माहिती आणि प्रसारण मंत्रालय
विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रातील नागरी भागांमध्ये सुरुवात, मुंबईत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून संकल्प रथांना केले मार्गस्थ
Posted On:
28 NOV 2023 6:13PM by PIB Mumbai
मुंबई, 28 नोव्हेंबर 2023
आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आजपासून महाराष्ट्रातील नागरी भागामध्ये ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्रातील नागरी भागांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या संकल्प रथांना मार्गस्थ केले.
नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, तसेच अजूनही योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या नागरिकांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहचावी, या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने मुंबईतील मंत्रालय परिसरात आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडमधील खुंटी येथे आयोजित कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवून सर्वप्रथम विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ केला होता.
ही यात्रा सर्वप्रथम देशभरातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर ग्रामीण भागात सुरू करण्यात आली. आदिवासी आणि ग्रामीण भागात संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढच्या टप्प्यात आजपासून ही यात्रा नागरी भागांमध्ये सुरु करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये विकसित भारत संकल्प रथ हे आगामी काळात 227 विविध ठिकाणी जाऊन योजनांची माहिती नागरिकांना देणार आहेत. यामध्ये आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असून आपल्या परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाल्यानंतर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबईसोबतच ठाणे येथेही विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजना, ई-बस सेवा, पंतप्रधान अमृत योजना, पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियान आदी योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी बोलताना अभिजित बांगर म्हणाले की केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दिलेल्या 13 कोटींपेक्षाही अधिक नळ जोडण्यांद्वारे घरांमध्ये थेट पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी धूरमुक्त स्वयंपाक घर शक्य झाले.
सध्या दर महिन्याला 80 कोटी लोकांना मोफत धान्याचे वाटप होत असून आवास योजनेद्वारे लाखो लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण झाले आहे. याशिवाय कुशल हातांना विशवकर्मा योजनेची साथ मिळाली असून अनेक गरजू लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत, अशी माहिती यावेळी बांगर यांनी दिली.
याचप्रमाणे, पालघर जिल्ह्यातील वसई-विरार येथेही विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला.
यानिमित्त वसई तालुक्यातील नायगाव येथील अर्नॉट गॅलेक्सी परिसरात आयोजित कार्यक्रमात खासदार राजेंद्र गावित, महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, मराठी सिनेअभिनेते अरुण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांसाठी वैयक्तिक सामुदायिक शौचालय लाभार्थी नोंदणी मोहीम, आयुष्यमान भारत योजना शिबिर, उज्ज्वला शिबिर, वैद्यकीय आरोग्य शिबीर, आधार कार्ड अपडेशन शिबिर, पी.एम.स्वानिधी योजना शिबिर आदी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे कौतुक केले. लवकरच, सई विरार महानगरपालिका क्षेत्रात 200 खाटांचे एक सरकारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
तर, पी.एम ई-बस योजनेच्या माध्यमातून येत्या काही महिन्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सरकारच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी ई बसेस देण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमात एकूण 10 लाभार्थ्यांना पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत व्यवसायासाठी कर्जाच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या अनोख्या शैलीत उपस्थित नागरीकांना संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केले.
आगामी काळात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 49 ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.
वरील शहरांसोबतच महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही आज विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली आहे.
H.Akude/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980488)
Visitor Counter : 241