नौवहन मंत्रालय

पंतप्रधान सागरी अमृतकाळ दृष्टिकोनाच्या यशासह जागतिक सागरी क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे भारताचे उद्दिष्ट : सर्बानंद सोनोवाल



परिवर्तनाच्या दिशेने कार्यरत भारतातील बंदरे जगातील अव्वल 25 बंदरांमध्ये असतील: सोनोवाल

Posted On: 17 NOV 2023 9:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

केंद्रीय बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग  आणि आयुष मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत मध्यावधी आढावा बैठक झाली. 2047 पर्यंत भारताला जागतिक सागरी नेतृत्व  बनवण्याच्या अंतिम उद्दिष्टासह ‘पंतप्रधान  सागरी  अमृतकाळ  दृष्टिकोन ’च्या गतिमान  आणि सुरळीत अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन निश्चित करण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सागरमाला या पथदर्शी कार्यक्रम आणि इतर पथदर्शी कार्यक्रमांसह मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रमांचा या बैठकीत  आढावा घेण्यात आला.या बैठकीत 1 ट्रिलियन रुपये  गुंतवणुक खर्चासह 162 प्रकल्पांच्या प्रगतीचीही माहिती घेण्यात आली.केंद्रीय बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनीही या बैठकीत सहभाग घेतला.

सागरी क्षेत्रातील जागतिक नेतृत्व   बनण्याच्या दृष्टीने भारत अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे, असे यावेळी बोलताना   सोनोवाल यांनी सांगितले.  पंतप्रधान   नरेंद्र मोदी जी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, अगदी महिनाभरापूर्वी मुंबईतील जागतिक सागरी भारत शिखर परिषदेमध्ये  सागरी अमृतकाळ  दृष्टिकोन ,2047 चा प्रारंभ करण्यात आला .   आपली  बंदरे जगातील अव्वल 25 बंदरांमध्ये येण्यासाठी आम्ही कार्यरत  आहोत.  2047 पर्यंत सागरी क्षेत्रात भारत जागतिक नेतृत्व  बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने दृष्टिपत्र प्रत्यक्षात उतरवण्याचे  उद्दिष्ट ठेवतानाच  आपण ‘पंच कर्म संकल्प’ सोडून देता  कामा नये",असे सोनोवाल यांनी सांगितले.

मे 2023 मध्ये 'चिंतन शिबिर' दरम्यान घोषित केलेल्या 'पंच कर्म संकल्प' अंतर्गत झालेल्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनलसह प्रमुख बंदर प्रकल्पांवरील चर्चेने या बैठकीची सुरुवात झाली. जागतिक बॅंकेने प्रकाशित केलेल्या वार्षिक "जागतिक क्रमवारी " मध्ये स्थान सुधारणे आवश्यक असल्यावर जोर देत  अव्वल  25 जागतिक बंदर क्रमवारीमध्ये  स्थान मिळवण्यासाठी बंदरांनी पुरेसे  प्रयत्न करण्याचे  आवाहन सोनोवाल यांनी यावेळी केले.

सध्या, सागरमाला कार्यक्रमांतर्गत, 2035 पर्यंत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने  5.74+ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे  800+ प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.  यापैकी 1.22 लाख कोटी रुपये खर्चाचे 237 प्रकल्प पूर्ण झाले असून 2.44 लाख कोटी रुपये खर्चाचे  262 प्रकल्प  कार्यरत  आहेत आणि 2.08 लाख कोटी रुपयांचे 310 प्रकल्प प्रगतीच्या  विविध टप्प्यांत आहेत.

गेल्या 9 वर्षांमध्ये, खलाशांच्या संख्येत 140% वाढ झाली आहे. सरकार, उद्योग हितसंबंधितांच्या  दृढ प्रयत्नांमुळे आणि आपल्या  सागरी समुदायाच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सागरी क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन घडले आहे.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1977761) Visitor Counter : 72