सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज नवी दिल्लीतील नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) द्वारे आयोजित 'सहकारातून सेंद्रीय उत्पादनांचा प्रचार' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधन


अमित शाह यांच्या हस्ते एनसीओएल चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे अनावरण आणि एनसीओएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निरोगी नागरिक, सुरक्षित जमीन, जलसंधारण आणि समृद्ध शेतकरी हे ध्येय साध्य करण्यात एनसीओएल महत्त्वाची भूमिका बजावेल.

Posted On: 08 NOV 2023 6:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) द्वारे आयोजित 'सहकारातून सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. अमित शाह यांच्या हस्ते एनसीओएल चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे अनावरण आणि एनसीओएल सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि एनसीओएलचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवाच्या वर्षात निर्धारित केलेल्या अनेक उद्दिष्टांपैकी नैसर्गिक शेती हे एक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला अनेक आघाड्यांवर काम करावे लागेल आणि त्यांच्यात समन्वय साधून वाटचाल करावी लागेल असे भाषणादरम्यान अमित शाह यांनी सांगितले. भारतात नैसर्गिक शेती 50 टक्क्यांच्या वर नेण्याचे उद्दिष्ट बहुआयामी दृष्टिकोनाशिवाय गाठता येणार नाही आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आज पूर्ण झालेली ही तीन कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी उद्धृत केले. भारतासाठी ही अत्यंत समाधानाची बाब आहे की आज आपण कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात केवळ आत्मनिर्भर नसून अतिरिक्त आहोत आणि या प्रवासाचे मूल्यमापन करावे लागेल असे मत त्यांनी मांडले. उत्पादन वाढवण्यासाठी खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम आज आपल्याला जाणवत आहेत. त्यांच्या अतिवापराने सुपीकता कमी होण्याबरोबरच जमीन आणि पाणी प्रदूषित झाले आहे आणि अनेक आजारांनाही आमंत्रण मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगताना गेल्या 5-6 वर्षांत देशातील लाखो शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केला असून अशा शेतकऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, योग्य प्रमाणपत्राशिवाय शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 जानेवारी 2023 रोजी नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) ची स्थापना करण्यास मान्यता दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील नैसर्गिक शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांच्या विपणनाची व्यवस्था करण्यासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑरगॅनिक्स लिमिटेडची स्थापना करण्यात आल्याचे केंद्रीय सहकार मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज भारत ऑरगॅनिक्सची 6 उत्पादनेही बाजारात आली आहेत. आगामी काळात भारत ऑरगॅनिक्स केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक सेंद्रिय बाजारपेठेतील सर्वात विश्वासार्ह आणि सर्वात मोठा ब्रँड बनेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील छोट्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी अर्थव्यवस्था बळकट केली आहे असे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व शेतकरी सहकाराच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीशी जोडले गेले तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धारित केलेली निरोगी नागरिक सुरक्षित जमीन, सुरक्षित पाणी आणि समृद्ध शेतकरी ही चार उद्दिष्टे आपण साध्य करू शकू.

"सहकार से समृद्धी" या मंत्राने सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्र, छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी, 8 लाखाहून अधिक नोंदणीकृत सहकारी संस्था आणि देशातील 90 टक्के लोक सहकारी चळवळीत सामील झाल्याची माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी दिली.

दीर्घकालीन बाजार योजना तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाद्वारे (एनपीओपी) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असण्याची निकड अमित शाह यांनी व्यक्त केली.

***

R.Aghor/V.Joshi/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975746) Visitor Counter : 134