माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय चित्रपटांना नैतिक आणि भावनिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करून, सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणे, हे आपले उद्दिष्ट आहे: इफ्फी मधील इंडियन पॅनोरमा चित्रपट निवड समितीची भूमिका
इफ्फी मधील इंडियन पॅनोरमा, आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता आणि दृश्यात्मक साक्षरतेचा विकास प्रतिबिंबित करतो: इंडियन पॅनोरमा चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष डॉ. टी. एस. नागभरणा
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
“1979 मध्ये नऊ चित्रपटांच्या प्रदर्शनाने सुरु झालेल्या इफ्फी मधल्या इंडियन पॅनोरमाचा मी एक भाग आहे, आणि या महोत्सवाच्या आजवरच्या प्रवासाचा साक्षीदारही आहे. इंडियन पॅनोरमा, आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता आणि दृश्यात्मक साक्षरतेचा विकास प्रतिबिंबित करतो. एक चित्रपट प्रेमी म्हणून, हा प्रवास माझ्यासाठी भारताचा सिनेमॅटिक परिप्रेक्ष आणि सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाचा एक अमूल्य ठेवा आहे.” इंडियन पॅनोरमा चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष डॉ. टी. एस. नागभरणा आज गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, चित्रपट केवळ दोन प्रकारचे असतात, चांगले आणि वाईट.
“चांगला चित्रपट आपल्या मनाला स्पर्श करतो, विचारांना चालना देतो, आणि आपल्यावर कायमचा ठसा उमटवतो.” डॉ. टी. एस. नागभरणा म्हणाले.
निवड प्रक्रियेची माहिती देताना ते म्हणाले की, संपूर्ण निवड समितीने ‘सिनेमाची भाषा’ आणि चित्रपटाचा आत्मा लक्षात घेऊन चित्रपटांचे काटेकोरपणे विश्लेषण केले. ते म्हणाले, “ही गोष्ट भाग्याची आहे, किंवा नाही, पण एक चित्रपट बनवणारा म्हणून आमच्यापैकी प्रत्येकाचा दृष्टीकोन अपरिहार्यपणे वेगळा आहे. तरीही, सिनेमाचा गाभा, त्याची भाषा आणि सार याचे आकलन सर्वात महत्वाचे ठरते. प्रत्येकाचे वेगळेपण असले तरी, आमच्यापैकी कोणीही इतरांच्या दृष्टीकोनाबद्दल प्रश्न उपस्थित केला नाही.”
आशय आणि कौशल्याचा मिलाफ महत्वाचा समजून आम्ही एकत्रितपणे हा अभिमान आणि जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपट निर्मिती हा समर्पित प्रवास असून त्यासाठी तयारी आणि तपश्चर्या लागते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, 'आरारीरारो' सारख्या चित्रपटांनी आज आपल्यासमोर एक नवीन ताजा दृष्टिकोन मांडला आहे. यात मानवी घटकांच्या अर्थपूर्ण सहभागावर भर देण्यात आला आहे. आशयाचा अभाव असलेल्या चित्रपटांच्या भाऊ गर्दीत या चित्रपटाचे वेगळेपण उठून दिसते.
कमी बजेटच्या भारतीय चित्रपटांना जगभरात मिळत असलेल्या पसंतीबद्दल बोलताना परीक्षक म्हणाले की, चित्रपटाचे बजेट फारसे महत्वाचे नसून, त्याचे भावनिक, नैतिक आणि सौंदर्य शास्त्रीय पडसाद महत्वाचे ठरतात. विक्री हे आपले ध्येय नसून, भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करून, सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणे, हे आपले उद्दिष्ट आहे.
ख्यातनाम कन्नड चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते डॉ. टी. एस. नागभरणा हे या तेरा सदस्यीय चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना 10 राष्ट्रीय पुरस्कार आणि 18 राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
चित्रपट निवड समितीचे सदस्य पुढील प्रमाणे:
1. डॉ. टी.एस. नागभरणा (अध्यक्ष)
2. ए कार्तिक राजा
3. अंजन बोस
4. डॉ. इतिराणी समंता
5. के. पी. व्यासन
6. कमलेश मिश्रा
7. किरण गंती
8. मिलिंद लेले
9. प्रदिप कुरबा
10. रमा विज
11. रोमी मैतेई
12. संजय जाधव
13. विजय पांडे
फीचर फिल्म विभागासाठी, कोणत्याही भारतीय भाषेत चित्रपट अथवा काल्पनिक चित्रपट म्हणून बनवलेले आणि डिजिटल/व्हिडिओ माध्यमात चित्रित केलेले, 70 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचे चित्रपट पात्र आहेत.
संवाद पुढील लिंक वर पाहता येईल: https://www.youtube.com/watch?v=cXW1uwVWfYE
निवड समिती बद्दल अधिक माहिती: https://iffigoa.org/indian-panorama-jury/en
चित्रपटांबद्दल अधिक माहिती: https://iffigoa.org/indian-panorama-feature-2023/official-selections-features/en
* * *
PIB Mumbai | S.Tupe/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978730)
Visitor Counter : 105