आयुष मंत्रालय
‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशासह देशभरातील 11 शहरांमध्ये युवकांची बाईकर्स रॅली निघणार
10 नोव्हेंबर रोजी देशभरात ‘आयुर्वेद दिन’ साजरा होणार
नवी दिल्ली येथील बाईकर्स रॅलीमध्ये 20 दिव्यांग तरुण सहभागी होणार
येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली, लखनौ, नागपूर, चेन्नई,जयपूर,पतियाळा,ग्वाल्हेर,हैदराबाद,विजयवाडा,थिरूवनंतपुरम आणि अहमदाबाद येथे या बाईकर्स रॅलीजचे आयोजन
Posted On:
04 NOV 2023 6:29PM by PIB Mumbai
देशभरात ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी देशातील 11 शहरांमध्ये देशव्यापी बाईकर्स रॅलीजचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेत विविध शहरांमध्ये या रॅलीज निघतील. देशभरातील युवकांना आयुर्वेद दिनाच्या ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या जागतिक संदेशाशी जोडून घेणे तसेच आयुर्वेदाचा समृध्द वारसा आणि सामान्य जनतेच्या स्वास्थ्यासाठी आयुर्वेदामध्ये असलेला समग्र दृष्टीकोन यांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दिल्ली आणि पतियाळा येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (सीएआरआय), लखनौ, नागपूर, जयपूर, विजयवाडा, थिरूवनंतपुरम आणि अहमदाबाद या शहरांतील राष्ट्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (आरएआरआय), चेन्नई येथील डॉ.ए.लक्ष्मीपती राष्ट्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि कॅप्टन श्रीनिवास मूर्ती केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि हैदराबाद येथील एनआयएमएच (राष्ट्रीय वैद्यकीय वारसा संस्था) यांच्यातर्फे या शहरांतील तरुण बाईकर्सच्या गटांच्या सहयोगाने या रॅलीजचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुष तसेच बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की देशातील युवकांना ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या अभियानाशी जोडून घेऊन सशक्त आणि निरोगी भारताचे भविष्य उभारता येईल. भारतातील हजारो वर्ष प्राचीन आयुर्वेदिक वैद्यकीय संस्कृतीला जागतिक मंचावर घेऊन जाणे आणि आयुर्वेदाला संपूर्ण जगातील सामान्य लोकांच्या जीवनशैलीचा भाग बनवणे हा आयुर्वेद दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. विविध शहरांमधून निघणाऱ्या या बाईकर्स रॅलीज त्या त्या भागांतील युवकांना आयुर्वेदाचा तसेच देशातील इतर पारंपरिक वैद्यकीय प्रणालींचा स्वीकार करण्याच्या दिशेने चालना देतील.
आयुर्वेद आणि देशातील इतर पारंपरिक वैद्यकीय प्रणालींच्या प्रती वचनबद्धता दर्शवण्यासाठी बाईकर्स रॅलीमध्ये 20 दिव्यांग तरुणांचा गटदेखील सहभागी होणार आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे 9 आणि 10 नोव्हेंबर 2023 रोजी हरियाणा मधील पंचकुला येथे आयुर्वेद दिनाचे मुख्य कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यापूर्वी, लहान मुले, किशोरवयीन, तरुण आणि सामान्य जनतेसाठी आयुर्वेद अत्यावश्यक आहे हा संदेश देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या रॅलीजचे आयोजन करण्यात आले आहे. आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त देशात महिनाभर विविध कार्यक्रम होणार असून त्याचे पुढील तीन मुख्य घटक असतील- विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद, शेतकऱ्यांसाठी आयुर्वेद आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेद.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974769)
Visitor Counter : 119