संरक्षण मंत्रालय

भारत -अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवादापूर्वी दिल्लीत पहिली इंडस -एक्स गुंतवणूकदार बैठक संपन्न


गुरुकुल नावाची इंडस-एक्स शैक्षणिक मालिका सुरू

Posted On: 08 NOV 2023 7:03PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयाचा संरक्षण उत्पादन विभाग आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) ने 8 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे 2+2 भारत-अमेरिका मंत्रीस्तरीय संवादाची पूर्व निदर्शक म्हणून पहिली इंडस-एक्स गुंतवणूकदार बैठक आयोजित केली. कार्यक्रमादरम्यान इंडस-एक्स शैक्षणिक मालिका (गुरुकुल) देखील सुरू करण्यात आली. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या संरक्षण नवोन्मेष युनिट (DIU) चे संचालक डग बेक यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले तर नियोजन अधिकारी (G) आणि आयडेक्स-डीआयओ चे प्रमुख कार्यान्वयन अधिकारी विवेक विरमानी यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. कार्यक्रमाचे संयोजन अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंच (यूएसआयएसपीएफ), इंडसटेक आणि mach33.aero (सोशल अल्फा) यांनी केले होते.

पहिल्या-वहिल्या इंडस-एक्स गुंतवणूकदार कार्यक्रमाने संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्ट-अप्स आणि एमएसएमई मधील गुंतवणूकदारांचे स्वारस्य आणि इंडस-एक्स उपक्रमांतर्गत उदयोन्मुख संधी स्पष्ट केल्या. परस्परसंवादी बैठकीने उभय देशातील स्टार्टअप/एमएसएमई, गुंतवणूकदार, इन्क्युबेटर्स, उद्योग क्षेत्रातील सर्व हितधारकांना एकत्रित अजेंडा आणि त्यावरील संधींवर चर्चा करण्यासाठी एकाच छताखाली आणले.

या कार्यक्रमात स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, सरकारी अधिकारी आणि संरक्षण उद्योगातील उद्योजकांसह 50 विचारवंत निवडक श्रोत्यांसह शिष्टमंडळस्तरीय विचारमंथनावरही भर होता. संरक्षण सहकार्य आणि सह-उत्पादनासाठी शाश्वत व्यावसायिक पाया स्थापन करण्यावर स्पष्टीकरण देत संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक संधीवर या शिष्टमंडळाने चर्चा केली.

गुंतवणूकदार-स्टार्ट-अप संपर्क सत्रात, आघाडीच्या भारतीय आणि अमेरिकन गुंतवणूकदारांनी, व्हेंचर कॅपिटल (साहसी उद्यम भांडवलदारांनी) आणि संरक्षण स्टार्ट-अप्सनी संरक्षण क्षेत्रासाठीच्या त्यांच्या योजना आणि परस्परांकडून असलेल्या अपेक्षांविषयी माहिती दिली. निवडक भारतीय आणि अमेरिकन स्टार्टअप्सनीही त्यांची पार्श्वभूमी आणि नवकल्पना प्रेक्षकांसमोर मांडल्या.

गुरुकुल उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषी/स्टार्टअप्सना अमेरिका आणि भारताच्या संरक्षण परिसंस्थेत वावरण्यासाठी मदत करणे हा आहे. गुरुकुल (शिक्षण) मालिकेत स्टार्टअप्स/इनोव्हेटर्ससाठी सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट धुरिणी, उद्योग मंच, इनक्यूबेटर/एक्सिलरेटर्स इत्यादींसह उभयपक्षी तज्ञांची सत्रे असतील.

सरकार, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमधील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान जून 2023 मध्ये भारत-अमेरिका संरक्षण प्रवेग व्यवस्था (इंडस -एक्स) सुरू करण्यात आली. इंडस -एक्स हा एक संरक्षण नवोन्मेष सेतू असेल ज्यामध्ये संयुक्त आव्हाने, संयुक्त नवोन्मेष निधी, अकादमी संलग्नता, उद्योग-स्टार्टअप संपर्क, संरक्षण प्रकल्पांमध्ये खाजगी संस्थांची गुंतवणूक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महत्वाचे तंत्रज्ञान प्रकल्प इत्यादींचा समावेश असेल.

***

R.Aghor/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1975764) Visitor Counter : 101


Read this release in: English , Urdu , Hindi