माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फीमध्ये इन -कन्व्हर्सेशन सत्रात ‘भारतीय चित्रपटातील महिला शक्ती’ या विषयावर झाली चर्चा
चित्रपट विषयक निर्णय घेणार्या संस्थांमध्ये आणखी महिला आवश्यक : चित्रपट दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी
पटकथेतून पडद्यावर सादरीकरण होताना राहिलेल्या त्रुटी महिलांच्या नजरा अचूक टिपतात : चित्रपट संकलक श्वेता वेंकट मॅथ्यू
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2023
भारतीय चित्रपटसृष्टीतील महिलांची भूमिका आता केवळ कलाकार म्हणून राहिली नाही, त्यात बदल होऊन त्या दिग्दर्शक, निर्मात्या, संकलक, पटकथा लेखक आणि तंत्रज्ञ बनल्या आहेत. मात्र या एकविसाव्या शतकातही आपल्या देशातील चित्रपटसृष्टी लैंगिक समानतेच्या बाबतीत समान संधी देते का?
आज इफ्फीमध्ये ‘भारतीय चित्रपटातील नारी शक्ती’ या विषयावर झालेल्या इन -कन्व्हर्सेशन सत्रात या मार्मिक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कलाकार, चित्रपट निर्माती आणि लेखिका अश्विनी अय्यर तिवारी आणि चित्रपट संकलक श्वेता वेंकट यात सहभागी झाल्या, ज्याचे सूत्रसंचालन पत्रकार आणि एनडीटीव्हीच्या माजी संपादक पूजा तलवार यांनी केले.
चित्रपटातील स्त्रियांच्या सभोवतालच्या कथेतील बदलावर भर देत अश्विनी अय्यर तिवारी यांनी नमूद केले की , "सुरुवातीला, 'महिला चित्रपट दिग्दर्शक' किंवा 'महिला चित्रपट संकलक ' असे बिरूद लावणे महत्त्वाचे होते, मात्र आता, महिला आघाडीवर असल्यामुळे ही लेबले काढून टाकण्याची वेळ आली आहे."
चित्रपट उद्योगाच्या प्रगतीबाबत बोलताना या तरुण चित्रपट निर्मातीने सांगितले की चित्रपट, संकलन आणि पटकथा लेखन शिकवणाऱ्या अधिक संस्था उदयाला आल्यामुळे चित्रपटांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.“चित्रपट उद्योगात निर्णय घेणार्या संस्थांमध्ये आणखी महिलांची गरज आहे. चित्रपट संबंधी निर्णय घेणाऱ्या व्यासपीठांवर महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या पुरुषांची अधिक गरज आहे '',असे त्यांनी स्पष्ट केले.
ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे महिलांसाठी खुल्या झालेल्या संधींबाबत चर्चा करताना अश्विनी यांनी आशा व्यक्त केली की थिएटर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म दोन्हीचे अस्तित्व कायम राहील. 12 वी फेल चित्रपटाचे अलीकडील यश हे दर्शवते की मंच कुठलाही असो, एक आकर्षक कथा प्रेक्षकाना आकर्षित करते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चित्रपट उद्योगातील होतकरू महिलांना सल्ला देताना बहुआयामी दिग्दर्शिकेने त्यांना त्यांच्या भूमिकांचा अतिविचार न करण्याबाबत प्रोत्साहित केले आणि चित्रपट निर्मितीच्या सहयोगी स्वरूपावर भर दिला. विविध सामाजिक घटकांबरोबर प्रवास करून आणि त्यांच्यात सहभागी होऊन वास्तविक जीवनातील कथा समजून घेणे महत्त्वाचे यावर त्यांनी भर दिला.
श्वेता वेंकट मॅथ्यू, एक अनुभवी चित्रपट संकलक असून त्यांनी कथा सादरीकरणात महिलांचा अनोखा दृष्टीकोन अधोरेखित केला. "पटकथे मधून पडद्यावर सादरीकरण होताना राहिलेल्या त्रुटी महिलांच्या नजरा अचूक टिपतात," असे सांगत त्यांनी उद्योगातल्या वाढत्या महिला प्रतिनिधीत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.
लिंग-केंद्रित विचारांपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे यावर श्वेता यांनी भर दिला. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रभावाबाबत बोलताना त्यांनी आशा व्यक्त केली की ओटीटी प्लॅटफॉर्म महिला आणि पुरुष तंत्रज्ञांसाठी मोठ्या संधी घेऊन येईल.
वेतनातील विषमतेच्या समस्येकडे लक्ष वेधताना दोन्ही महिला तंत्रज्ञांनी भिन्न दृष्टिकोन व्यक्त केला. अश्विनी यांनी त्यांच्या निर्मात्यांचे आभार मानताना सांगितले की त्यांना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत असमान वेतनाच्या समस्येचा सामना करावा लागला नाही, श्वेता वेंकट मॅथ्यू म्हणाल्या की त्यांना आणि त्यांच्या बरोबरीच्या पुरुष सहकाऱ्यांना जे मानधन दिले जात होते त्यात त्यांना लक्षणीय फरक जाणवला. अश्विनी म्हणाल्या की महिला चित्रपट व्यावसायिक सहसा त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेबाबत फारसे बोलत नाहीत; त्यांनी त्यांच्या योगदानाच्या आधारे वाजवी मानधन मिळावे यासाठी वाटाघाटी करणे आवश्यक आहे. या अर्थपूर्ण संवादाने भारतीय चित्रपट उद्योगातील प्रगती आणि महिलांसमोरील आव्हाने अधोरेखित केली आणि निरंतर सहकार्य , प्रतिनिधित्व आणि योग्य दखल घेणे गरजेचे असल्यावर भर दिला.
Join our WhatsApp channel for more information:
https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1980261)
Visitor Counter : 137