शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली,शिक्षणमंत्र्यांचे सत्र


राष्ट्रीय शिक्षण धोरण आराखडा 2020 हा एक तात्विक दस्तऐवज असून, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी तो प्रातिनिधिक दस्तऐवज ठरू शकेल: धर्मेंद्र प्रधान

Posted On: 17 NOV 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

नवी दिल्लीत सुरू असलेल्या, दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत सहभागी देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक आज केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या शिखर परिषदेची संकल्पना, सर्वांच्या विकासासाठी, परस्पर विश्वासाने एकत्रित येणे अशी असून, त्यात शिक्षणक्षेत्रात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होत आहे. या सत्रात, सर्व शिक्षण मंत्र्यांनी, ‘मनुष्यबळ भविष्या साठी सज्ज करणे’ ह्या संकल्पनेला धरून चर्चा केली.

जगाच्या ग्लोबल साउथ भागातील देश- बोत्सवाना, ब्रुनेई दारुसलाम, जॉर्जिया, ट्युनिशिया, इराण, लाओ पीडीआर, मलावी, म्यानमार, पलाऊ, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ साओ टोमे आणि प्रिन्सिप, अल्बानिया, मलेशिया, झिम्बाब्वे, कॅमेरून अशा14 देशांचे मंत्री / प्रतिनिधी  आभासी स्वरूपात या चर्चेत सहभागी झाले होते.

चर्चेची सुरुवात करतांना, धर्मेंद्र प्रधान यांनी, सर्व सहभागी मंत्र्यांचे स्वागत केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ग्लोबल साऊथचा आवाज जागतिक पातळीवर बुलंद करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

जी-20 शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत, या मुद्यांवर चर्चा करतांना भारताची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करत, प्रधान यांनी देशात एक लवचिक, समान, सर्वसमावेशक आणि शाश्वत शिक्षणव्यवस्था आणि कौशल्य विकास व्यवस्था निर्माण करण्यात परस्पर सहकार्य करण्याच्या महत्वावर भर दिला. जी 20 च्या दिल्ली जाहीरनाम्यात , मनुष्यबळ विकासात गुंतवणूक करण्याच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे, याची माहिती प्रधान यांनी दिली. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, भारताच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासाचे चित्र कसे बदलत असून देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहे, असेही ते म्हणाले.राष्ट्रीय शिक्षण धोरण हा एक तात्विक दस्तऐवज असून, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी हा प्रातिनिधिक दस्तऐवज म्हणून मार्गदर्शक ठरू शकेल. ज्याच्या मदतीने हे देश आपली सर्वंकष धोरणे जलदगतीने आखू शकतील, असे त्यांनी सांगितले. सामाईक आकांक्षांचे महत्त्व अधोरेखित करत, प्रधान यांनी त्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासावर आधारित, समान धोरणे आखण्यावर भर दिला.

इतर मंत्र्यांनी आपले विचार मांडतांना, शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या यशोगाथा, त्यांच्या समोरची आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी आखलेली धोरणे यांची माहिती दिली. ग्लोबल साऊथ देशांमध्ये, शिक्षण आणि कौशल्य विकासामधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांची सर्वांनी एकमुखाने प्रशंसा केली.

दर्जेदार शिक्षण, अध्ययन आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, समस्यांवर एकत्रित तोडगा काढणे, नवोन्मेष आणि उत्तम पद्धतींचे आदान प्रदान करण्यावर सर्व मंत्र्यांनी सहमती दर्शवली. त्याशिवाय, शैक्षणिक संस्थांमधे सहकार्य वृद्धिंगत करणे आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील परस्पर संवाद वाढवण्यास प्रोत्साहन देण्यावरही सहमती झाली.

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या पहिल्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेदरम्यान रचलेल्या पायावर ही  शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या  शिखर परिषदेत, ग्लोबल साउथच्या 125 देशांमधील आवाज आणि उद्दिष्टे एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते, ज्यात विकसनशील जगासाठीच्या  प्रमुख प्राधान्यांविषयी विशेषतः शिक्षण आणि कौशल्य विकास, याबद्दल भारताची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली

दुसऱ्या शिखर परिषदेचे उद्दिष्ट विविध जी-20 बैठकांमध्ये झालेल्या निष्कर्षांची अंमलबजावणी करणे, आधीच्या  शिखर परिषदेतून निर्माण झालेली गती टिकवून ठेवण्यासाठी आणि सर्वसमावेशक आणि न्याय्य आंतरराष्ट्रीय विकासासाठी सामायिक आकांक्षा साध्य करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणे हे आहे. विचारमंथनांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल दरी  कमी करण्यावर आणि जीवन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्यावर भर दिला जाईल. 22 नोव्हेंबर 2023 रोजी भारताने आयोजित केलेल्या आगामी G20 आभासी शिखर परिषदेसाठी, या शिखर परिषदेतून महत्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

शिखर परिषदेदरम्यान 8 मंत्रीस्तरीय सत्रे होणार आहेत.

 

 N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1977737) Visitor Counter : 65