माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रादेशिक चित्रपटांसाठी समर्पित दिवस: इफ्फीमध्ये भारतातील समृद्ध वैविध्याचा उत्सव
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2023
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हे केवळ जागतिक चित्रपट उत्कृष्टतेचे अभिसरण नाही; तर आपल्या देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून निर्माण होणाऱ्या प्रादेशिक चित्रपटांच्या समृद्ध वैविध्याचा उत्सव आहे. प्रादेशिक चित्रपटांना सन्मानित करण्याच्या आपल्या परंपरेला अनुसरून, 54 व्या इफ्फीने भारतातील विविध भाषांमधील चित्रपटांच्या विभागीय प्रदर्शनासाठी समर्पित दिवस ठेवले आहेत.
आजपासून, भारतीय पॅनोरमा विभागात पूर्व भारतातील मंत्रमुग्ध करणार्या प्रादेशिक चित्रपटांसह प्रादेशिक चित्रपटांच्या प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. बंगाली, ओडिया, आसामी, मणिपुरी आणि विविध ईशान्येकडील बोलींमधील चित्रपटांची मेजवानी आज प्रेक्षकांसाठी होती. उत्पल बोरपुजारी दिग्दर्शित बरुआर क्सॉन्गक्सर (आसामी चित्रपट), शिल्पिका बोरदोलोई दिग्दर्शित मऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव (मिझो चित्रपट), हिमांशू शेखर खटुआ दिग्दर्शित द सी अँड सेव्हन व्हिलेज (ओडिया चित्रपट), कौशिक गांगुली दिग्दर्शित अर्धांगिनी (बंगाली चित्रपट) हे प्रादेशिक चित्रपट आज इफ्फीमध्ये विविध ठिकाणी प्रदर्शित झाले.
जसजसा हा महोत्सव पुढे जात आहे तसा खालील वेळापत्रकाप्रामणे देशभरातील चित्रपटांचा प्रवास घडणार आहे.
23 नोव्हेंबर: दक्षिण 1: तमीळ आणि मल्याळम
24 नोव्हेंबर: उत्तर: पंजाबी, डोगरी, भोजपुरी, राजस्थानी, उर्दू, छत्तीसगढ़ी
25 नोव्हेंबर: पश्चिम: कोंकणी , मराठी, गुजराती
26 नोव्हेंबर : दक्षिण 2 : कन्नड आणि तेलगू

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित तमिळ चित्रपट पोन्नियिन सेल्वन-2 आणि पुरस्कार विजेते दिग्दर्शक जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट काथल-द कोर हे उद्या (23.11.2023) इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
आपल्या देशातील भावभावनांच्या असंख्य कथा मांडणाऱ्या या सिनेमॅटिक प्रतिभेच्या कॅलिडोस्कोप मध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी इफ्फी 2023 चित्रपट रसिकांना आमंत्रित करते.
अधिक माहितीसाठी : https://iffigoa.org/
* * *
PIB Mumbai |G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1978962)
Visitor Counter : 185