श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 17.21 लाख नवे सदस्य जोडले गेले
Posted On:
20 NOV 2023 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आज जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीत ईपीएफओमध्ये सप्टेंबर , 2023 मध्ये एकूण 17.21 लाख सदस्यांची भर पडली आहे. आधीच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2023 च्या तुलनेत 21,475 नव्या सदस्यांची भर पडली आहे. तर सप्टेंबर 2022 च्या तुलनेत 38,262 इतकी सदस्यसंख्या वाढली आहे.
आकडेवारी दर्शवते की सप्टेंबर 2023 मध्ये सुमारे 8.92 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. या नव्या सदस्यांमध्ये, 18-25 वर्षे वयोगटातील 18-25 वयोगटातील सदस्य हे या महिन्यादरम्यान जोडल्या गेलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या 58.92 % आहेत. यावरून असे दिसून येते की देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गात सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत, जे बहुधा प्रथमच नोकरी शोधणारे आहेत.
वेतनपट आकडेवारी दर्शवते की अंदाजे 11.93 लाख सदस्य बाहेर पडले आणि ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले. मागील महिन्याच्या तुलनेत, सप्टेंबर 2023 मध्ये 3.64 लाख सदस्य बाहेर पडले असून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत 12.17% ने घट झाली आहे. ईपीएफओ मधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या जून, 2023 पासून कमी होत आहे असेही आकडेवारीत अधोरेखित केले आहे.
लिंगनिहाय वेतनपट विश्लेषण असे दर्शविते की या महिन्यात जोडल्या गेलेल्या एकूण 8.92 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.26 लाख नवीन महिला सदस्य असून त्या प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील झाल्या आहेत. तसेच, महिन्याभरात दाखल झालेल्या एकूण महिला सदस्यांची संख्या 3.30 लाख इतकी होती.
वेतनपट आकडेवारीचे राज्यनिहाय विश्लेषण असे दर्शविते की महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्यांमध्ये नव्याने जोडली गेलेली ईपीएफओ सदस्य संख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यसंख्येत या राज्यांचा वाटा सुमारे 57.42 टक्के असून या महिन्यात एकूण 9.88 लाख सदस्यांची भर पडली आहे. सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र महिनाभरात एकूण 20.42 टक्के सदस्य संख्या जोडत आघाडीवर आहे.
उद्योग-निहाय आकडेवारीची मासिक तुलना साखर उद्योग, कुरिअर सेवा, लोह आणि पोलाद, रुग्णालये, ट्रॅव्हल एजन्सी इत्यादींमधील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते.
वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्यतनित करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मागील आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978280)
Visitor Counter : 133