माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे, नाशिक, रायगड आणि धाराशिव मध्ये ग्रामीण विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ


केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या संकल्प रथाला दाखवला हिरवा झेंडा

विकसित भारत संकल्प यात्रेला आदिवासी भागात जोरदार प्रतिसाद

Posted On: 23 NOV 2023 5:53PM by PIB Mumbai

मुंबई, 23 नोव्हेंबर 2023

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या जुनी बेज ग्रामपंचायत इथं विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच कोणताही पात्र लाभार्थी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व शासकीय विभागांनी घ्यावी आणि विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडच्या खुंटी येथून विकसित भारत यात्रेची सुरुवात केली होती.

या महासंपर्क मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना 100% पात्र नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं, विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या वेळी IEC प्रचार रथासह पारंपारिक वेशभूषा परिधान करीत स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व लहान मुले उत्साहाने सहभागी झाले. 21 लाभार्थ्यांना यावेळी लाभाचे वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम आदिवासी जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीरित्या राबविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती होण्यास मदत होणार आहे.

या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. विकसित भारत संकल्प यात्रा योजनेचे रथ रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, खालापूर, रोहा, तळा, श्रीवर्धन, महाड या सात तालुक्यांमध्ये जाणार आहेत.

 

केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि पुणे जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा आज पुण्यात शुभारंभ झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यात्रेतील संकल्प रथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय नलवडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रबंधक डॉ. जितेंद्र पानपाटील, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी सहायक विकास तापकीर आदी उपस्थित होते.

पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. देशमुख यांनी चित्ररथाची पाहणी करून मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे जिल्ह्यातीत सर्व तालुक्यातील एकूण 1 हजार 843 गावे आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचे 12 एलईडी चित्ररथ चालवण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात आंबेगाव आणि बारामती या तालुक्यातून करण्यात येत असून पुढे दररोज प्रत्येक तालुक्यातील 2 गावी सकाळी आणि संध्याकाळी हे चित्ररथ जाणार आहेत.

 

विकसित भारत संकल्प यात्रा ही पुढील 2 महिने सूरू राहणार असून येत्या 26 जानेवारी 2024 रोजी यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील आंबेजवळगा गावात जनजागृती : धाराशिव जिल्ह्यातील आंबेजवळगा गावातून ग्रामीण भागातील विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीश्री राहुल गुप्ता यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी गावकऱ्यांना केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान, जनधन, उज्वला योजना, जीवन ज्योती, किसान सन्मान योजना, पीकविमा या योजनां विषयी माहितीदेण्यात आली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत स्वच्छतामिशन अंतर्गत लक्षणीय कामगिरीकेल्याबद्दल आंबेजवळगा गावाला विशेषप्रमाणपत्र देऊन मॉडेल गाव म्हणून सन्मानित करण्यात आले.

 आयुष्यमान भारतयोजनेचे लाभार्थी संजय जाधव यांच्या बालकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया केंद्रसरकारच्या योजनेमुळे सुकर झाली आणि आपल्या बालकाचे आयुष्य वाचले आणि आता हे बालककुपोषणापासूनही दूर असून प्रगती करत आहे, असे सांगितले.

 

अंजुम जलाल शेख या लाभार्थी महिलेने केंद्र सरकारच्या उमेद अभियानामुळे आपलाव्यवसाय सुरळीत सुरू झाला. आत्मनिर्भर होण्यासाठी योजनेची मदत झाल्याबद्दल त्यांनीसरकारचे आभार मानले.संकल्प यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात जवळपास 50 ते 60नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान भवया योजनेतील आयुष्यमान कार्ड देण्यात आले.

 

 

 

 

 

विकसित भारत संकल्प यात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी शुभारंभ झाला. आज जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात दाखल झाली. याठिकाणी ग्रामस्थांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.

विकसित भारत संकल्प यात्रेला आदिवासी भागात जोरदार प्रतिसाद

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात होण्याच्या एका आठवड्यापूर्वी अर्थात 15 नोव्हेंबर रोजी राज्यातील आदिवासी भागात ही यात्रा सुरू करण्यात आलेली आहे.

यामध्ये नाशिक, पालघर, नंदुरबार, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असून सर्वच भागांत विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

नांदेडच्या माहूर तालुक्यातील वायफळे तसेच झरी ता. लोहा या गावांमध्ये आज विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली. वायफळे ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी भारताला विकसित भारत बनवण्याची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

नंदुरबारच्या शहादा तसेच नवापूर तालु्क्यात विकसित भारत यात्रेला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी संकल्प रथातून दाखवण्यात येत असलेल्या चित्रफिती येथील नागरिक उत्सुकतेने पाहत होते. तसेच आपल्यासाठी आवश्यक असेलेली माहिती नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली.

 

विकसित भारत यात्रा दाखल झाल्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि पारंपरिक वेशभूषेत लहानग्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.

 

 

पालघरच्या डहाणू, वाडा आणि विक्रमगड तालुक्यांमध्येही नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

JPS/HA/Sonal Tupe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1979162) Visitor Counter : 229


Read this release in: English , Urdu , Hindi