वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसने आर्थिक वर्ष 2023-24 च्या आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गाठले 2 लाख कोटी रुपयांचे ऐतिहासिक सकल व्यापार मूल्य
Posted On:
13 NOV 2023 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023
उल्लेखनीय कामगिरी करत गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसने चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 2 लाख कोटी रुपयांचे एकूण व्यापार मूल्य गाठत एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या(2022-23) अखेरीस नोंद झालेल्या एकूण व्यापार मूल्याला मागे टाकले आहे. प्रतिदिन सरासरी एकूण व्यापार मूल्यात देखील लक्षणीय वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षात ते 850 कोटी रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक झाले आहे.
चालू आर्थिक वर्षातील या महत्त्वपूर्ण एकूण व्यापार मूल्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांमध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह केंद्रीय संस्थांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका खरोखरच उत्कृष्ट असून त्यांचे योगदान 83% आहे.
तसेच, राज्य सरकारांच्या उत्साहपूर्ण सहभागाने उर्वरित 17% योगदान दिले आहे. सार्वजनिक खरेदीवरील गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसचा परिवर्तनात्मक प्रभाव अधोरेखित करतो. उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, बिहार, आसाम, उत्तराखंड या राज्यांनी चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर दिल्या आहेत.
केंद्र आणि राज्य संस्थांमधील हे अतुलनीय सहकार्य सामंजस्यपूर्ण समन्वयाचे उदाहरण असून जीईएमला यशाच्या अभूतपूर्व उंचीवर नेत आहे.
याचा वेगवान अवलंब करण्यात सेवा क्षेत्रामधील जीईएमच्या विस्ताराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सेवा विभागातील ऑर्डर मूल्यात झालेली वाढ हा जीईएमच्या यशोगाथेतील गेल्या तीन वर्षांतील गुणात्मक वाढीतील सर्वात उज्ज्वल अध्याय आहे. या मंचाद्वारे व्यवहार झालेल्या एकूण ऑर्डर मूल्यातील योगदानामध्ये सेवा क्षेत्राने लक्षणीय वाढ दर्शवली असून आर्थिक वर्ष 21-22 मधील 23% वरून त्यात चालू आर्थिक वर्षात जवळपास 46% पर्यंत वाढ झाली आहे.
पोर्टलवर सुमारे 312 सेवा श्रेणी आणि 11,800 पेक्षा जास्त उत्पादन श्रेणींचा एक वैविध्यपूर्ण कॅटलॉग असून सर्व स्तरांवर सरकारी खरेदीदारांच्या गतिशील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते सुसज्ज आहे.
हा प्लॅटफॉर्म विशेषत: लहान आणि मध्यम उद्योग, महिला उद्योजक, स्टार्टअप आणि कारागीर यांच्यासारख्या उपेक्षित विक्रेत्या विभागांचे विशिष्ट संदर्भ आणि मर्यादा पूर्ण करतो. जीईएमचे यश खर्च बचतीप्रति समर्पित वृत्तीमध्ये असून यामुळे 2016 पासून सरकारची 45,000 कोटींपेक्षा जास्त बचत झाली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021-22 नुसार, 22 पैकी 10 वस्तूंसाठी जीईएमच्या किमती इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या तुलनेत 9.5% कमी होत्या. जीईएमचा परिवर्तनशील प्रवास हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रणित पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकतेचा दाखला आहे.
जीईएम विकसित होत असून केंद्र सरकारच्या डिजिटल परिवर्तनाचा आणि "मेक इन इंडिया" उपक्रमाचा कणा आहे, जो देशांतर्गत उत्पादित उत्पादने आणि सेवांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे .
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976717)
Visitor Counter : 117