युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या अमृत कलश यात्रा समारोपाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान देशभरातील हजारो अमृतकलशयात्रींना करणार संबोधित, युवांसाठी 'मेरा युवा भारत' (माय भारत )मंचाचा पंतप्रधान करणार प्रारंभ
‘मेरी माटी मेरा देश’ समारोप सोहळ्यातल्या कर्तव्य पथावरील कार्यक्रमात सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश उत्साहात सहभागी
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला देशातल्या युवावर्गाकडून बळ : अनुराग सिंह ठाकूर
Posted On:
30 OCT 2023 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कर्तव्य पथ येथे ‘ मेरी माटी मेरा देश’ मोहिमेच्या अमृत कलश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप समारंभही या कार्यक्रमात होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान अमृतवाटिका आणि अमृतमहोत्सव स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून आलेल्या हजारो अमृतकलशयात्रींना ते संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमामध्येच पंतप्रधान देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत’ (माय भारत)या मंचाचा शुभारंभ करणार आहेत.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला मूर्त रूप देणाऱ्या ‘मेरी माटी मेरा देश’ च्या समारोप कार्यक्रमात देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी उत्साहाने सहभाग घेतल्याचे दिसून आले. देशातील 766 जिल्ह्यांतील 7000 तालुक्यांमधील 25,000 हून अधिक अमृतकलश घेऊन येणारे यात्रेकरू देशभक्तीपर गीते आणि सुंदर सांस्कृतिक नृत्य सादर करीत कर्तव्यपथ/विजय चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाले. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींनी त्यांच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अमृत कलशामधून आणलेली तिथली माती आणि तांदूळ एका विशाल अमृत कलशमध्ये घालण्यात आले. आपल्या महान राष्ट्राच्या बहुविधेतेला एकतेचे मूर्त रूप यामुळे मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर या अमृत कलश यात्रेच्या उत्सवात सहभागी झाले. त्यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ च्या अमृतकलशमध्ये सर्व माती ओतली. यावेळी अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले. त्याअंतर्गत लाखो कार्यक्रम आयोजित केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश” कार्यक्रमात लोकसहभागाचे आवाहन केले आणि भारतातील सहा लाख गावांमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात आल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून माती गोळा करण्यात आली. ते पुढे म्हणाले की आज कर्तव्य पथावर जमलेला हा लोकांचा महासागर, देशाची माती आणि हुतात्म्यांना अभिवादन करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशातील तरुण वर्ग ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला मजबूत करत आहे असे देखील त्यांनी सांगितले. देशातील तरुण आपल्या मातीशी जोडून घेण्याचा आणि भारत विकसित देश व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करत आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.
राष्ट्रव्यापी अमृत कलश यात्रा साजरी करण्यासाठी आजच्या दिवसभरात आयोजित कार्यक्रमांमध्ये देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिक अतुलनीय उत्साहाने सहभागी झाले. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलातील आपल्या शूर सैनिकांनी सादर केलेल्या बँडचा देखील या कार्यक्रमात समावेश होता.
मेरी माटी मेरा देश अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान म्हणजे देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीरांना आणि वीरांगनांना वाहिलेली आदरांजली आहे. या अभियानामध्ये लोकसहभागाच्या प्रेरणेतून, पंचायत/गाव, तालुका , शहरी स्थानिक संस्था, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देशभरात आयोजित करण्यात आलेले अनेक उपक्रम आणि उत्सवांचा समावेश करण्यात आला होता.
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’चा सांगता समारंभ म्हणून ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान संकल्पित करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 12 मार्च 2021 पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवादरम्यान, उत्साहपूर्ण लोकसहभागासह आतापर्यंत देशभरात दोन लाखांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
माय भारत
देशभरातील युवकांसाठी एकाच ठिकाणी संपूर्णतः सरकारी कार्याचा मंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ‘मेरा युवा भारत’ (माय भारत) ही स्वायत्त संस्था उभारण्यात येत आहे. देशातील प्रत्येक युवकाला न्याय्य संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार कार्य करत,‘माय भार’त संस्था सरकारच्या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापर करेल जेणेकरून युवक त्यांच्या आकांक्षा साकारू शकतील आणि ते ‘विकसित भारता’च्या उभारणीत योगदान देऊ शकतील. देशातील युवकांना सामाजिक बदलाचे तसेच राष्ट्र उभारणीचे पाईक होण्याची प्रेरणा देणे आणि त्यांना सरकार तसेच नागरिक यांच्या दरम्यानचा ‘युवा सेतू’ म्हणून कार्य करण्यास सक्षम करणे हा माय भारत मंचाचा उद्देश आहे. या अर्थाने, ‘माय भारत’ हा मंच, देशातील युवकांच्या नेतृत्वाखालील विकासा’ला मोठी चालना देणारा ठरेल.
S.Kakade/Suvarna/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973152)
Visitor Counter : 127