प्रदेशातील प्रकाशम, अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि जम्मू-काश्मीरमधील अरनिया येथील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
विकसित भारत संकल्प यात्रेला आज 15 दिवस पूर्ण होत असून आता यात्रेने वेग घेतला आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधीत करताना सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचे नाव ‘विकास रथ’ वरून ‘मोदी की गॅरंटी वाहन’ असे बदलण्यास कारणीभूत ठरलेल्या लोकांची आपुलकी आणि सहभाग लक्षात घेऊन सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचे आभार मानले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लाभार्थ्यांचा हिरीरीने सहभाग , उत्साह आणि संकल्पाचे कौतुक केले. ‘मोदी की गॅरंटी वाहन’ आत्तापर्यंत 30 लाख नागरिक संलग्न असेलल्या 12,000 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये पोहोचले आहे,अशी माहिती देत त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये महिलांच्या सहभागाची प्रशंसा केली. “प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा अर्थ समजला आहे ” याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी सरकारी पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे जनचळवळीत रूपांतर झाल्याचे नमूद केले. नवीन आणि जुन्या लाभार्थ्यांसह विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी लाभार्थ्यांच्या समाज माध्यम मंचांवर वाढलेल्या डिजिटल घडामोडी बघितल्याननंतर, पंतप्रधान दररोज पाहतात त्या नमो अॅपवर अशी छायाचित्रे आणि चित्रफिती अपलोड करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. "युवा वर्ग विकसित भारत संकल्प यात्रेचे दूत झाले आहेत", असे त्यांनी सांगितले. ‘मोदी की गॅरंटी वाहन’ चे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिमा हाती घेतल्याने गावांच्या स्वच्छतेवर विकसित भारत संकल्प यात्रेमुळे झालेला प्रभावही त्यांनी पाहिला.भारत आता न थांबणारा आणि न थकणारा आहे. भारतातील जनतेनेच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही त्यांनी सांगितले. . नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या मोसमात ‘व्होकल फॉर लोकल’ वर देण्यात आलेला भरही त्यांनी अधोरेखित केला.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी स्वागतातून, सरकारवरील नागरिकांचा विश्वासच प्रतिबिंबित होत आहे, असे त्यांनी म्हटले. जेव्हा मोठी लोकसंख्या घरे, शौचालये, वीज, गॅस जोडणी , विमा किंवा बँक खाती यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली यावरून तत्कालीन सरकारने नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचेच ते दिसते, असे सांगत पंतप्रधानांनी लाचखोरी सारख्या भ्रष्टाचाराच्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणाकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले आणि अशा सरकारवरचा नागरिकांचा विश्वास उडाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारनेच कुप्रशासनाचे रूपांतर सुशासनात केले आहे आणि योजनांचा पुरेपूर लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे ध्येय आहे , असे त्यांनी अधोरेखित केले. “सरकारने नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. हा नैसर्गिक न्याय आहे, हा सामाजिक न्याय आहे”, असे पंतप्रधानांनी सांगितले. या दृष्टिकोनामुळे नव्या आकांक्षा निर्माण झाल्या असून कोट्यवधी नागरिकांमध्ये असलेली आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षाची भावना संपुष्टात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.“जिथे इतरांकडून अपेक्षा संपतात तिथे मोदीची हमी सुरू होते”, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
“विकसित भारताचा संकल्प हा मोदी किंवा कोणत्या सरकारचा संकल्प नाही, तर हा संकल्प प्रत्येकाला विकासाच्या मार्गावरून घेऊन जाण्याचा संकल्प आहे.” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश, केंद्र सरकारच्या योजना आणि लाभ, आजवर या योजनांपासून वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे असे त्यांनी सांगितले. नमो अॅपवरील सर्व घडामोडींवर आपले बारकाईने लक्ष असल्याचे सांगत, त्यांनी ड्रोन वापर प्रात्यक्षिके, आरोग्य तपासणी शिबिरे आणि आदिवासी भागात सिकल सेल अॅनिमिया साठी आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
विकसित भारत संकल्प यात्रेमुळे, अनेक ग्रामपंचायतीत सरकारच्या योजना 100 टक्के पोहोचल्या असून जे मागे राहिले आहेत, त्यांनाही या योजनांची माहिती दिली जात आहे, असे त्यांनी नमूद केले. उज्ज्वला आणि आयुष्मान कार्डसारख्या अनेक योजनांशी लाभार्थींना तात्काळ जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 40,000 हून अधिक लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस जोडण्या देण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी तरुणांना माय भारत स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून माय भारत मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ चार अमृत स्तंभांवर उभा आहे. असं ते म्हणाले. महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे अशी ही चार आधारस्तंभ असून, या चार वर्गांची प्रगती, भारताला विकसित राष्ट्र बनवेल, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, आणि लोकांच्या आयुष्यातून गरीबीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकार अखंड प्रयत्न करत आहे, असे मोदी म्हणाले. देशात रोजगार निर्मिती, युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, भारतातील महिलांना सक्षम करणे, त्यांच्यासमोरच्या समस्या सोडवणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशातील शेतकऱ्यांची क्षमता वाढवणे, यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. “जोपर्यंत, गरीब, महिला, शेतकरी आणि युवकांच्या समस्यांवर पूर्णपणे मात केली जात नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही” असे पंतप्रधान म्हणाले.
