माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा आपला खूप मोठा सन्मान आहे: ग्लोबल लिजेंड मायकेल डग्लस


पंतप्रधान मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय चित्रपट उद्योग वाढत्या गुंतवणुकीसह मोठा होत आहे: मायकेल डग्लस

चित्रपट समान भाषा बोलतात आणि आपल्याला अधिक जवळ आणतात: डग्लस

भारत आम्हाला प्रिय आहे आणि त्याने मोकळ्या मानाने आमचे स्वागत केले आहे: अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक आहे, असे दिग्गज हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माता मायकेल डग्लस यांनी आज गोव्यामध्ये आयोजित इफ्फी 54 मध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. 

54 व्या इफ्फी च्या समारोप समारंभात उद्या मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय चित्रपट उद्योगासाठी हा सर्वोत्तम काळ आहे, आणि इफ्फी 54 मध्ये 78 हून अधिक परदेशी देशांचे प्रतिनिधित्व हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. “भारतीय चित्रपट जगभर प्रसिद्ध आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” .

जगाला एकत्र आणण्यामधील चित्रपटांची भूमिका अधोरेखित करताना डग्लस म्हणाले की चित्रपट समान भाषेची देवाण घेवाण करतात आणि आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतात. “चित्रपटांमध्ये काय चालले आहे हे जगभरातील प्रेक्षक समजू शकतात. चित्रपट आंतरराष्ट्रीय संपर्क निर्माण करतात. हीच या उद्योगाची जादू, सौंदर्य आणि आनंद आहे आणि म्हणूनच मला हा व्यवसाय खूप आवडतो,” ते म्हणाले.

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, दोन वेळा अकादमी पुरस्कार विजेते मायकेल डग्लस म्हणाले की हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींमध्ये रमताना  त्यांनी सांगितले की त्यांनी सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा  त्यांच्या चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी विशेष गोष्ट आहे. “रे यांचे चित्रपट खूप मनोरंजक होते आणि त्यांनी वास्तवाचे चित्रण केले. रे यांचे मोठेपण हे आहे की ते एकाच वेळी केवळ दिग्दर्शकच नव्हते तर लेखक, चित्रपट संपादक, आणि संगीतकारही होते,” त्यांनी विशेष नमूद केले.

ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट आरआरआर ने मिळवलेल्या यशाची प्रशंसा करताना मायकेल डग्लस म्हणाले की, भारतासाठी ही एक नेत्रदीपक कामगिरी आहे आणि यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि भारतीय चित्रपट उद्योगाला असे अनेक मोठे चित्रपट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

 

आपले वडील, प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माते कर्क डग्लस यांच्याबद्दल बोलताना, पाच वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते मायकेल डग्लस म्हणाले की, आपल्या वडिलांच्या सावलीतून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागला. “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी साध्या भूमिका करत होतो. लोक माझी तुलना माझ्या वडिलांशी करायचे. वॉल स्ट्रीट चित्रपटासाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन जिंकणे हा एक जबरदस्त क्षण होता. माझ्या सहकाऱ्यांकडून मिळालेले ते प्रमाणीकरण होते”, त्यांनी स्पष्ट केले.

बजेटपेक्षा आपल्याला चांगला आशय अधिक आवडतो, हे स्पष्ट करून, मायकेल डग्लस यांनी सांगितले की, चित्रपट निवडताना त्यांच्यासाठी आशयसंपन्न साहित्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. “भावनांना स्पर्श करणाऱ्या एखाद्या गोष्टीला मी प्राधान्य देईन. वाईट चित्रपटात मोठी भूमिका करण्यापेक्षा मी चांगल्या चित्रपटात छोटीशी भूमिका करेन,” ते म्हणाले. भारतीय चित्रपटात काम करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल, डग्लस यांनी सांगितले की निर्माता शैलेंद्र सिंग त्यांना आवडलेल्या एका पटकथेच्या रुपरेषेवर ते काम करत आहेत.

मायकेल डग्लस यांची पत्नी आणि बहु-पुरस्कार विजेती अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भारत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप प्रिय आहे. भारताशी असलेला आपला संबंध स्पष्ट करत, त्यांनी एका भारतीय डॉक्टरचा उल्लेख केला, ज्याने त्या अठरा महिन्यांच्या असताना त्यांचे प्राण वाचवले होते. या बाफ्टा पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने भारतीय चित्रपटांबद्दलचे त्यांचे प्रेम देखील प्रकट केले आणि बॉलीवूड चित्रपटांचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय चित्रपटांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “द लंचबॉक्स हा माझ्या आवडत्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. मी तो लागोपाठ दोनदा पहिला. या चित्रपटाने मला खरोखरच स्पर्श केला.” त्यांनी बॉलीवूड चित्रपट ओम शांती ओम चाही उल्लेख केला, जो त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळींबरोबर अनेकदा पहिला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते आणि परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक शैलेंद्र सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते. चित्रपट व्यवसायातील आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासावर व्यक्त होताना, "सिनेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे," असे ते म्हणाले.

पत्रकार परिषद पाहण्यासाठी येथे भेट द्या: 

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

iffi reel

(Release ID: 1980262) Visitor Counter : 167