माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

54 व्या इफ्फी मधे 'पदार्पणाचा सर्वोत्तम चित्रपट म्हणून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासाठी, सात चित्रपटांमधे स्पर्धा

गोवा/मुंबई, 25 नोव्‍हेंबर 2023

 

गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट, या विभागात सात चित्रपटांची नोंदणी झाली असून हे चित्रपट विविध पडद्यांवर दाखवले जात आहेत. या स्पर्धा विभागात, इफफी ने भारतातीलच नाही, तर परदेशातील नवोदित चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या उत्तम चित्रपटांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. या विशेष पुरस्कार सुरू करून, इफ्फी ने नवोदितांची कथाकथन कला, दृष्टिकोनाची ताजी मांडणी आणि उत्तम चित्रपट निर्मिती याला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

या विभागात यंदा निवडले गेलेले चित्रपट खालीलप्रमाणे आहेत:

ऑल्मोस्ट एंटायरली ए स्लाईट डिसास्टर : उमूत सुभासी याने दिग्दर्शित केलेल्या या तुर्की चित्रपटात, इस्तंबूल मधल्या चार स्वतंत्र व्यक्तींचे समकालीन आयुष्य चित्रित केले आहे. हे चार जण आहेत, झेनप, एक अस्वस्थ विद्यार्थी; आयेशी, जी तुर्कीए मधल्या तिच्या भविष्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करणारी मुलगी; मेहमत, एक असमाधानी विवाहित अभियंता; आणि अली,आपल्या पालकांसोबत राहणारा एक बेरोजगार युवक. ह्या चित्रपटाचा, रॉटरडॅम इथल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये जागतिक प्रीमियर झाला होता. हा चित्रपट, नवीन पिढीला भेडसावणाऱ्या चिंतांना अत्यंत कुशलतेने विनोदाची झालर देतो.

 

लेट मी गो : मॅक्सिम रॅपाझ दिग्दर्शित आणि स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण झालेला, हा चित्रपट क्लॉडिन, ही एक मुलांच्या जबाबादरीत गुंतलेली आई आणि तिच्या प्रियकर भोवती फिरतो. दर मंगळवारी, एक शेजारी तिच्या मुलाची काळजी घेते त्यावेळी, ती या पुरुषांना भेटण्यासाठी डोंगरावरील हॉटेलमध्ये जाते. जेव्हा त्यांच्यापैकी एकाने तिच्यासाठी आपला मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा क्लॉडिन गोंधळून जाते आणि दुसर्‍याच एका आयुष्याचे स्वप्न बघू लागते. कान 2023 मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला होता तसेच, ACID, व्हँकुव्हर IFF 2023 आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये देखील तो प्रदर्शित झाला होता.

 

ओकारिना: ह्या अल्बेनियन चित्रपटाचे दिग्दर्शन, अल्बन झोग्जनी यांनी केले आहे. ओकारिना ही कौटुंबिक समस्यांची एक कथा आहे. नवीन देशात गेल्यावर एका कुटुंबाच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे येणाऱ्या प्रश्नांवर ती बेतलेली आहे.  आपली परिस्थिती सुधारण्याच्या तीव्र आकांक्षेने प्रेरित होऊन, शाका आणि सेल्व्हिया त्यांच्या उज्वल भविष्याच्या शोधात त्यांच्या "नैतिकतेशी तडजोड करण्यास प्रवृत्त होतात. मात्र, त्यांना भेटलेला जिओव्हानी आणि त्याची त्यांच्या आयुष्यातील  भूमिका, त्यांनी निवडलेल्या मार्गाला अनपेक्षित दिशेने नेते.

 

स्लीप: जेसन यू यांनी दिग्दर्शित केलेला दक्षिण कोरियन चित्रपट एका गर्भवती पत्नीची कथा सांगतो, ज्यामध्ये तिच्या पतीच्या झोपेतील विचित्र सवयींमुळे तिची चिंता वाढत जाते. त्याचे झोपेत सुरु होणारे निरुपद्रवी बोलणे, हळूहळू अस्वस्थतेपर्यंत पोहोचते. स्लीप क्लिनिकची मदत घेऊनही यश न मिळाल्याने, आणि तिच्या नवऱ्याचे झोपेतील वर्तन आणखी तीव्र झाल्यामुळे हे जोडपे शामनाकडे वळते. हा चित्रपट कान (क्रिटिक्स वीक), 2023, टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 आणि मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.

 

व्हेन द सीडलिंग्स ग्रो: तुर्की चित्रपट निर्माते रेगर आझाद काया दिग्दर्शित हा चित्रपट कोबाने येथील हुसेन आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरतो, जे दही विकून आपला उदरनिर्वाह करतात. बाजारातील एक संधी हुकल्याने त्यांना दिवसभराचा प्रवास करावा लागतो, हेमुडे नावाच्या एका मुलामध्ये गुंतलेले त्यांचे जीवन, आणि त्यांचे जीवन आणि समुदायावर कोबाने युद्धाचे झालेले परिणाम, याचा पट हा चित्रपट आपल्यासमोर उलगडतो.

 

ढाई अक्षर:  प्रवीण अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अमरीक सिंह दीप यांच्या ‘तीर्थाटन के बाद’ या पुस्तकावर आधारित आहे. उत्तराखंडमध्ये 1980 च्या दशकात घडणारा हा चित्रपट हर्षिताच्या जीवन प्रवासाचे वर्णन करतो, जी एका संवेदनशील लेखकाबरोबरच्या पत्रव्यवहारामध्ये आपले मन मोकळे करते, आणि त्या आधारावर अपमानास्पद विवाह बंधनातून मुक्त होत आपले जीवन नव्याने सुरु करते. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर श्रीधर बरोबर तिला सन्मान आणि आदर मिळतो. हर्षिताची कथा पितृसत्ताक समाजात अत्याचार किती सर्वसामान्य समजले जातात, यावर प्रकाश टाकते. प्रेम हेच स्वातंत्र्य देते, यावर भर देत, हा चित्रपट महिला सक्षमीकरणाचा संदेश देतो.       

 

इराटा: रोहित एमजी कृष्णन दिग्दर्शित हा भारतीय चित्रपट, एएसआय विनोदच्या हत्येचा उलगडा करतो. विनोद हा पोलीस खात्यात काम करणाऱ्या हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्या भावांपैकी एक आहे. एका मंत्र्याच्या आगमनापूर्वी त्याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विनोदचा जुळा भाऊ, डीवायएसपी प्रमोद, याला प्रकरणाचा तपास करताना मोठ्या दबावाचा सामना करावा लागतो, विनोदचा बेधडक स्वभाव आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा वेध घेत, हत्ये मागच्या हेतूचा तो छडा लावतो.

इफ्फी 54 महोत्सव अधिकाधिक रंजक होत असून, यामध्ये नव्या पिढीच्या दिग्दर्शकांच्या प्रतिभेची चमक दिसून येत आहे. महोत्सवात येत्या काही दिवसांमध्ये नव्या दमाच्या दिग्दर्शकांना दिल्या जाणाऱ्या पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार घोषित होणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/Radhika/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1979793) Visitor Counter : 161