ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक व्यवहार विभागाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी 'सुरक्षा प्रतिज्ञा' संदर्भात (सेफ्टी प्लेज) संबंधित भागधारकांशी केली चर्चा


भारतात कार्यरत असलेल्या सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील वस्तूंचा दर्जा उंचावणे हे या 'सुरक्षा प्रतिज्ञेचे उद्दिष्ट आहे

Posted On: 16 NOV 2023 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2023

ग्राहकांच्या वापरासाठी सुरक्षित असलेल्या वस्तूंची विक्री सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यासाठी  एक मंच स्थापन करण्याच्या उद्देशाने ग्राहक व्यवहार विभागाने आज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी 'सुरक्षा प्रतिज्ञा' तयार करण्यासाठी भागधारकांशी सल्लामसलत केली.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध उद्योग संघटना, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, स्वयंसेवी ग्राहक संघटना आणि विधिज्ञ उपस्थित होते.

ग्राहकांसाठी वस्तूंच्या सुरक्षिततेचे महत्त्व आणि ग्राहकांना असुरक्षित वस्तूंची विक्री करणे रोखण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत तरतुदी, या संदर्भातील ग्राहक व्यवहार विभागाने केलेल्या सादरीकरणाने या बैठकीची सुरुवात झाली. युरोपियन संघ(EU), जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, कॅनडा यांसारख्या इतर देशांतील अधिकारक्षेत्रांमध्ये लागू केल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रतिज्ञांच्या आंतरराष्ट्रीय उदाहरणांवरही चर्चा करण्यात आली.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी सुरक्षा प्रतिज्ञाच्या प्रस्तावित तत्त्वांमध्ये असुरक्षित उत्पादनांची विक्री शोधून काढणे  आणि त्याचा  प्रतिबंध करणे, उत्पादने,उत्पादन सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या वैधानिक प्राधिकरणांशी सहकार्य करणे, किरकोळ विक्रेत्यांमध्ये ग्राहक उत्पादन सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि उत्पादन सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर ग्राहकांना सक्षम करणे,या बाबींचा समावेश आहे.

विभागाने सुरक्षा प्रतिज्ञेचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, स्वयंसेवी ग्राहक संघटना, उद्योग संस्था आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठांचे सदस्य यांचा समावेश आहे. समिती आपला अहवाल दोन आठवड्यांत सादर करेल.

या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये भारतीय उद्योग महासंघ, असोचेम,फिक्की,आयएएमएआय(IAMAI), नॅसकॉम,यासारख्या उद्योग संघटना, ऍमेझॉन फ्लिपकार्ट, मिशो , इत्यादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी, मुंबई ग्राहक पंचायत,कन्झुमर व्हाॅईस तसेच कायद्याशी संबंधित स्वयंसेवी संस्था, चेअर ऑन कन्झ्युमर लॉ,एनएलयू दिल्ली आणि चेअर ऑन कन्झ्युमर लॉ, एनएलएसआययू ,बेंगळुरू यासारख्या कायद्यांशी संबंधित स्वयंसेवी ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

सर्व भागधारकांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी 'सुरक्षा प्रतिज्ञा' प्रारंभ करण्याबाबत विभागाची प्रशंसा केली. ई-कॉमर्स चॅनेलद्वारे ग्राहकांना सुरक्षित वस्तूंची विक्री सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर सर्वांनी एकमताने दुजोरा दिला.  

 

S.Kakade/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1977509) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi