माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

हॉलिवुडचे दिग्गज मायकेल डग्लस आणि निर्माते शैलेंद्र सिंग यांच्यासोबत गोव्यामधील 54व्या इफ्फीमध्ये “ ही वेळ एका वैश्विक सिनेमाची आहे का” याविषयी चर्चासत्राचे आयोजन


मूळ कथानक आणि सार्वत्रिक संदेश असलेला चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो- मायकेल डग्लस

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

चित्रपटांच्या सार्वत्रिक भाषेच्या प्रभावावर विचारमंथन करण्यासाठी हॉलिवुडचे दिग्गज मायकेल डग्लस आणि निर्माते शैलेंद्र सिंग यांच्यासोबत गोव्यामधील 54व्या इफ्फीमध्ये आज एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात  आले होते. ही वेळ एका वैश्विक सिनेमाची आहे का हा या चर्चासत्राचा विषय होता. यामध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातील चित्रपट निर्मात्यांना, कथाकथन करणाऱ्यांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणणाऱ्या आणि भौगोलिक सीमांच्या मर्यादा ओलांडणाऱ्या चित्रपटांवर प्रकाश टाकण्यात आला.

चित्रपट रसिक, चित्रपट निर्माते आणि या उद्योगातील व्यावसायिकांसोबत संवाद साधताना मायकेल डग्लस म्हणाले, एक चांगला आशय असलेला, काहीसे वैयक्तिक आणि एखाद्याच्या मातृभूमीशी जवळीक साधणारा आणि जागतिक क्षमता असलेला चित्रपट जागतिक चित्रपट क्षेत्राला आपलेसे करू शकतो.

चित्रपट क्षेत्राचा विचार करायचा झाला तर भारत हा इतर अनेक भागांपेक्षा वेगळा ठरतो कारण भारतामध्ये अतिशय विशाल चित्रपट उद्योग आहे आणि अफाट लोकसंख्या आहे त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत देशाच्या बाहेर जाण्याची त्यांची आकांक्षा आणि आवश्यकताही नसते.

आरआरआरच्या जागतिक प्रभावाविषयी बोलताना नामवंत निर्माते आणि अभिनेते मायकेल डग्लस यांनी आरआरआर हा चित्रपट भारताच्या स्वतःच्या कथानकावर आधारित असल्याने आणि एक सार्वत्रिक संदेश देणारा असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही हिट ठरला, असे सांगितले.

एखादा चित्रपट यशस्वी होण्यासाठी एखाद्याने त्यांच्या स्वतःसाठी तो आशय तयार केला पाहिजे आणि तो बाहेरच्या जगापर्यंत पोहोचेल की नाही याचा विचार करत राहाता कामा नये, अशी सूचना त्यांनी केली.

अनेक दशकांची कारकीर्द असलेले आणि असाधारण यश मिळवणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याने भारतातील युवा वर्गासाठी आपला संदेश देताना सांगितले, युवा पिढीवर माझा सर्वात जास्त विश्वास आहे कारण युवा पिढीकडे सोशल मीडिया आहे आणि हवामान बदलासारख्या जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व जाणून आहेत.

निर्मिती क्षेत्रातील आपल्या सुरुवातीच्या  दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की ‘वन फ्ल्यू ओव्हर द कुक्कूज नेस्ट’ या पुस्तकाद्वारे वयाच्या 23व्या वर्षी हा सर्व प्रवास सुरू झाला ज्यावेळी आपले वडील महान अभिनेते आणि निर्माते दिवंगत कर्क डग्लस यांनी या पुस्तकाचे अधिकार मिळवले आणि एका नाटकाची निर्मिती केली. याच वेळी मायकेल डग्लस पुढे आले आणि त्यांनी यावर चित्रपट निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पुढे त्यावर चित्रपट तयार केला आणि जॅक निकोल्सन आणि डॅनी डे व्हिटो यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अतिशय हिट ठरला.

आपल्या चित्रपटविषयक संशोधनाविषयी आणि संहिता निवडताना एक अभिनेता म्हणून त्यांना काय वाटते, याविषयी ते म्हणाले की एक अभिनेता म्हणून मला एका चांगल्या चित्रपटाचा भाग होणे आवडेल, मग ती भूमिका लहानशी का असेना. एखाद्या वाईट चित्रपटात मोठी भूमिका करण्यापेक्षा एका चांगल्या चित्रपटात लहान भूमिका करणे मला आवडेल.

आपल्या वडिलांच्या वारशाविषयी, दिवंगत कर्क डग्लस यांनी जो वारसा त्यांच्या मागे ठेवला आहे त्याविषयी बोलताना ते म्हणाले माझ्या वडिलांचे मार्गदर्शनपर शब्द होते, एक अभिनेता म्हणून अतिशय कठीण काम आहे ते म्हणजे आपण स्वतः काय आहोत ते बनून राहणे आणि साधे राहणे, तर एक अभिनेता म्हणून सर्वाधिक अवघड काम आहे ते म्हणजे ऐकून घेणे. अभिनेते केवळ बोलण्याचेच काम करतात आणि फारसे ऐकून घेत नाहीत.

आपण ज्या प्रकारे आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत आहोत त्याच प्रकारे आपला मुलगा डायलन डग्लस याने देखील करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एक अभिनेता म्हणून येणाऱ्या आव्हानांवर आणि व्यासपीठाच्या भीतीवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर बोलताना मायकेल डग्लस म्हणाले, कॅमेरा नेहमीच खोटे भाव पकडू शकतो आणि पहिल्या काही वर्षात हे सर्व खूपच आव्हानात्मक होते. व्यासपीठावर वावरण्याची भीती घालवण्यासाठी मी माझ्या मनाची अशा प्रकारे तयारी केली की मी स्वतःला हे समजावले की अभिनय म्हणजे काही तरी असल्यासारखे भासवणे आणि इतरांना ते पटवून देणे आहे जे आपण दररोज करत असतो. हा विचार माझी भीती घालवण्यासाठी आणि अभिनयाचे कसब आत्मसात करण्यासाठी सहाय्यकारक ठरले आणि त्याच्या आनंदाचा अनुभव घेण्याची मी सुरुवात केली.

चित्रपट क्षेत्रासाठी एक दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून गौरव केला जात असल्याबद्दल मायकेल डग्लस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. एक निर्माता म्हणून तुम्हाला जे काही घडत आहे आणि जे तुम्हाला पुढे वाटचाल सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशा प्रत्येक गोष्टीचे सखोल ज्ञान असावेच लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या वडिलांना आपल्याला कोणती शिकवण दिली, या आठवणींना उजाळा देताना, शैलेंद्र सिंग म्हणाले, आम्ही सर्वच काही तरी मिळवण्यासाठी अधीर असतो, जगाच्या कोणत्याही भागात चित्रपट बनवता येतील, मात्र सर्वात मोठा पुरस्कार आणि जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे तो म्हणजे तुमचा सुरू असलेला श्वास आणि तुमचे धडधडणारे हृदय ही वस्तुस्थिती. आपण जिवंत आहोत ही अनुभूती हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे.

या चर्चासत्रामध्ये 54व्या इफ्फीचे महोत्सव संचालक प्रिथुल कुमार यांनी मान्यवर वक्त्यांचा सत्कार केला.

मायकेल डग्लस यांना आज 54व्या इफ्फीच्या समारोप समारंभात प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

 

 

iffi reel

(Release ID: 1980598) Visitor Counter : 126