माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपटांच्या आनंदाचा उत्सव साजरा करत गोव्याच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर 54व्या इफ्फी सोहोळ्याची रंगतदार सुरुवात
भारतात होणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या अडीच कोटी रुपयांच्या मदत अनुदानात वाढ करून ही मदत 30 कोटी रुपये करण्याची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा
भारताला चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीच्या सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणाचे रुप देण्यासाठी सरकार कटिबद्ध; इफ्फी महोत्सवाने ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना रुजवली: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
इतर अनेक उपक्रमांसोबत, भविष्यातील 75 सर्जनशील मने’ या कार्यक्रमाअंतर्गत एक भर्ती अभियान सुरु करण्याची घोषणा
वार्षिक 20% च्या विकासदरासह भारतीय माध्यमे आणि मनोरंजन उद्योग जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आणि सर्वाधिक जागतिकीकरण झालेला उद्योग म्हणून नावाजला जात आहे: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
इफ्फीमध्ये यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट वेब मालिकेसाठीच्या (ओटीटी) पुरस्कारांची सुरुवात
चित्रपट निर्मिती उद्योगाच्या विस्तारासाठी गोवा राज्यात फिल्म सिटी उभारण्याचा गोवा राज्य सरकारचा निर्णय : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2023
चलतचित्राच्या माध्यमातून सर्जनशीलता, चित्रपटविषयक प्रतिभा आणि कथाकथनाच्या वैभवशाली परंपरेत रंगलेल्या आशियातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये गणल्या जाणाऱ्या 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटीय प्रवासाची आज गोव्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी आयोजित भव्य उद्घाटन सोहोळ्याद्वारे अधिकृत सुरुवात झाली. विविधता आणि सर्जनशीलता यांचा संगम असलेल्या यावर्षीच्या महोत्सवात जगभरातील संस्कृती, दृष्टीकोन आणि कथांची समृद्धता दर्शवणाऱ्या नेत्रदीपक आणि खिळवून ठेवणाऱ्या अनेक चित्रपटांचे एकामागोमाग सादरीकरण होणार आहे. पुरस्कारप्राप्त सुप्रसिध्द ब्रिटीश चित्रपटनिर्माते स्टुअर्ट गॅट यांच्या ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रिमियरने या नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात झाली आहे.
सुप्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या वैभवशाली कारकिर्दीचा गौरव करत या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते तिला ‘भारतीय चित्रपटांतील योगदानाबद्दल विशेष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
छायाचित्र: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला ‘भारतीय चित्रपटांतील योगदानाबद्दल विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले
भारताला चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीच्या सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणाचे रुप देण्यासाठी सरकार कटिबद्ध; इफ्फी महोत्सवाने ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना रुजवली: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की चित्रपटांमध्ये अतुलनीय सामर्थ्य आहे आणि चित्रपटाशी निगडीत इतिहासाचा आढावा घेता असे दिसते की, चित्रपटांनी विविध संकल्पना, कल्पना आणि नवोन्मेष यांचे अशा प्रकारे चित्रण आणि विश्लेषण केले आहे की त्यातून विभाजनाच्या वाढत्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या सध्याच्या जगात शांतता, प्रगती आणि समृद्धी निर्माण करण्यासाठीची प्रेरक शक्ती तयार झाली आहे.
देशातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राच्या वृद्धीला चालना देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या अनेक लक्षणीय उपक्रमांचा ठळक उल्लेख करत केंद्रीय मंत्री म्हणाले की देशातील तरुण आणि मुले यांची प्रतिभा तसेच आपल्या उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींनी केलेला नवोन्मेष यांच्या पाठबळावर भारताला चित्रपटांचे चित्रीकरण तसेच निर्मिती-पश्चात कामांसाठी सर्वाधिक पसंतीच्या ठिकाणाचे रुप देण्याची पंतप्रधानांची मनीषा आहे. ते पुढे म्हणाले की, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर झाले आहे. “हा कायदा कॉपीराईटच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी सेन्सॉरशिपच्या पलीकडे जाऊन कार्यकक्षा वाढवत कायदेशीर चौकटीचा विस्तार करून देतो, तसेच चित्रपट निर्मात्यांची मेहनत आणि समर्पित वृत्ती विफल होऊ नये याची सुनिश्चिती करण्यासाठी पायरसी प्रतिबंधक उपाययोजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या कायद्याच्या माध्यमातून पायरसी करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यासाठीची सोय देखील करून देतो,” केंद्रीय मंत्री म्हणाले.
