शिक्षण मंत्रालय
गुजरातमध्ये दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठे उघडण्याची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री खासदार जेसन क्लेअर यांची घोषणा
Posted On:
07 NOV 2023 6:19PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष खासदार जेसन क्लेअर यांच्यासमवेत आज गांधीनगर येथील वॉलोंगॉन्ग आणि डीकिन विद्यापीठांच्या आगामी संकुलांच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांना संकुलांची उभारणी आणि भावी योजनांबद्दल अवगत करण्यात आले.
गिफ्ट सिटी येथे संकुल उभारण्याची औपचारिक घोषणा करणाऱ्या 'आरंभ' (द बिगिनिंग) या कार्यक्रमात मंत्री उपस्थित होते. भारतीय भूमीवर परदेशी विद्यापीठे सुरु करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. भारतातील ऑस्ट्रेलियन विद्यापीठ संकुल उभारणीचा सोहळा साजरा करण्यासाठी प्रख्यात मान्यवर, मंत्री आणि शैक्षणिक धुरिणींना एकत्र आणून उद्घाटनाच्या आरंभ कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा कोरला गेला आहे.
डीकिन आणि वॉलोंगॉन्ग विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कोविड-19 महामारीसारख्या आव्हानात्मक काळातही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमधील लक्षणीय वाढ अधोरेखित करून दोन देशांमधील भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी भारतात विद्यापीठ संकुल उभारणीपासून नियोजित अभ्यासक्रमांसह भविष्यातील योजना सामायिक केल्या.
यावेळी प्रधान यांनी विद्यार्थी आणि शैक्षणिक समुदायाला नवीन ‘आरंभ’ साठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, परदेशी विद्यापीठ संकुले भारतातील अभ्यास सुलभ करतील आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कल्पिल्याप्रमाणे एक बळकट, वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण तयार करतील.
दुपारी, दोन्ही मंत्र्यांनी ‘संशोधन संवाद: संशोधन सहकार्यात नवीन क्षितिज’ या परिषदेला संबोधित केले. संपन्न संशोधन परिसंस्थेमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण संधींचा धांडोळा घेणे हा या परिषदेचा उद्देश होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संशोधन सहयोग अधिक दृढ करण्याच्या नवीन संधींना उत्प्रेरित करण्याच्या उद्देशाने प्रधान यांनी ‘संशोधन संवाद’ मध्ये मत मांडले. समाजाच्या मोठ्या फायद्यासाठी संशोधन हे प्राधान्य क्षेत्र असावे; ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही देश परस्पर समृद्धी आणि जागतिक कल्याणासाठी संशोधनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975496)
Visitor Counter : 136