आयुष मंत्रालय

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आयुष मंत्रालय यांच्यात पारंपरिक आणि पूरक औषध प्रकल्प सहकार्य करार

Posted On: 18 NOV 2023 5:30PM by PIB Mumbai

 

आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्यात काल रात्री जिनिव्हा येथे पारंपरिक आणि पूरक औषध प्रकल्प सहकार्य करार करण्यात आला. पारंपरिक आणि पूरक औषध प्रणालीचे प्रमाणीकरण करणे, राष्ट्रीय आरोग्य प्रणालीमध्ये त्यांचा दर्जा आणि सुरक्षाविषयक पैलूंचे एकात्मिकरण करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा प्रसार करणे या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या सहकार्य कराराच्या माध्यमातून पारंपरिक आणि पूरक औषध प्रणालीला राष्ट्रीय आरोग्य प्रणालीच्या मुख्य प्रवाहासोबत जोडले जाणार आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या पाठबळाने जागतिक आरोग्य संघटनेकडून पारंपरिक औषधांचे जागतिक धोरण 2025-34 तयार करण्यात येणार आहे.

सिद्धया पूरक औषध प्रणालीच्या क्षेत्रात प्रशिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय (प्रॅक्टिस) प्रणालीला बळकट करणे, पारंपरिक आणि पूरक औषधांना सूचीबद्ध करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करणे, सुरक्षा आणि संबंधित प्रयत्न अशा इतर प्रमुख उद्दिष्टांचा देखील या करारात समावेश आहे.

आयुष मंत्रालय आग्नेय आशियामध्ये सापडणाऱ्या वनौषधींचा एक आंतरराष्ट्रीय वनौषधी संदर्भग्रंथ, जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने तयार करणार आहे. औषधांचा गुणकारीपणाच्या सिद्धतेवर आधारित पारंपरिक आणि पूरक औषधांचे राष्ट्रीय आरोग्य प्रणालीसोबत एकात्मिकरण करण्याचे, जैवविविधता आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि व्यवस्थापन इ. करण्याचे प्रयत्न या करारांतर्गत करण्यात येणार आहेत.

यावेळी सर्वांचे अभिनंदन करताना केंद्रीय आयुष मंत्रालय सर्वानंद सोनोवाल म्हणाले की भारत हा प्राचीन काळापासून अनेक पारंपरिक आणि पर्यायी वैद्यकीय प्रणालींच्या संस्कृतीचे केंद्र राहिला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्रणालीला बळकट करण्यासाठी मंत्रालयाच्या या जागतिक प्रयत्नांमुळे आरोग्यनिगा सेवांच्या क्षेत्रात भारताची जागतिक पातळीवर नक्कीच ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977919) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu