महिला आणि बालविकास मंत्रालय

विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचा देशभरात सक्रिय पाठिंबा


'मेरी कहानी मेरी जुबानी' अंतर्गत आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी केले अनुभवकथन

पात्र लाभार्थ्यांची तेथल्या-तेथे नोंदणी करण्याचे काम घेतले हाती; स्वस्थ बालक स्पर्धेदरम्यान आरोग्यसंपन्न बालकांचा गौरव

Posted On: 26 NOV 2023 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023

विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय (MoWCD) देशभरात सक्रिय पाठिंबा देत आहे. 'मेरी कहानी मेरी जुबानी' उपक्रमात हे मंत्रालय सहभागी झाले असून, या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील लाभार्थी आपले खरे अनुभव आणि त्यांच्या जीवनावर पडलेला अंगणवाडी सेवांचा प्रत्यक्ष प्रभाव सांगतात. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी अनुभवकथन केले आहे.

सदर मंत्रालयाच्या अखत्यारीतील योजनांच्या संपूर्ण अंमलबजावणीची खबरदारी घेण्यासाठी या यात्रेदरम्यान पात्र लाभार्थ्यांची जेथल्या-तेथे नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही यात्रा म्हणजे, विविध योजना व त्यांचे लाभ यांविषयी बहुसंख्य सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी उचललेले पाऊल असून त्यामुळे संबंधित योजनांच्या लाभाकरिता नोंदणी करण्यासाठी पात्र व्यक्तींना अधिक प्रेरणा मिळत आहे.

Gumla Distt, Jharkhand

Gumla Distt, Jharkhand

Gumla Distt, Jharkhand

District-West Singh Bhumi, Jharkhand

या यात्रांदरम्यान राज्यांनी 'स्वस्थ बालक स्पर्धा' घ्याव्यात अशी सूचना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिली असून यामध्ये, आरोग्यसंपन्न बालकांचा गौरव केला जातो. सामुदायिक सहभाग टिकवून ठेवण्यासाठी, पोषणविषयक मुद्दे सकारात्मक दृष्टिकोनातून मांडले जाणे अत्यावश्यक आहे. निरोगी बालक ओळखून त्याच्या आरोग्यसंपदेचे कौतुक करण्यावर यामध्ये भर दिला गेला पाहिजे. 0-6 वर्षे वयोगटातील बालकांची पोषणस्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट यामागे ठेवण्यात आले आहे. निरोगी बालकांवर विशेष लक्ष देण्याबरोबरच बालकांचे पोषण आणि त्यांचे कल्याण यासंबंधित विषयांशी बहुसंख्य समाजाला भावनिकदृष्ट्या जोडणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यसंपन्न होण्यासाठी पालक आणि बालकांमध्ये एक सकारात्मक स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन तशी उद्दिष्टे यामागे आखून घेण्यात आली आहेत.

आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या योजनांची देशभर संपूर्ण अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 या दिवशी झारखंडमधील खुंटी येथून 'विकसित भारत संकल्प यात्रा' या मूलगामी उपक्रमाचा प्रारंभ केला.

सरकारी योजनांच्या विषयीचे संदेश प्रसारित करण्यासाठी  विशेषत्वाने तयार करून घेतलेल्या माहिती-शिक्षण-संवाद (IEC) वाहनांना हिरवा कंदील दाखवून यावेळी मार्गस्थ करण्यात आले. या वाहनांवर स्थानिक भाषांमध्ये आकर्षक पद्धतीने माहिती लिहिलेली होती. दृक्- श्राव्य माध्यमातून तसेच पत्रके, पुस्तिका आणि फलकांच्या माध्यमातून योजनाविषयक माहिती प्रसारित करण्यासाठी ही वाहने फिरविली जाऊ लागली. देशातील जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ही विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे.

अपर माणिकगंज, रेसुबेलपारा, उत्तर गारो हिल्स जिल्हा, मेघालय

येथे 1975 मध्ये अंगणवाडी सेवांचा प्रारंभ झाला. (पूर्वी त्यांना एकात्मिक बाल विकास सेवा असे म्हटले जाई). हा भारत सरकारचा एक ठळक कार्यक्रम असून, 0-6 वर्षे वयोगटाच्या बालकांप्रती तसेच लक्ष्यित स्त्रिया (गरोदर आणि स्तनदा माता) आणि किशोरवयीन मुली (नैऋत्य भारतातील आकांक्षी जिल्ह्यांत सध्या पोषण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत 14-18 वर्षे वयोगटातील मुली) या सर्वांप्रती देशाची वचनबद्धता प्रतीत करणारा हा कार्यक्रम होय. कुपोषण, मर्त्यता, घटती अध्ययनक्षमता आणि मृत्यू यांचे दुष्टचक्र भेदण्याचे ध्येय या योजनेसमोर ठेवण्यात आले आहे.

लक्ष्यित लाभार्थ्यांवर प्राधान्याने लक्ष देण्यासाठी मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पोषण अभियान. सहा वर्षांखालील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या पोषणस्थितीत ठराविक कालबद्ध पद्धतीने सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांनी 8 मार्च 2018 या दिवशी याची सुरुवात केली. अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा दृष्टिकोन ठेवून याची आखणी करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने वर्तनात्मक बदल घडवून आणत विशिष्ट उद्दिष्टे आखून घेतो. पोषणस्थितीवर देखरेख ठेवण्याचे विविध मापदंड डोळ्यासमोर ठेवून याचे कार्य चालते. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियानाचा दुसरा टप्पा म्हणजेच 'एकात्मिक पोषण आधार कार्यक्रम' सुरु करण्यात आला. पोषणाचा मुख्य गाभा आणि सेवा वितरणात विचारपूर्वक बदल करून आणि केंद्रगामी व्यवस्था तयार करून पोषण 2.0 सुरु करण्यात आला असून, आरोग्याची जपणूक करणाऱ्या सवयी, संपूर्ण स्वास्थ्य आणि कुपोषणाचा प्रतिकार या मुद्द्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश त्यात आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा अवलंब (पोषण ट्रॅकर), केंद्रगामिता, समुदायाचा सहभाग, वर्तनात्मक परिवर्तन आणि जन-आंदोलन, क्षमताबांधणी, प्रोत्साहन आणि पुरस्कार तसेच अभिनव संकल्पना आणि नवोन्मेष अशा घटकांच्या मदतीने देशभरातील कुपोषण समस्या सोडवण्यासाठी ही योजना अंमलात आणण्यात येत आहे..

 

 

 

N.Meshram/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979934) Visitor Counter : 78