संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बेंगळुरू येथे ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’ चे उद्घाटन
"लघुउद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा"
"सक्रिय उद्योग सहभागाद्वारे, भारत लवकरच 'आत्मनिर्भर' आणि जागतिक उत्पादन केंद्र बनेल"
Posted On:
02 NOV 2023 3:58PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 02 नोव्हेंबर 2023 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे तीन दिवसीय ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’ अर्थात भारतीय उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन केले. लघु उद्योग भारती आणि आयएमएस फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने पाठबळ दिले आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे लघु उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे उद्घाटन समारंभात उपस्थित उद्योगपती आणि तरुण उद्योजकांना संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी उद्धृत केले. अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्याचे श्रेय लघु उद्योगांना देताना “लघु उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रेरक आहेत. मोटारीच्या वेगाने अर्थव्यवस्थेचे वाहन चालते,” असे ते म्हणाले.
देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या उद्योगांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर राजनाथ सिंह यांनी प्रकाश टाकला. “गुंतवणुकीच्या तुलनेत लघु उद्योग हे मोठ्या उद्योगांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करतात. ते समाजात संपत्ती अधिक खेळती ठेवणे सुनिश्चित करतात. अनेक एमएसएमई निर्यातीत चांगली कामगिरी करत आहेत आणि जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनत आहेत. देशाच्या विकासात अवजड उद्योगांचाही मोठा वाटा आहे, पण लघु उद्योगांकडे दुर्लक्ष करून देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही,” ते म्हणाले.
मोठ्या उद्योगांपेक्षा लघु उद्योगांमध्ये बदलांशी सहजपणे जुळवून घेण्याची क्षमता असते हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. “छोट्या उद्योगांची अनुकूलता ही नवोन्मेषाच्या संधी वाढवते. बर्याच वेळा, लहान उद्योग हे नवीन उत्पादने, सेवा आणि व्यवसाय मॉडेलच्या बाबतीत मोठ्या उद्योगांपेक्षा अधिक नाविन्य आणतात,” ते म्हणाले.
सहावे ‘भारतीय उत्पादन प्रदर्शन’ प्रदर्शकांना त्यांचे तंत्रज्ञान, उपकरणे आणि विविध क्षेत्रातील संशोधन आणि विकास, जसे की, एरोस्पेस आणि संरक्षण अभियांत्रिकी, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि ड्रोनचे प्रदर्शन करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देईल. सहभागींना व्यवसाय आणि माहिती आदान-प्रदानाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वोत्कृष्ट विचार, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींचा मिलाफ करण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974227)
Visitor Counter : 147