आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आग्नेय आशियासाठी जागतिक आरोग्य संघटना क्षेत्रीय समितीच्या 76 व्या सत्रात मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत डॉ. भारती प्रवीण पवार यांचे संबोधन
Posted On:
31 OCT 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2023
"प्राथमिक आरोग्य सेवेतील (पीएचसी) गुंतवणूक हा सार्वत्रिक आरोग्य सुविधा प्राप्तीचा सर्वात सर्वसमावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग आहे" असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्लीत आग्नेय आशियासाठी जागतिक आरोग्य संघटना क्षेत्रीय समितीच्या 76 व्या सत्रात मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत केले. सार्वत्रिक आरोग्य सेवा साध्य करण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याबाबतच्या दिल्ली जाहीरनाम्यावरही या बैठकीत स्वाक्षरी करण्यात आली.
डब्ल्यूएचओ एसईएआरओ (आग्नेय आशियाचे प्रादेशिक कार्यालय) चे संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह, मालदीवचे आरग्यमंत्री अहमद नसीम; तिमोर लेस्टे च्या आरोग्यमंत्री डॉ. एलिया अँटोनियो डी अरौजो डॉस रीस अमराल; श्रीलंकेच्या आरोग्य मंत्री डॉ. सीता अरम्बेपोला, नेपाळचे आरोग्य मंत्री मोहन बहादूर बस्नेत, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया चे भारताचे राजदूत चोए हुई चोल, बांगलादेश चे आरोग्यमंत्री झाहिद मलेक; इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य महासंचालक डॉ. पोंगसाडॉर्न पोकपर्म्डी, डॉ. स्यारिफाह लिझा मुनिरा; भूतान च्या आरोग्य मंत्रालयाचे कार्यवाहक सचिव पेम्बा वांगचुक आणि थायलंड च्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. विरोज तांगचारोएनसाथियन देखील यावेळी उपस्थित होते.
मा.पंतप्रधानांच्या सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या "अंत्योदय" तत्वाचा पुनरुच्चार करून डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की जी 20 मधील भारताच्या अध्यक्षतेने लोकांना सज्जतेच्या केंद्रस्थानी ठेवून आणि त्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी तयार करून राष्ट्रीय आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. भारताची बळकट आरोग्य व्यवस्था "संपूर्ण सरकार" आणि "संपूर्ण समाज" दृष्टिकोनावर अवलंबून आहे. प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करून अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि आरोग्य प्रणालींना महामारी पूर्वीच्या स्तरापर्यंत सुधारणे या उद्दिष्टासह सार्वत्रिक आरोग्य सुविधा (युएचसी) साध्य करण्यात यामुळे मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतातील महत्त्वपूर्ण सुधारणांच्या प्रभावावर बोलताना, डॉ. भारती म्हणाल्या, “1.61 लाखाहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे (AB-HWCs) निरंतर सेवा दृष्टिकोनातून जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना मोफत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात परिवर्तनकारी ठरत आहेत. यामुळे अधिकाधिक लोकांना सेवा मिळून खिशाला न परवडणारा खर्च कमी होतो तसेच जोखीम कमी होऊन उच्च स्तरावरील सुविधा सुलभ होतात, अशा प्रकारे सर्व स्तरांवर सेवा गुणवत्ता सुधारते असे त्यांनी नमूद केले.
डॉ. पूनम यांनी आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रात भारतात प्राथमिक स्तरावर पुरविल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक आरोग्य सेवांचे कौतुक केले. "प्रतिबंधात्मक सेवांसह पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या तरतुदीमुळे मी थक्क झाले." सामुदायिक आरोग्य अधिकारी केडरची नेमणूक ही एक अतिशय चांगले पाऊल असून "आम्हाला अशा प्रकारे मार्गक्रमण करण्याची गरज आहे" असे सांगून 'आजारापासून निरामयतेकडे' संक्रमणाची त्यांनी प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला वरिष्ठ सरकारी अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन चे प्रा. अॅन मिल्स उपस्थित होते.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973576)
Visitor Counter : 124