वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-अमेरिका व्यावसायिक संवादाच्या चौकटी अंतर्गत एका नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रमाच्या माध्यमातून नवोन्मेष परिसंस्था वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सामंजस्य करार
"‘डिकोडिंग द इनोवेशन हँडशेक’- अमेरिका- भारत उद्यमशीलता भागीदारी” नावाच्या नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रमाअंतर्गत उद्योगांच्या गोलमेज बैठकीला सुरुवात
Posted On:
15 NOV 2023 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023
भारत-अमेरिका व्यावसायिक संवादाच्या चौकटी अंतर्गत एका नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रमाच्या माध्यमातून नवोन्मेष परिसंस्था वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सॅनफ्रान्सिस्को येथे 14 नोव्हेंबर 2023 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून 2023 मध्ये झालेल्या ऐतिहासिक अधिकृत दौऱ्यादरम्यान नेत्यांच्या संयुक्त निवेदनामध्ये “ नवोन्मेषी हस्तांदोलन” उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
“‘डिकोडिंग द इनोवेशन हँडशेक’- अमेरिका- भारत उद्यमशीलता भागीदारी” नावाच्या नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रमाअंतर्गत सॅनफ्रान्सिस्को येथे उद्योगांच्या गोलमेज बैठकीमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अमेरिका-भारत व्यापार परिषद (USIBC) आणि भारतीय उद्योग महासंघ(CII) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आणि राष्ट्रीय सॉफ्टवेअर आणि सेवा कंपन्या संस्था (NASSCOM) आणि स्टार्ट अप इंडियाने पाठबळ दिलेल्या या कार्यक्रमात प्रमुख आयसीटी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हेंचर कॅपिटल फर्म्सचे कार्यकारी आणि महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान अवकाशातील स्टार्टअप्सच्या संस्थापकांनी अमेरिका-भारत तंत्रज्ञान सहकार्यात कशा प्रकारे वाढ करता येईल याविषयी चर्चा केली.
दोन्ही बाजूंच्या गतिशील स्टार्टअप परिसंस्थांना एकमेकांशी जोडणे, सहकार्यामधील विशिष्ट नियामक अडथळे दूर करणे, स्टार्टअप निधी उभारणीसाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि नवोन्मेष आणि रोजगार वृद्धी विशेषतः महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी भारत- अमेरिका उपक्रमांतर्गत (iCET) निर्धारित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
हा सामंजस्य करार सखोल तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यासाठी आणि महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान (CET) क्षेत्रामध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेचे संकेत देत आहे. आर्थिक व्यवहारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी विशेषतः सीईटी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट अप्समध्ये हे परिणाम दाखवण्यासाठी तो सज्ज आहे. हॅकॅथॉन आणि खुले नवोन्मेष कार्यक्रम, माहितीची देवाणघेवाण आणि इतर उपक्रमांसहित भारत-अमेरिका नवोन्मेष हस्तांदोलन कार्यक्रमांच्या मालिकेचा समावेश करण्यासाठी या सहकार्यात वाव असेल.
या घोषणेमुळे भारतामध्ये आणि अमेरिकेत 2024 च्या पूर्वार्धात होणाऱ्या दोन भावी नवोन्मेष हस्तांदोलन उपक्रमांचा पाया घातला गेला ज्यामध्ये अमेरिका आणि भारतीय स्टार्टअप कंपन्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादने बाजारात आणण्यास मदत करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक मंच आणि "हॅकथॉन"चा समावेश आहे.
हे संस्मरणीय पाऊल नवोन्मेषाला चालना देण्यासाठी, संधी निर्माण करण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या गतिमान क्षेत्रात परस्पर विकासाला चालना देण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. "नवोन्मेष हस्तांदोलन" हा उपक्रम अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्याच्या एका नवीन युगासाठी एक मंच तयार करत आहे.
व्यापार सुलभ करण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रांच्या विस्तृत श्रेणीमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने व्यापारी समुदायांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी, खाजगी क्षेत्रातील बैठकांच्या अनुषंगाने सरकार ते सरकार यांच्यातील नियमित चर्चा सुलभ करण्यासाठी, व्यावसायिक संवाद (CD) हा भारत आणि अमेरिका यांच्यातील मंत्रिस्तरीय स्तरावरील एक सहकारी उपक्रम आहे.
अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री गिना रायमांडो यांच्या 8 ते 10 मार्चच्या भारत भेटीदरम्यान 10 मार्च 2023 रोजी पाचव्या भारत-अमेरिका व्यावसायिक संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत पुरवठा साखळीच्या प्रतिरोधकक्षमता, हवामान आणि स्वच्छ तंत्रज्ञान सहकार्य, समावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन आणि महामारी पश्चात आर्थिक पूर्वावस्था प्राप्त करण्यावर विशेषत: लघु, मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सना पूर्वपदावर आणण्यावर भर देत व्यावसायिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला.
यामध्ये प्रतिभाविषयक नव्या कार्यगटाचा प्रारंभ, व्यावसायिक संवादांतर्गत नवोन्मेष आणि समावेशक वृद्धी यांचा समावेश होता. हा कार्य गट आयसीईटीच्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करणाऱ्या स्टार्टअप्सच्या प्रयत्नांना देखील पाठबळ देईल, विशेषत: सहकार्यामधील विशिष्ट नियामक अडथळे ओळखण्यात आणि आपल्या नवोन्मेष परिसंस्थेत अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवणे आणि संयुक्त व्यवहारांसाठी विशिष्ट कल्पनांद्वारे स्टार्ट-अपवर लक्ष केंद्रित करणे यासाठी हा पूरक ठरेल ही बाब विचारात घेण्यात आली.
N.Meshram/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977148)
Visitor Counter : 148