संरक्षण मंत्रालय
कार्यक्रम - पूर्व प्रसिद्धीपत्रक
क्रेस्ट अनावरण: Y – 12706 इंफाल
Posted On:
27 NOV 2023 1:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे तयार करण्यात येत असलेल्या चार प्रोजेक्ट 15बी गाईडेड मिसाईल विनाशिकांपैकी तिसऱ्या म्हणजे यार्ड 12706 ('इंफाळ' ) च्या क्रेस्टचे अनावरण 28 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
एप्रिल 2019 मध्ये शुभारंभ सोहळ्याच्या वेळी या जहाजाचे नामकरण इंफाळ असे करण्यात आले आणि एमडीएल ने 20 ऑक्टोबर 2023 रोजी ते भारतीय नौदलाला सुपूर्द केले. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच्या चाचण्यांचा एक भाग म्हणून, या विनाशिकेवरून अलीकडेच विस्तारित श्रेणीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली . त्यानंतर आता या विनाशिकेचा क्रेस्ट अनावरण कार्यक्रम आयोजित करण्याय त्यात आहे. हा कार्यक्रम संरक्षण मंत्री, मणिपूरचे मुख्यमंत्री तसेच संरक्षण मंत्रालय आणि मणिपूरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सागरी परंपरा आणि नौदलाच्या प्रथेनुसार भारतीय नौदलाची जहाजे आणि पाणबुड्यांना प्रमुख शहरे, पर्वत रांगा, नद्या, बंदरे आणि बेटांची नावे दिली जातात. भारतीय नौदलाला आपल्या अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त युद्धनौकेला इंफाळ या ऐतिहासिक शहराचे नाव देताना अतिशय अभिमान वाटत आहे. भारताच्या ईशान्य भागातील शहराच्या नावावर असलेली ही पहिली कॅपिटल युद्धनौका आहे, ज्याला राष्ट्रपतींनी 16 एप्रिल 2019 रोजी मान्यता दिली होती.
भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरो (WDB) द्वारे डिझाइन केलेली आणि एमडीएलद्वारे तयार केलेली ही युद्धनौका म्हणजे स्वदेशी जहाजबांधणी प्रक्रियेची ओळख आहे आणि जगातील तांत्रिक दृष्ट्या अत्यंत प्रगत युद्धनौकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये अंदाजे 75% उच्च स्वदेशी सामग्री आहे ज्यामध्ये एमआर एसएएम, ब्रह्मोस एस एस एम , स्वदेशी टॉर्पेडो ट्यूब लाँचर्स, पाणबुडी विरोधी स्वदेशी रॉकेट लाँचर्स आणि 76 मिमी एसआरजीएम यांचा समावेश आहे.
इंफाळ ही नौदलाची पहिली स्वदेशी विनाशिका आहे जी अत्यंत कमी वेळात तयार झाली असून या युद्धनौकेने सागरी चाचण्या देखील कमी वेळेत पूर्ण केल्या आहेत. ही विनाशिका येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय नौदलात दाखल होणार आहे.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980128)
Visitor Counter : 110