महिला सक्षमीकरणाशी संबंधित इतर विकासकामांनाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. शेतीमध्ये ड्रोनचा वापर करून आणि गरीब कुटुंबांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्याविषयी ते बोलले. पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्रांच्या शुभारंभाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ड्रोन दीदींच्या घोषणेची आठवण करून दिली आणि सांगितले की येत्या काळात ड्रोन पायलटसाठी प्रशिक्षणासह 15,000 स्वयं-सहायता गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जातील. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेला ड्रोन दीदीमुळे बळ मिळेल आणि शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. “यामुळे, देशातील शेतकरी अत्यंत कमी खर्चात ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर हात मिळवू शकतील, ज्यामुळे वेळ, औषध आणि खतांची बचत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.
10,000 व्या जनऔषधी केंद्राच्या उदघाटनाचा संदर्भ घेत मोदी म्हणाले की ही केंद्रे, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त दरात औषधे खरेदी करण्याचे केंद्रे बनली आहेत. “ जन औषधी केंद्रांना आता ‘मोदींचे औषधांचे दुकान असे सर्वजण म्हणतात’ असे सांगत पंतप्रधानांनी, नागरिकांनी दाखविलेल्या आपुलकीबद्दल त्यांचे आभार मानले. अशा केंद्रांवर सुमारे 2000 प्रकारची औषधे 80 ते 90 टक्के सवलतीच्या दरात विकली जातात, अशी माहिती त्यांनी दिली. जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत नेऊन वाढविल्याबद्दल त्यांनी देशातील नागरिकांचे, विशेषतः महिलांचे अभिनंदन केले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला.“मोदीची हमी म्हणजे पूर्ततेची हमी”, असे ते पुढे उदगारले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी या संपूर्ण मोहिमेचा आरंभ करताना संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
देशातील सुमारे 60 हजार गावांमध्ये दोन टप्प्यात हे अभियान राबविण्यात आले असून सात योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत, असे सांगून काही वर्षांपूर्वीच्या ग्राम स्वराज अभियानाच्या यशाचे त्यांनी स्मरण करून दिले.
"आकांक्षी जिल्ह्यांतील हजारो गावांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे", असेही ते म्हणाले. या अभियानात सहभागी असलेल्या सरकारी प्रतिनिधींनी देश आणि समाजाच्या सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. “पूर्णपण प्रामाणिक रहात, ठामपणे प्रत्येक गावात पोहोचत जाण्याचा प्रयत्न करूनच विकसित भारत संकल्प यात्रा पूर्ण होईल”, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
केंद्रीय कृषी मंत्री, श्री नरेंद्रसिंग तोमर लाभार्थी आणि इतर भागधारक यांच्या सोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात उपस्थित होते.
पार्श्वभूमी:
लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजनांचा लाभ वेळेत पोहोचेल याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरू झाली आहे.
महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत विकास सुनिश्चित करण्याचा पंतप्रधानांचा अविरत प्रयत्न राहिला आहे. या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र सुरू झाले आहेत.या योजनेद्वारे महिला स्वयंसहाय्यता गटांना (SHGs) ड्रोन प्रदान केले जातील ;जेणेकरून त्या या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या उपजीविकेसाठी करू शकतील. पुढील तीन वर्षात महिला बचत गटांना 15,000 ड्रोन दिले जातील. महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल.
परवडणारी आणि सहज उपलब्ध होणारी आरोग्यसेवा देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या संकल्पनेचा आधारस्तंभ आहे. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना हा या दिशेने सुरू केलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे विशेष अशा दहा हजाराव्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. त्यानंतर, पंतप्रधानांनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवत नेण्याच्या उपक्रमाचीही सुरूवात केली.
***
R.Aghor/S.Chavan/S.Patgaon/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1981161)
Visitor Counter : 231
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam