इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा शिखर परिषद 2023 च्या 2 ऱ्या दिवशी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षा आणि विश्वासार्हतेबाबत तसेच जगभरातील नागरिकांसाठी या मंचाच्या उत्तरदायित्वाविषयी भारताची निर्णायक भूमिका


डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जीपीएआय आणि इंडिया एआय शिखर परिषदेसाठी भारताचे सर्व देशांना निमंत्रण

मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या आयर्लंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड सोबत द्विपक्षीय बैठका

Posted On: 02 NOV 2023 8:01PM by PIB Mumbai

 

भारताने, कृत्रिम बुद्धिमत्तेत जागतिक भागीदारी (जीपीएआय) चे अध्यक्ष म्हणून त्याच्या अधिकारात, एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत निर्णायक भूमिका घेतली आहे. एआय ही वापरकर्त्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह तसेच मंचाचे  उत्तरदायित्व या तत्त्वांवर आधारित असावी यावर आम्ही ठाम राहिलो,” असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ब्रिटनमधील बकिंगहॅमशायर येथील ब्लेचले पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा शिखर परिषद 2023 च्या दुसऱ्या दिवशी  सांगितले.

डिसेंबर 2023 मध्ये नियोजित आगामी जीपीएआय आणि इंडिया एआय शिखर परिषदेसाठी मंत्र्यांनी सर्व देशांना निमंत्रण दिले. "मंत्रिमंडळस्तरीय गोलमेज परिषद: कृती रचना आणि भविष्यातील सहयोगासाठी पुढील पावले" या दोन सत्रांमधील  मंत्र्यांच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर हे आहे. येथे, त्यांनी "फ्रंटियर एआय आणि भविष्यातील सहकार्याच्या जोखमींबद्दल सामायिक समज निर्माण करणे" आणि "एआय साठी जागतिक संधी सामायिक करणे" याच्या महत्वावर चर्चा केली, जिथे त्यांनी सार्वजनिक सेवा वाढविण्यासाठी एआय आणि तंत्रज्ञानाच्या संधींवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे - आम्ही लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आणि वापरकर्त्यांना होणारी हानी कमी करण्यासाठी सुरक्षितता, विश्वास आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. जगभरातील नागरिकांच्या अधिकाधिक भल्यासाठी , प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी एआय वापरण्याचे तत्त्व सामायिक करणार्‍या सर्व समविचारी देशांमधील एकमत वाढत आहे,” असेही राजीव चंद्रशेखर म्हणाले.

1 नोव्हेंबर रोजी, शिखर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व राष्ट्रांनी "द ब्लेचले डिक्लेरेशन" ला सहमती दर्शविली. हा दस्तावेज कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला मानवी हेतूंशी सुसंगत करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेच्या अधिक सखोल अन्वेषणास प्रोत्साहित करतो.

मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि आयर्लंडमधील समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.

ब्रिटनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बौद्धिक संपदा विभागाचे राज्यमंत्री विस्कॉउंट कॅमरॉस यांच्याशी चर्चा करताना, त्यांनी एआय मुळे उद्भवणार्‍या वापरकर्त्याच्या हानीशी संबंधित संभाव्य जोखमींचा शोध घेतला आणि येत्या काही महिन्यांत या क्षेत्रातील मूर्त प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे वचन दिले. ऑस्ट्रेलियाचे उद्योग आणि विज्ञान मंत्री एड हुसिक एमपी यांच्यासोबत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा, प्रतिभावंतांचे समुदाय उभारण्यासाठी सुरु असलेल्या तसेच उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रातील सहयोगी संबंधांमध्ये वाढ करणे, सेमीकंडक्टर परिसंस्था तसेच सायबर सुरक्षा यांच्यावर आधारलेली होती.

या बैठकीदरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात भारताने केलेली लक्षणीय प्रगती तसेच ऑस्ट्रेलियातील प्रतिभावंतांच्या समुदायाला भारताने कशा प्रकारे मूल्यवर्धन केले आहे आणि त्यात योगदान दिले आहे हे सांगण्यावर अधिक भर दिला.जी-20 समूहाच्या बैठकीनंतर भारत आणि जगाच्या दक्षिणेकडील देशांमध्ये असलेल्या प्रचंड तांत्रिक क्षमतेला जग अधिकाधिक प्रमाणात मान्यता देऊ लागले आहे हे देखील त्यांनी ठळकपणे सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री ऑस्ट्रेलियाचे उद्योग आणि विज्ञान मंत्री एड हुसिक एमपी यांना देखील भेटले आणि उदयोन्मुख तसेच महत्त्वाच्या तंत्रज्ञानांच्या क्षेत्रातील विद्यमान सहयोगी संबंध बळकट करणे, सेमीकंडक्टर परिसंस्था तसेच सायबर सुरक्षा यांच्या संदर्भात चर्चा केली.

केंद्रीय राज्यमंत्र्यांचे डच समकक्ष आणि नेदरलँड्सच्या किंग्डम रिलेशन्स आणि डिजीटायझेशन  सचिव अलेक्झांड्रा व्हॅन हफलीन यांची देखील भेट घेतली आणि सध्याच्या जलदगतीने नवनव्या संशोधनांच्या जगात हरवून जाण्याची परिस्थिती कशी टाळता येईल यावर चर्चा केली.

लोकशाही राष्ट्रांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत काय केले पाहिजे आणि काय करू नये याबाबत आपण एकमत निर्माण केले पाहिजे जेणेकरून वेगाने विकसित होत असलेल्या या नाविन्यपूर्ण जगात आपण मागे पडणार नाही याची सुनिश्चिती होईल. विविध मंचाचे संरक्षक बांध निश्चित करण्यासाठी आपण देशादेशांमध्ये संस्थात्मक आराखडा निर्माण करणे आणि त्यातून जबाबदारीची भावना वाढवणे गरजेचे आहे,” केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.

शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल आयर्लंडचे व्यापार प्रोत्साहन, डिजिटल आणि कंपनी नियामक मंत्री दारा कॅलीअरी यांच्याशी झालेल्या केंद्रीय राज्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये दोन्ही मंत्र्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात वाढीव संधींचा शोध घेण्यावर भर दिला.

एकसारख्या पद्धतीने विचार करणारे देश कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगाच्या भल्यासाठी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास मला वाटतो. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्र आपल्या भविष्यासाठी अनेक संधी घेऊन आले आहे. आज 800 दशलक्षाहून अधिक भारतीय आज इंटरनेट चा वापर करत आहेत आणि खोट्या तसेच चुकीच्या माहितीमुळे होणारे नुकसान आम्ही पाहिले आहे. हे संभाषण आता केवळ शैक्षणिक माहितीच्या स्वरूपातील उरलेले नाही. आपण भूतकाळात इंटरनेटचे शस्त्रीकरण झालेले देखील बघितले आहे. त्यामुळे आता सर्व देशांनी एकत्र येऊन भविष्यासाठी संरक्षण बांध निर्माण करण्याच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काय केले पाहिजे आणि काय करू नये याबाबतचर्चा केली पाहिजे,” केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले.

***

S.Patil/V.Joshi/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1974322) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam