गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छता क्षेत्रात 2014 पासून कायापालट झाला: गृहनिर्माण मंत्री हरदीप एस पुरी


अभूतपूर्व सहभागाने, स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप : हरदीप एस पुरी

स्वच्छ शौचालय चॅलेंजचा केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी केला प्रारंभ

Posted On: 17 NOV 2023 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

"स्वच्छता क्षेत्रात 2014 पासून कायापालट झाल्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार  मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे. ''वर्ष 2014 मध्ये केवळ 37% भारत हागणदारीमुक्त होता. शौचालयांच्या विक्रमी बांधकामामुळे  वर्ष 2019 पर्यंत आपण  संपृक्ततेच्या जवळ पोहोचलो", असे त्यांनी सांगितले.  'जागतिक शौचालय दिन' साजरा करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो.शौचालयांशी संबंधित पूर्वग्रह  दूर करून सर्वांसाठी, स्वच्छतेला, जागतिक  विकास प्राधान्य  करणे, हा यामागचा उद्देश आहे.  हा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे.स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य  समस्यांचे निराकरण करणारी स्वच्छतागृहे ही  भारताच्या स्वच्छता चळवळीचा  केंद्रबिंदू  राहिली आहेत.

वर्ष 2014 पासून सरकारने  स्वच्छतेकडे अधिकाधिक लक्ष पुरवले असल्याचे त्यांनी सांगितले.   हागणदारीमुक्त भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमेचा  शुभारंभ  2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधींना आदरांजली म्हणून पंतप्रधानांनी केला होता , याची आठवण त्यांनी करून दिली.

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरी भारतातील स्वच्छता परिदृश्यातील परिवर्तनाबाबत त्यांनी सांगितले.

मोहिमेअंतर्गत अत्यंत जलदगतीने शौचालये बांधण्यात आली. यामुळे हागणदारीमुक्त शहरी क्षेत्राचे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यात साहाय्य मिळाल्याचे पुरी यांनी नमूद केले.

स्वच्छ भारत अभियान -शहरी  हा  आचरणात परिवर्तन घडवून आणणारा  सर्वात मोठा कार्यक्रम आहे. हे अभियान  जन चळवळ बनली  असून त्याला अभूतपूर्व लोकसहभाग लाभला आहे, असे पुरी यांनी सांगितले.

या अभियानानाने महिला, मुली आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनात कशाप्रकारे  सकारात्मक बदल घडवून आणला आहे यावर  मंत्र्यानी प्रकाश टाकला.

भारतातील स्वच्छता क्षेत्रांतर्गत होत असलेल्या कामांमध्ये  वाढ करण्याची गरज  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांनी अधोरेखित केली. या स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी.समाजाने आणि स्वयंसेवी संस्थांनी या  प्रयत्नांमध्ये अधिकाधिक सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. ही चळवळ पुढच्या  स्तरावर नेण्यासाठी खासगी क्षेत्राचे महत्त्वही मंत्र्यांनी अधोरेखित केले.

आरोग्यविषयक खबरदारी  आणि स्वच्छता हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्ही लोकांच्या जीवनाला स्पर्श करू शकता आणि परिणाम खरोखरच समाधानकारक असतील, असे प्रतिपादन  पुरी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले .

या कार्यक्रमात 19 नोव्हेंबर, जागतिक शौचालय दिन ते 25 डिसेंबर, सुशासन दिन या कालावधीतील  5 आठवड्यांच्या स्वच्छ शौचालये चॅलेंजचा आरंभ करण्यात आला .  जागतिक शौचालय दिन 2023 च्या सुरक्षित स्वच्छतेसाठी वेगवान बदल या संकल्पनेशी सुसंगत अशी  या उपक्रमाची संकल्पना  आहे

स्वच्छता, सुलभता, रचनेमधील  नावीन्य, तसेच कार्यक्षमतेचे उदाहरण मांडणारे आदर्श सार्वजनिक शौचालय ओळखणे हा स्वच्छ शौचालय चॅलेंजचा  उद्देश आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ,   सरकारांना सेवा देणाऱ्या  पूर्णतः किंवा अंशतः  सरकारच्या  संस्था ,  खाजगी संस्था त्यांचे सर्वोत्तम मॉडेल सीटी/पीटी नामांकित करू शकतात. प्रत्येक अर्जदार फक्त 1 शौचालय मॉडेल नामांकित करू शकतो. 1 ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत अनोख्या परिचालन आणि देखरेख  मॉडेल्ससह सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शौचालयांना नामांकन मिळू शकते. यासठी  अर्ज  1 डिसेंबरपासून  मायगव्ह  (MyGov )पोर्टलवर थेट सादर करता येतील.   गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  या चॅलेंजद्वारे निवडलेल्या सर्वोत्कृष्ट आदर्श शौचालयाला  राष्ट्रीय मान्यता मिळेल आणि 2024 च्या सुरुवातीला प्रकाशित होणाऱ्या प्रकाशनात देखील त्यावर विशेष लेख असेल.

 

N.Chitale/S.Kakade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977729) Visitor Counter : 98