संरक्षण मंत्रालय

संरक्षण दलातील महिलांच्या मातृत्व, बाल संगोपन आणि बालक दत्तक रजेसाठी संरक्षण मंत्र्यांनी दिली मंजूरी

Posted On: 05 NOV 2023 10:04AM by PIB Mumbai

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला सैनिक, खलाशी आणि वायुदलात कार्यरत महिला योद्ध्यांसाठी मातृत्व, बाल संगोपन आणि बालक दत्तक रजेचे नियम, त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. नियम अंमलात आल्यावर सैन्यदलातील सर्व, म्हणजेच अधिकारी किंवा इतर कोणत्याही पदावरील महिलांना या रजा समान प्रमाणात लागू होतील.

सशस्त्र दलांमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत सर्व महिलांच्या समावेशक सहभागाच्या संरक्षण मंत्र्यांच्या संकल्पनेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. रजेच्या नियमांमधील विस्तार सशस्त्र दलांमध्ये कार्यरत महिलांशी संबंधित कौटुंबिक आणि सामाजिक समस्या हाताळण्यासाठी दीर्घकालीन उपाय ठरेल. या उपायामुळे लष्करातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार आहे. त्यांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाच्या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने संतुलन राखण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.

नारी शक्तीचा सदुपयोग करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची वचनबद्धता अधोरेखित करत, तिन्ही सशस्त्र दलांनी महिलांना सैनिक, खलाशी आणि वायुदल योद्धा म्हणून समाविष्ट करत आदर्शवत परिवर्तन घडवून आणले आहे. महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे देशाच्या  भूमी, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, खलाशी आणि वायुदल योद्धा यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीने सशस्त्र दले अधिक सक्षम होतील.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये कार्यरत असण्यापासून ते युद्धनौकांवर तैनात होणे तसेच अवकाशावर अधिराज्य गाजवण्यापर्यंत सशस्त्र दलातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील अडथळ्यांवर भारतीय महिला आता मात करत आहेत. वर्ष 2019 मध्ये, भारतीय सैन्यातील लष्करी पोलिसांच्या तुकडीत महिलांची सैनिक म्हणून भरती करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला होता. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने कार्यरत रहावे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नेहमीच मानत आले आहेत.

****

Shilpa P/ Sandesh N/CYadav 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974803) Visitor Counter : 128