उपराष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, 2023 मध्ये पारंपरिक खेळांचा समावेश केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केली प्रशंसा
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप सोहळ्याला उपराष्ट्रपतींची उपस्थिती
खेळ हे मानवाच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहेत- उपराष्ट्रपती
क्रीडापटूंना पाठबळ देण्याचे उपराष्ट्रपतींचे उद्योग आणि खाजगी क्षेत्राला आवाहन
आपल्या खेळांडूना पाठबळ दिल्यामुळे देशाला न्याय मिळेल- उपराष्ट्रपती
जर भारत तंदुरुस्त असेल तरच प्रगती साध्य होईल- उपराष्ट्रपती
Posted On:
09 NOV 2023 7:13PM by PIB Mumbai
गोव्यामध्ये यंदा आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये क्रीडा प्रकारांच्या संख्येत वाढ केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. पारंपरिक खेळांच्या समावेशामुळे भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असल्याची बाब त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.या पारंपरिक खेळांना ऑलिंपिकच्या स्तरावर देखील त्यांच्या योग्यतेनुसार मान्यता मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभामध्ये ते आज बोलत होते.खेळांविषयी पालकांच्या भूमिकेत झालेल्या आमूलाग्र बदलाकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधले. “खेळांमध्ये बालकांचा जास्त सहभाग असल्यास पालकांना चिंता वाटण्याचे दिवस केव्हाच मागे पडले आहेत. खेळ हे मानवाच्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहेत”, उपराष्ट्रपती म्हणाले.
आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आणि 2036 मधील ऑलिंपिक स्पर्धांच्या आयोजनासाठी भारताच्या वतीने दावा करण्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाच्या भूमिकेच्या महत्त्वाकडेही त्यांनी लक्ष वेधले. खेलो इंडिया या उपक्रमामुळे गावांमध्ये स्टेडियम उभारले जाऊ लागले असल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची देखील प्रशंसा केली. भारत तंदुरुस्त असेल तरच प्रगती साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खेळाडूंच्या प्रवासात त्यांच्या प्रशिक्षकांच्या मध्यवर्ती भूमिकेवर भर देत त्यांचा उल्लेख त्यांनी ‘द्रोणाचार्य’ असा केला. आपल्या खेळाडूंना सर्वोत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार अतिशय सक्रीय पद्धतीने उचलत असलेल्या पावलांचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.
अमृत काळ म्हणजे गौरव काळ असल्याचे सांगत उपराष्ट्रपतींनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीने संपूर्ण जग चकित झाले असल्याकडे लक्ष वेधले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 उतरवून ही कामगिरी करणारा पहिला देश बनण्याच्या भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.
धनखड यांनी भारताच्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीचा देखील उल्लेख केला. 2022 मध्ये भारताने जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा बहुमान प्राप्त केला आणि 2030 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे बोधचिन्ह असलेल्या मोगा, या भारतीय गव्याचा संदर्भ देत उपराष्ट्रपतींनी सांगितले की तो कधीही पावले मागे न घेता पुढेच जाण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवत असतो. प्रत्येक खेळाडूने शिकण्याच्या दृष्टीने हे गुण अतिशय महत्त्वाचे आहेत, यावर त्यांनी भर दिला.
त्यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व लक्षात आणून देत, जिंकलेल्या पदकांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या महिला खेळाडूंची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. संकल्पना मांडल्यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर, अलीकडेच महिला आरक्षण विधेयक संमत होण्याची देखील त्यांनी प्रशंसा केली.
उपराष्ट्रपतींनी उद्योग आणि खाजगी क्षेत्राला खेळाडूंना पाठबळ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या पाठबळामुळे देशाला खूप मोठ्या प्रमाणात न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या संघाच्या अधिकाऱ्यांना आणि गोवा प्रशासनाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-2023 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पदके प्रदान केली .
केंद्रीय बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉ. पी. टी. उषा, गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976011)
Visitor Counter : 351