राष्ट्रपती कार्यालय

बालदिनानिमित्त विविध शाळा आणि संस्थांमधील मुलांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 14 NOV 2023 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2023

बालदिनानिमित्त विविध शाळा आणि संस्थांमधील मुलांनी आज (14 नोव्हेंबर, 2023) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र (RBCC) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

मुले हे देशाचे भविष्य आहेत, असे आपण अनेकदा म्हणतो. या भविष्याचे रक्षण करणे आणि त्याचे योग्य संगोपन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. आजच्या मुलांकडे तंत्रज्ञान आणि भरपूर माहिती आणि ज्ञान असल्याचे त्या म्हणाल्या. ही मुले देश-विदेशात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत. आपल्या मुलांच्या कलागुणांना योग्य दिशा देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुले इतरांप्रती अधिक संवेदनशीलता असतात. इतरांची दुःखे पाहून ते दु:खी होतात तर इतरांचा आनंद पाहून आनंदी होतात, असे त्या म्हणाल्या. मुलांच्या या वैशिष्ट्यांमुळे आपण त्यांना लहानपणापासूनच इतरांना मदत करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो तसेच त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल प्रेम आणि आदराची भावना निर्माण करु शकतो, असे त्यांनी सांगितले. मुलांना आरोग्य आणि पर्यावरणाच्या स्वच्छतेबद्दल जागरुक करणे देखील खूप महत्वाचे आहे यावर राष्ट्रपतींनी भर दिला.

जर मुलांनी त्यांची क्षमता ओळखली तसेच संपूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली तर ते निश्चितपणे आपले ध्येय साध्य करू शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. मुलांना वाचनाची सवय लावण्याची सूचना राष्ट्रपतींनी केली. पुस्तके सर्वोत्तम मित्र आहेत, या म्हणीची राष्ट्रपतींनी आठवण करून दिली. चांगली पुस्तके माणसाच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणतात, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींनी मुलांना महान व्यक्तिंची चरित्रे वाचण्याचा सल्ला दिला. त्यातून मुलांना प्रेरणा मिळेल आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी यांची मदत होईल, असे त्या म्हणाल्या.  

 

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976967) Visitor Counter : 87