सांस्कृतिक मंत्रालय
'मेरी माटी मेरा देश' अभियानाच्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी राष्ट्रीय राजधानीत दाखल
Posted On:
29 OCT 2023 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्लीतील कर्तव्य पथ / विजय चौक येथे 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमाच्या दोन दिवसीय समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी, 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी विशेष समर्पित रेल्वे बस आणि स्थानिक वाहतूक अशा विविध प्रकारच्या वाहतुकीद्वारे राष्ट्रीय राजधानीत पोहोचत आहेत. हे अमृत कलश यात्री गुडगावमधील धनचिरी कॅम्प आणि दिल्लीतील राधा सोमी सत्संग ब्यास कॅम्प या दोन शिबिरांमध्ये मुक्काम करणार आहेत.
मेरी माटी मेरा देश अभियानाच्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी गोव्यातील प्रतिनिधी अमृतकलश घेऊन दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचले आहेत.
मेरी माटी मेरा देश अभियानाच्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी अमृत कलशासह महाराष्ट्राचे प्रतिनिधीमंडळ नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहे.
उद्या, म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी “मेरी माटी मेरा देश” या अभियानावर दिवसभराचा एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सहभागी औपचारिक पोशाखात संचलन करतील. हे सहभागी क्षेत्रनिहाय तुकड्यांमध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचतील. यावेळी देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक नृत्य सादरीकरणाचा राज्यनिहाय कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी मंचावर येतील आणि त्यांच्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील अमृत कलशातून आणलेली माती आणि तांदूळाची साळ एका विशाल अमृत कलशामध्ये ओततील. यातून कर्तव्य पथावर एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेची प्रतिती येईल. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि रात्री उशिरापर्यंत चालेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर 2023 रोजी विजय चौक / कर्तव्य पथ येथे मेरी माटी मेरा देश मोहिमेच्या समारोप समारंभाला संबोधित करतील. हा कार्यक्रम मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अमृत कलश यात्रेची सांगता असेल. या कार्यक्रमाला 766 जिल्ह्यातील 7000 हून अधिक तालुक्यातून अमृत कलश यात्री उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात 'मेरा युवा भारत' (MY Bharat) या स्वायत्त संस्थाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सरकारचे लक्ष युवकांच्या नेतृत्वाखालील विकासावर केंद्रित करण्यात आणि युवकांना विकासाचे "सक्रिय चालक" बनविण्यात ही स्वायत्त संस्था मदत करेल.
31 ऑक्टोबर रोजी 'एकता दौड ' आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. 'मेरी माटी मेरा देश' कार्यक्रम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल, असेही ठाकूर यांनी सांगितले. याच दिवशी, मेरा युवा भारत पोर्टलचा देखील प्रारंभ केला जाईल. हे पोर्टल देशातील तरुणांना एक व्यासपीठ प्रदान करेल ज्या मार्फत हे तरुण राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतील, असेही ठाकूर यांनी सांगितले.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972892)
Visitor Counter : 151