अलिकडेच पार पडलेल्या जी 20 शिखर परिषदेचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री म्हणाले की, जगाने विकास, विविधता आणि लोकशाही यावर आधारित भारताचे बहुआयामी आणि बहुस्तरीय विकास मॉडेल पाहिले. जी 20 अध्यक्षपदाच्या काळातील भारताच्या दृष्टिकोनाप्रमाणेच, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मुख्य संकल्पना “वसुधैव कुटुंबकम” या कल्पनेत रुजलेली आहे, जी शांततापूर्ण सहअस्तित्वाला मूर्त रूप देते जिथे संपूर्ण जग एक कुटुंब आहे.
परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांसाठी प्रोत्साहन जाहीर
आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणाऱ्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत 30 % वरून वाढ करून तो 40% करण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी केली. यासाठी प्रोत्साहन निधीची मर्यादा 2.5 कोटींवरून वाढवून 30 कोटी रुपये (3.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त) करण्यात आली असून ज्या सिनेमांमध्ये भारताशी संबंधित महत्त्वाचा आशय असेल अशा चित्रपटांसाठी अतिरिक्त 5% बोनस दिला जाईल.
भारताचे आकारमान आणि इथली अफाट क्षमता लक्षात घेता मध्यम आणि मोठ्या बजेटच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना देशात आकर्षित करण्यासाठी अधिक प्रोत्साहन देण्याची गरज होती असे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनात केलेली वाढ कलात्मक अभिव्यक्तीप्रति भारताच्या वचनबद्धतेचा आणि पाठिंब्याचा दाखला आहे आणि चित्रपट निर्मितीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून आमचे स्थान ते अधिक बळकट करत आहे ."
'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’
केंद्रीय मंत्र्यांनी '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' कार्यक्रमांतर्गत युवकांसाठी भरती मोहिमेची घोषणा केली, यामुळे त्यांच्या बहरलेल्या प्रतिभेसाठी आणि कारकीर्दीसाठी अमर्याद संधी खुल्या होतील. 2021 मध्ये सुरुवात झालेल्या आणि आता तिसर्या वर्षात असलेल्या या कार्यक्रमात 10 श्रेणींमध्ये प्राप्त सुमारे 600 प्रवेशिकांमधून बिष्णुपूर, जगतसिंगपूर आणि सदरपूर सारख्या दुर्गम भागांसह 19 राज्यांमधून 75 युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) श्रेणीसाठी नव्या पुरस्काराची घोषणा
महोत्सवाच्या 54 व्या आवृत्तीत अनेक नव्या उपक्रमांची घोषणा करताना अनुराग ठाकूर म्हणाले की, प्रथमच आणि इथून पुढे, इफ्फीमध्ये "सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार" प्रदान केला जाईल , ज्याद्वारे भारतातील आशय संपन्न साहित्य निर्मिती करणाऱ्या कलाकारांच्या रोजगार निर्मिती आणि नवोन्मेष मधील योगदानाची दखल घेतली जाईल आणि, त्यांच्या परिवर्तनशील भूमिकेचा इफ्फी मध्ये गौरव केला जाईल. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कारासाठी 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 10 भाषांमध्ये एकूण 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
फिल्म बाजार आणि ‘व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हिलियन’
सिनेजगत आणि माहितीपट विभागातील नवोन्मेष तसेच नॉन-फिक्शन स्टोरीटेलिंग, अर्थात वास्तववादी कथा सादरीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सह-निर्मिती बाजारपेठ प्रदर्शित करण्यासाठी अद्ययावत ‘व्हीएफएक्स' आणि टेक पॅव्हेलियन’ ची सुरुवात करून, इफ्फिने प्रथमच फिल्म बाजार उपक्रमाची व्याप्ती वाढवली आहे असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
सिने- मेळा
यावर्षी, प्रथमच, प्रादेशिक चित्रपट, खाद्यपदार्थ, संगीत, संस्कृती आणि अन्य गोष्टींमधून भारतातील समृद्ध विविधतेचा एक दिमाखदार उत्सव प्रदर्शित करणारा सिने-मेळा आयोजित करण्यात येत आहे.
पुनर्संचयित जुन्या चित्रपटांचा विभाग
राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन (NFHM) अंतर्गत एनएफडीसी /एनएफएआयने भारतीय जुन्या चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून अतिशय काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेल्या चित्रपटांचे 7 जागतिक प्रीमियरचा समावेश असलेला पुनर्संचयित जुन्या चित्रपटांचा विभाग सुरु करण्यात आला आहे.
