ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लिंग-आधारित हिंसाचाराविरोधात ग्रामविकास मंत्रालयाच्या ‘नयी चेतना - 2.0’ या राष्ट्रीय मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नऊ मंत्रालये आली एकत्र


महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनी म्हणजेच  25 नोव्हेंबर रोजी  ‘नयी चेतना - 2.0’ चा प्रारंभ करण्यात येणार

23 डिसेंबर 2023 पर्यंत 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोहीम राबवण्यात येणार

या मोहीमेतील उपक्रम स्वयंसहायता गटाच्या सदस्यांमध्ये लिंग-आधारित हिंसेबाबत जागरुकता वाढवतील आणि लिंग-आधारित हिंसेच्या तक्रारी नोंदवण्यास प्रोत्साहन देतील

Posted On: 11 NOV 2023 4:12PM by PIB Mumbai

 

नऊ मंत्रालयांचा सहभाग असलेल्या एका आंतर-मंत्रालयीन बैठकीत  ग्रामीण विकास मंत्रालयाच्या डीएवाय -एनआरएलएम (दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीणउपजीविका अभियान),ने  - ' नई चेतना - 2.0' या लिंग-आधारित हिंसाचार विरुद्धच्या राष्ट्रीय मोहिमेच्या दुसऱ्या वर्षासाठी आपल्या योजना जाहीर केल्या. काल झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंह होते. ग्रामीण उपजीविका विभागाच्या सहसचिव स्मृती शरण यांनी या मोहिमेचा परिचय उपस्थित प्रतिनिधींना करून दिला. लिंग-आधारित हिंसाचारातून बचावलेल्यांसाठी एकत्रितपणे निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी समन्वय वाढवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते.

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनी म्हणजेच  25 नोव्हेंबर रोजी  नयी चेतना - 2.0’ मोहीम  सुरू केली जाणार आहे.  23 डिसेंबर 2023 पर्यंत 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोहीम राबवण्यात येणार आहे. वार्षिक मोहिमेचे नेतृत्व डीएवाय -एनआरएलएम च्या स्वयं-सहायता गटांच्या  9.8 कोटी ग्रामीण महिला सदस्या  जनआंदोलन किंवा लोकचळवळीच्या भावनेने करतील.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - 5 मधील आकडेवारीवरून दिसून येते की 77% पेक्षा जास्त महिला अजूनही त्यांच्यावरील  हिंसाचाराच्या अनुभवाबद्दल तक्रार करत नाहीत किंवा बोलत नाहीत. असे निष्कर्ष, तसेच देशभरातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या हिंसाचाराच्या अनुभवांमुळे या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले. नयी चेतना मोहिमेचे उद्दिष्ट महिला आणि लिंग-विविधता असलेल्या  व्यक्तींना निर्भय आणि लिंग-आधारित भेदभाव आणि हिंसाचार- मुक्त जीवनाचा हक्क मिळवून देणे हा आहे. या मोहीमेतील उपक्रम बचत  गटाच्या सदस्यांमध्ये लिंग-आधारित हिंसेबद्दल जागरुकता वाढवतील आणि त्याविरोधात तक्रारी दाखल करायला  प्रोत्साहन देतील.  अशा प्रकारच्या हिंसाचाराला मान्यता देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या सामाजिक निर्बंधांना देखील यामुळे चाप बसेल.

चर्चेदरम्यान , विविध मंत्रालयांनी उत्सुकता दर्शवली आणि मदत करता येईल अशी  विशिष्ट क्षेत्रे अधोरेखित केली. लिंग-आधारित हिंसाचार पीडितांच्या  पाठीशी उभे राहण्याच्या भूमिकेबद्दल सेवा प्रदात्यांना संवेदनशील करणे हे मुख्य काम असेल. यामुळे हिंसाचार पीडितांना बोलण्यासाठी आणि मदत व न्याय मागण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मोठी मदत होईल. सहभागी झालेल्या मंत्रालयांमध्ये पंचायती राज, महिला आणि बालविकास, गृह व्यवहार, कायदा आणि न्याय, माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा, शिक्षण आणि साक्षरता, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांचा समावेश होता.

ही मोहीम लिंग-आधारित हिंसाचार दूर  करण्याच्या  डीएवाय -एनआरएलएमच्या विद्यमान प्रयत्नांना पूरक ठरेल.  महिलांच्या निर्णयक्षमतेत वाढ करणाऱ्या बहु -लक्ष्यित उपक्रमांव्यतिरिक्त डीएवाय -एनआरएलएम तालुका स्तरावर लैंगिक संसाधन केंद्रे स्थापन करत आहे. यामुळे  एक समुदाय व्यवस्थापित व्यासपीठ उपलब्ध होईल जिथे  लिंग आधारित असमानता आणि भेदभावाचा निषेध केला जाऊ शकतो आणि यातील पीडित अशा समस्यांवर काम करणार्‍या इतर विभाग आणिसंस्थांच्या मदतीने उपाय शोधू शकतील . आतापर्यंत देशभरात 3000 हून अधिक लैंगिक संसाधन केंद्रे स्थापन झाली आहेत  आणि आणखी स्थापन करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.

ही मोहीम लिंग-आधारित हिंसाचाराच्या संदर्भात सामाजिक स्तरावर बदल घडवून आणण्याचा उद्देश असलेल्या  सर्व उपक्रमांना एकत्र आणण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1976421) Visitor Counter : 142