रसायन आणि खते मंत्रालय

वैद्यकीय उत्पादनांचे नियमन आणि वैद्यकीय उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सहकार्य करण्याच्या इरादा पत्रावर भारत आणि नेदरलँड्सने केली स्वाक्षरी

Posted On: 08 NOV 2023 4:22PM by PIB Mumbai

 

नेदरलँड्समधील हेग शहरात, भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी वैद्यकीय उत्पादन नियमन तसेच वैद्यकीय उत्पादने आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सहकार्य करण्याच्या एका इरादा पत्रावर(MoI) स्वाक्षरी केली. केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी नेदरलँड्सचे आरोग्य, कल्याण आणि क्रीडा मंत्री अर्न्स्ट कुइपर्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या इरादा पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.

6 ते 8 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नेदरलँड्समधील हेग येथे आयोजित दुसऱ्या जागतिक स्थानिक उत्पादन मंच (WLPF) बैठकीत सहभागी होण्यासाठी खुबा यांच्या नेतृत्वाखाली एक भारतीय प्रतिनिधीमंडळ नेदरलँडमध्ये गेले आहे. औषधे आणि इतर आरोग्य तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने जागतिक स्थानिक उत्पादन मंच हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले आहे.

खुबा यांनी  युरोपियन मेडिसिन एजन्सीला (EMA) देखील भेट दिली. खुबा यांनी औषध निर्माण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका कार्ला व्हॅन रुइजेन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी औषध निर्माण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान उद्योगातील नियमांबद्दल भरीव चर्चा केली.

आपल्या या भेटीदरम्यान खुबा यांनी युरोपातील सर्वात मोठे बंदर रॉटरडॅम बंदराला भेट दिली आणि बंदराच्या हायड्रोजन हबच्या योजनांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बौडविजन सिमन्स यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रॉटरडॅम हे हायड्रोजन उत्पादन आणि वाहतुकीचे उदयोन्मुख केंद्र आहे. भारताचे हरित हायड्रोजन मिशन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक नेता बनण्याचे भारताचे उद्दिष्ट देखील खुबा यांनी या भेटीत सामायिक केले.

खुबा यांनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी बिल्थोव्हेन बायोलॉजिकल (सायरस पूनावाला ग्रुप) लाही भेट दिली.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1975690) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu