माहिती आणि प्रसारण मंत्रालय
54 व्या इफ्फीमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा 'भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष मान्यता' पुरस्काराने सन्मान
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2023
ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना आज ‘विशेष सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या चार दशकांच्या शानदार कारकीर्दीमध्ये, माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट उद्योगावर आपला अमीट ठसा उमटवला आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज गोव्यामध्ये पणजी इथे आयोजित 54 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या पुरस्काराची घोषणा केली.
“माधुरी दीक्षित यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या असामान्य प्रतिभेची छाप निर्माण केली आणि दीर्घ काळ जनमानसांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे”, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले.
वैविध्यपूर्ण भूमिका जिवंत करण्याच्या त्यांच्या क्षमतेने अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 'भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान' पुरस्कार माधुरी दीक्षित यांची अपवादात्मक कामगिरी आणि भारतीय सिनेमावरील त्यांचा दीर्घकालीन प्रभाव, याची प्रचीती देत आहे. 1980, 90 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमधील प्रमुख अभिनेत्री, माधुरी दीक्षित यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून, विक्रमी चौदा वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. माधुरी दीक्षित यांनी 'अबोध' (1984) या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि 'तेजाब' (1988) चित्रपटाने त्यांना व्यापक लोकमान्यता मिळवून दिली. 2014 मध्ये त्यांची भारतातील युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली होती.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978341)
Visitor Counter : 199