विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
2047 मध्ये नवीन गृहनिर्माण तंत्रज्ञान भारताचा भव्य प्रासाद घडवेल: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा विश्वास
Posted On:
24 NOV 2023 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, 2047 मध्ये भारत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्यावेळी नवीन गृहनिर्माण तंत्रज्ञान भारताचा भव्य प्रासाद घडवेल.
नवी दिल्लीतील सीएसआयआर- सीबीआरआय तंत्रज्ञान हस्तांतरण मेळाव्याला संबोधित करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीबीआरआय), अर्थात केंद्रीय बांधकाम संशोधन संस्थेने जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक इमारत बांधकाम तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे केवळ मजबूत आणि हवामान आणि अवकाळ प्रतिरोधक नसून, पर्यावरणाबाबतच्या जागतिक नियमांशी सुसंगत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेली योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) साठी प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार म्हणून बजावलेल्या भूमिकेबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी सीबीआरआय ची प्रशंसा केली.
हवामान बदल आणि आगीचा सामना करण्यासाठी सक्षम असलेले फोल्डेबल सॉल्ट शेल्टर्स, विकसित केल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी सीबीआरआय ची प्रशंसा केली. ते म्हणाले की, याचा मोठा सामाजिक लाभ दिसून येईल. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी अमलात आणलेल्या जवळजवळ सर्वच सुधारणा, नवोन्मेष आणि उपक्रमांमागे सामाजिक कल्याणाचा दृष्टीकोन असून, सर्वसामान्यांसाठी ‘इझ ऑफ लिव्हिंग’, अर्थात त्यांचे जीवन सुकर करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
डॉ जितेंद्र सिंह यांनी उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि प्रतिनिधींनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि त्याच्या क्षमतेचा जास्तीतजास्त वापर करून देशात सकारात्मक बदल घडवून आणावा असे आवाहन केले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी विविध शाश्वत आणि किफायतशीर तंत्रज्ञानाबाबतच्या सर्वसमावेशक माहिती पुस्तिकेच्या दोन खंडांचे प्रकाशनही केले. यामध्ये बांधकाम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित देशांतर्गत विकसित केलेल्या, सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत काळाच्या कसोटीवर उतरलेल्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979445)
Visitor Counter : 127