सर्वांसाठी समावेशकता आणि मनोरंजन
54 व्या इफ्फीसाठी सर्वसमावेशकता हे मार्गदर्शक तत्व राहिले असून यावर्षी महोत्सवासाठी सर्व ठिकाणी दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपल्या दिव्यांगजन प्रतिनिधींसाठी एम्बेडेड ऑडिओ आणि सांकेतिक भाषेतील तरतुदींसह चार विशेष स्क्रीनिंग आयोजित केली जातील आणि याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' संकल्पनेला 'सबका मनोरंजन' अर्थात 'सर्वांसाठी मनोरंजन' ची जोड देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले, “54व्या इफ्फीमध्ये 40 महिला चित्रपट निर्मात्यांचे उल्लेखनीय चित्रपट प्रदर्शित केले जातील. त्यांची प्रतिभा, सृजनशीलता आणि दृष्टीकोन महोत्सवावर आपला वेगळा ठसा उमटवेल आणि तो विविध गट आणि कथानकांचे प्रतिनिधित्व करेल.”
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2023 या वर्षाचा प्रतिष्ठेचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार अमेरिकेतील हॉलीवूड अभिनेता, निर्माता मायकेल डग्लस यांना जाहीर झाला आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभामध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल आस्व सांगितले. चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगामधील 50 वर्षांहून अधिक कारकिर्दीत, मायकेल डग्लस यांना 2 ऑस्कर, 5 गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि इतर अनेक सन्मान मिळाले आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक हे देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
छायाचित्र: हॉलिवूड अभिनेता-निर्माता मायकेल डग्लस यांना 2023 साठी सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
गोव्याला चित्रपटांसाठी अनुकूल स्थळ बनवण्यामध्ये इफ्फी महोत्सव महत्वाची भूमिका बजावणार: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत.
उद्घाटन समारंभाला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला चित्रपट निर्मितीसाठी अनुकूल स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यामध्ये इफ्फी महत्त्वाची भूमिका बजावेल. “अलिकडच्या काही वर्षांत, गोव्याच्या चित्रपट उद्योगानेही मोठी झेप घेतली आहे आणि कोकणी चित्रपटांनी इफ्फीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे,’’ ते म्हणाले. यावर्षी इफ्फीसाठी गोवा विभागांतर्गत आलेल्या 20 प्रवेशांपैकी निवड समितीने सात चित्रपटांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाने चित्रपट निर्मिती उद्योगाच्या विस्तारासाठी राज्यात फिल्मसिटी स्थापन करण्यामध्ये स्वारस्य दर्शवले आहे.
छायाचित्र: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्घाटन समारंभाला संबोधित करताना
उद्घाटन समारंभामध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी निवड समिती सदस्यांना सन्मानित केले. राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते.
छायाचित्र: आंतरराष्ट्रीय निवड समिती सदस्यांचा सत्कार समारंभ
पुढील आठ दिवस गोवा आशियातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवामध्ये रंगून जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर पकड घेणाऱ्या नाट्य-चित्रपटांपासून ते विचारांना चालना देणारे माहितीपट आणि काळाच्या पुढील प्रायोगिक चित्रपटांपर्यंत, इफ्फी 2023 सिनेप्रेमी आणि चित्रपट उद्योग व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, प्रतिभावान अभिनेते आणि सिनेमा जगतातील दूरदर्शी या महोत्सवाला हजेरी लावतील आणि चर्चा सत्र, सहयोग आणि कथा-सादरीकरणाची सामायिक आवड जोपासतील.
चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी सजलेल्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित आणि शाहिद कपूर यांनी आपला कलाविष्कार सादर केला. श्रिया सरन, नुसरत भरुचा, पंकज त्रिपाठी, शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग या कलाकारांनीही उद्घाटन समारंभात आपल्या धमाकेदार सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
जगभरातील समृद्ध संस्कृती, दृष्टीकोन आणि कथानकांचा अविष्कार असलेल्या दर्जेदार चित्रपटांच्या प्रदर्शनासह, विविधता आणि सृजनशीलता अंगीकारून, भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एक नेत्रदीपक आणि अद्भुत सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
* * *
Jaydevi PS/Sanjana/Sushma/Rajshree/CYadav/DRane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978419)
Visitor Counter : 116