वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कृत्रिम बुद्धिमत्ता हे गरिबीशी लढा देण्यासाठी, दुर्गम भागात वस्तू आणि सेवा पोहोचवण्यासाठी तसेच भविष्यासाठी कामगारांमध्ये पुन्हा कौशल्य निर्माण करण्याचे शक्तिशाली साधन आहे: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल


भारत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक स्तरावर अग्रस्थानी असेल आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप प्रणालीमध्ये आपली विशेष ओळख निर्माण करेल : गोयल

Posted On: 04 NOV 2023 7:41PM by PIB Mumbai


कृत्रिम बुद्धिमत्ता हे गरिबीशी लढा देण्यासाठी, दुर्गम भागात वस्तू आणि सेवा पोहोचवण्यासाठी आणि भविष्यासाठी कामगारांमध्ये पुन्हा कौशल्य निर्माण करण्याचे एक शक्तिशाली साधन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित 'स्लश'डीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी गोयल यांनी विघटनकारी तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि जगातील समस्या सोडवण्यासाठी तसेच मानवाचे जीवनमान उंचावण्यासाठी  कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले. मंत्र्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक नेता म्हणून भारताची भूमिका स्पष्ट केली आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप प्रणालीमध्ये देशाची वाढती ओळख अधोरेखित केली. भारताची ताकद बहुसंख्य तरुण लोकसंख्या, अफाट डेटा संसाधने आणि उद्योजकीय संस्कृतीमध्ये आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोयल यांनी भारतीय स्टार्टअप्सना महत्त्वाकांक्षी होण्यासाठी, नवोपक्रमाचे स्वागत करण्यासाठी आणि पुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहित केले. भारताकडे खूप काही करण्यासारखे असले तरी, देशाचा कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचा उत्साह अजूनही कमी आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताचे भविष्य आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ घेण्यासाठी नवोन्मेष आणि पुनर्कौशल्यासाठीच्या वचनबद्धतेमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांनी अनेक स्टार्टअप्ससमोर असलेल्या विविध आव्हाने आणि अपयशांची नोंद घेतली आणि सोबतच निरंतर प्रयत्न सुरू ठेवण्याच्या स्टार्टअप्सच्या लवचिकतेची आणि दृढनिश्चयाची प्रशंसा केली. भारतातील तरुणांची परिवर्तनशील शक्ती आणि देशाच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्याची तरुणांची क्षमता गोयल यांनी अधोरेखित केली.

आधुनिक भारतीय स्टार्टअप यापुढे पारंपारिक उद्योजकीय मार्गांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, यावर गोयल यांनी यावर भर दिला. नावीन्यपूर्ण शोध घेणे, डेटाचा फायदा घेणे आणि विद्यमान नियमांच्या पलीकडे विचार करणे हे आजच्या स्टार्टअप्सचे खास वैशिष्ट्य आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय तरुणांनी जर मोठ्या आणि धाडसी ध्येयांवर लक्ष केंद्रित केले तर सध्या भरभराटीस येत असलेली देशाची स्टार्टअप प्रणाली जगातील सर्वोच्च पदावर पोहोचेल, अशी आशा पीयूष गोयल यांनी व्यक्त केली. भारताची नवउद्योजकता राष्ट्राला नावीन्य, सर्जनशीलता आणि समृद्धीसह उज्वल भविष्याकडे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात भारताच्या वाढत्या स्टार्टअप प्रणालीमधील चैतन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण सहभागी एकत्र आले होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974771) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu