युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
अनुराग सिंह ठाकूर यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सची केली घोषणा
खेलो इंडिया पॅरा गेम्स 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणार
या भव्य स्पर्धेत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1350 पॅरा ॲथलिट्स सहभागी होतील
Posted On:
23 NOV 2023 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
प्रतिभा ओळखण्यासाठी आणि युवा तसेच महत्त्वाकांक्षी पॅरा ॲथलिट्सना चमकण्याची संधी देण्याच्या दृष्टीकोनातून, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सची म्हणजेच दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धांची घोषणा केली ज्याचे आयोजन 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे, ते म्हणाले, “मला हे घोषित करताना अभिमान वाटतो की 10 ते 17 डिसेंबर दरम्यान, प्रथमच खेलो इंडिया पॅरा गेम्स नवी दिल्लीत विविध ठिकाणी आयोजित केले जातील. ब्बरतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तीन स्टेडियममध्ये एकूण 7 क्रीडा प्रकारांची स्पर्धा आयोजित केली जाईल.
देशातील दिव्यांगांसाठीच्या खेळांचा विकास करण्याच्या सरकारच्या पुढाकाराच्या दिशेने ही घोषणा एक मोठे पाऊल आहे आणि या आयोजनातून प्रतिभावंत पॅरा ऍथलीट्स ओळखण्यात मदत होईल , ज्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे कौशल्य अधिक धारदार बनवण्यात मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.
याप्रसंगी बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, “खेलो इंडिया योजना भारतीय खेळांसाठी आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली आहे. 2018 पासून आयोजित एकूण 11 खेलो इंडिया गेम्ससह - 5 खेलो इंडिया युथ गेम्स, 3 खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आणि 3 खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करून खेलो इंडिया स्पर्धेने या योजनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे."
“या स्पर्धांमधून आम्ही जवळपास 1000 प्रतिभावान खेळाडूंना निवडले आणि त्यापैकी अनेकांनी आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या पॅरा अॅथलिट्सना मी शुभेच्छा देतो,” असे ते म्हणाले.
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डासह 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1350 हून अधिक स्पर्धक पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये भाग घेण्याची शक्यता आहे ज्यात पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा नेमबाजी, पॅरा तिरंदाजी, पॅरा फुटबॉल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा वेट लिफ्टिंगसह 7 प्रकारांमध्ये पॅरा अॅथलिट्स सन्मानासाठी लढतील. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 3 स्टेडियममध्ये - IG स्टेडियम, तुघलकाबादमधील शूटिंग रेंज आणि जेएलएन स्टेडियम मध्ये याचे आयोजन केले जाईल.
2018 पासून एकूण 11 खेलो इंडिया स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 5 खेलो इंडिया युवा स्पर्धा, 3 खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आणि 3 खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचा समावेश आहे. ठाकूर यांनी व्यक्त केले की या स्पर्धांमुळे देशभरातील प्रतिभा ओळखण्यात मदत झाली आहे आणि विविध क्रीडा प्रकारांच्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली आहे.
R.Aghor/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979283)
Visitor Counter : 171