माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेले सात जुने चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित


राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान : आपल्या चित्रपट वारशाचा कालातीत खजिना जतन करण्याच्या राष्ट्राच्या वचनबद्धतेचा दाखला

पुनर्संचयित जुना चित्रपट हकीकतच्या सिक्वेलची दिग्दर्शक केतन आनंद यांच्याकडून घोषणा

डिजिटलकडे वळणे चांगले मात्र आपण सेल्युलॉइड आवृत्ती जतन करणे आवश्यक : वैभव आनंद

Posted On: 23 NOV 2023 6:45PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 23 नोव्‍हेंबर 2023

 

दिग्दर्शक केतन आनंद यांनी जुने चित्रपट पुनर्संचयित करण्याच्या केंद्र सरकार आणि एनएफडीसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, "त्यांनी प्रिंट घेतली आहे आणि ती पुनर्संचयित केली आहे, हे एक उल्लेखनीय तंत्रज्ञान आहे मात्र  प्रक्रिया क्लिष्ट आहे ज्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम रिस्टोरेशन करावे लागते." ते आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते.

1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ' हकीकत ' चित्रपट पुनर्संचयित करण्यात आल्याबद्दल आनंद यांनी सांगितले की या चित्रपटात  युद्धाची मानवी बाजू आणि सर्व अडचणींवर सैनिकांनी केलेली मात याचे अचूक चित्रण केले आहे. ते पुढे म्हणाले की त्यांच्या वडिलांच्या कलाकृतीत  कुठलीही छेडछाड केलेली  नाही आणि ती अबाधित ठेवली आहे  आणि त्याची रंगीत आवृत्ती इफ्फी 54 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. “कोणीही कृष्णधवल  काढून टाकू शकत नाही मात्र रंगीत आवृत्ती युवा पिढीसाठी , त्यांच्यासाठी आकर्षक बनवण्यासाठी केली आहे ,” असे आनंद म्हणाले . केतन आनंद यांनी  हकीकत 2 ची आणि महान अभिनेते देव आनंद यांच्यावर पुढील वर्षी एक वेब सिरीज बनवण्याची घोषणा केली.

वैभव आनंद म्हणाले, “योग्य तंत्रज्ञानाच्या  अभावामुळे आपण यापूर्वी अनेक चित्रपटांच्या प्रिंट गमावल्या आहेत.  ही एक खर्चिक प्रक्रिया कशी आहे हे सांगताना सेल्युलॉइड आवृत्त्या जतन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ते पुढे म्हणाले, "डिजिटल माध्यमाकडे वळणे चांगलेच आहे", पण डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेताना, ‘क्लासिक’ श्रेणीत गणल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या मूळ सेल्युलॉइड आवृत्तीचे जतन करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

वैभव आनंद यांनी, चित्रपट पुनर्संचयन प्रक्रियेमधील गुंतागुंत आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्याचा उल्लेख करत, या कामासाठी नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्या (एनएफएआय) प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, जुन्या क्लासिक चित्रपटांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी इफ्फीसारखे आणखी महोत्सव आयोजित केले जातील. हा उपक्रम मर्यादित साधन-संपत्ती असलेल्या देशाच्या दुर्गम भागातील कलाकारांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत संधी मिळण्यासाठी व्यासपीठ कसे उपलब्ध करून देईल यावर त्यांनी प्रकाश टाकला.

“माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुक्त हस्ते निधी पुरवलेल्या, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आलेल्या सात क्लासिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत. सामुहिक प्रयत्नांचा कळसाध्याय ठरणारा हा क्षण  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महत्वाचा ठरणार आहे.” माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे महोत्सव संचालक आणि सहसचिव (चित्रपट) प्रितुल कुमार यांनी सांगितले.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन आपल्या सिनेमॅटिक वारशाचा अमूल्य ठेवा जतन करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. हा एक असा प्रवास आहे, जो आपली सांस्कृतिक ओळख घडवण्यामध्ये आणि कथाकथनाच्या कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित करण्यामध्ये आपल्या  सिनेमॅटिक वारशाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करतो. NFDC-NFAI गेले अनेक महिने क्लासिक चित्रपटांच्या जतनाचे काम करत असून, या ठिकाणी चित्रपटाची प्रत्येक चौकट काळजीपूर्वक पुनर्संचयित केली जात आहे. आपला सिनेमॅटिक इतिहास जतन करणे, आणि आज आपण ज्या प्रकारात चित्रपट पाहतो, त्या 4K रिझोल्यूशनमध्ये ते पाहता यावेत, हे याचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/Sushma/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979197) Visitor Counter : 105