श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ चा 71 वा स्थापना दिन सोहळा
ईपीएफओ ही सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित संस्था बनण्यावर भूपेंद्र यादव यांचा भर, ईपीएफओ यावर्षी 8.15% व्याज देत असल्याबद्दल आणि 24 कोटींहून अधिक खात्यांमध्ये आधीच व्याजाची रक्कम वर्ग केल्याबद्दल व्यक्त केले समाधान
सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी भविष्य निधी पुरस्कार 2023 ने सन्मानित
Posted On:
01 NOV 2023 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या 71व्या स्थापना दिनाचे आभासी माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली, श्रम आणि रोजगार सचिव आरती आहुजा आणि केंद्रीय पीएफ आयुक्त नीलम शमी राव, ईएसआयसी चे महासंचालक डॉ. राजेंद्र कुमार हे देखील यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांतील ईपीएफओ चा चढता आलेख आणि सदस्यांच्या बचतीच्या मोठ्या निधीचे करत असलेले व्यवस्थापन याबद्दल भूपेंद्र यादव यांनी संतोष व्यक्त केला. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला जिल्हा स्तरावर प्रत्येक ईपीएफओ कार्यालयाद्वारे आयोजित केलेल्या 'निधी आपके निकट' या संपर्क कार्यक्रमाचीही त्यांनी प्रशंसा केली. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की ईपीएफओ ने 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि कश्मीरमधील कामगार वर्गासाठी लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदींचा विस्तार केला आहे.
यादव यांनी ईपीएफओला सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित संस्था बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. ईपीएफओ यावर्षी 8.15% व्याज देत असून 24 कोटींहून अधिक खात्यांमध्ये तिने आधीच व्याजाची रक्कम वर्ग केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रामेश्वर तेली यांनी ईपीएफओ च्या 71 व्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. इम्फाल, इटानगर, आयझॉल, दिमापूर आणि गंगटोक येथील विशेष राज्य कार्यालयांद्वारे ईशान्येकडील राज्यांमधील सदस्य आणि वृद्ध निवृत्तीवेतनधारकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी ईपीएफओ ने घेतलेल्या पुढाकारांची त्यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, राज्यमंत्र्यांनी राज्य रूपरेषा पुस्तिका 2023, स्थापना ई-अहवाल आणि 50 महत्वाच्या निर्णयांचा संग्रह आणि कम्युनिकेशन फ्रेमवर्क दस्तऐवज, ऑडिट मॅन्युअल, रिकव्हरी मॅन्युअल आणि सूट मॅन्युअलच्या दुसऱ्या आवृत्तीचे अनावरण केले.
मिशन कर्मयोगी @ EPFO प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण या विषयावर ईपीएफओ च्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा प्रासंगिक प्रवास दाखवणारा चित्रपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमात विविध कार्यालये आणि आस्थापनांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973914)
Visitor Counter : 122