आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 26 कोटी आयुष्मान कार्डांची निर्मिती
आयुष्मान अॅपचा 13 सप्टेंबर 2023 ला प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत 26 लाखहून अधिक वेळा डाउनलोड
Posted On:
20 OCT 2023 4:55PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) ने 19 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात 26 कोटी आयुष्मान कार्ड्सचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेली प्रमुख योजना 12 कोटी लाभार्थी कुटुंबांना दुय्यम आणि तृतीयक काळजी रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डांची निर्मिती हा सर्वात मूलभूत उपक्रम आहे आणि योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असावे, याची सुनिश्चिती करण्यासाठी सातत्याने ठोस प्रयत्न केले जात आहेत. भारत सरकारच्या आरोग्य योजना सर्वांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भव मोहिमेतील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी मोहीम सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या माहिती तंत्रज्ञान मंचावर 1.5 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड विनंत्या यशस्वीरित्या प्राप्त झाल्या आहेत. ऑक्टोबर 2023 महिन्यात, 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत 86 लाख आयुष्मान कार्डस तयार करण्यात आली आहेत.
अति दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या लोकांपर्यंत व्याप्ती पोहोचण्यासाठी साठी , प्राधिकरणाने आयुष्मान कार्ड निर्मितीकरिता ‘आयुष्मान अॅपचा' प्रारंभ केला आहे. अॅपमध्ये सेल्फ-व्हेरिफिकेशनचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कार्ड निर्मिती केंद्राला भेट न देता सोप्या 4 टप्प्यांमध्ये, हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना आयुष्मान कार्ड तयार होण्यास सक्षम करते. याखेरीज कोणतीही व्यक्ती लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी मदत करू शकते. अशा प्रकारे, आयुष्मान अॅप जन भागिदारीला बळकटी देते. दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी अॅपचा प्रारंभ झाल्यापासून ते 26 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. यावरून या अॅप्लिकेशनचे यश दिसून येते.
आयुष्मान कार्ड आता समानता, हक्क आणि सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे. गरीब आणि वंचित कुटुंबाला आजार आणि त्याच्या उपचारांसाठी होणाऱ्या आकस्मिक खर्चाच्या दुहेरी संकटाच्या परिणामांपासून संरक्षणाचे कवच पुरवण्याची हमी हे कार्ड देते. ही वस्तुस्थिती अधोरेखित करून, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असावे, या सुनिश्चितीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
सर्वाधिक 4 कोटी आयुष्मान कार्डसह, उत्तर प्रदेश राज्यांच्या यादीत अव्वल आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अनुक्रमे 3.69 कोटी आणि 2.04 कोटी आयुष्मान कार्डांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवाय, 49% आयुष्मान कार्डधारक महिला लाभार्थीं आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5.7 कोटी व्यक्तींना 70,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रुग्णालय प्रवेश शक्य झाले आहेत. अशा प्रकारे, गरीब आणि वंचित कुटुंबांच्या 1 लाख कोटींहून अधिक खर्चाची बचत शक्य झाली आहे.
योजनेबद्दल अधिक तपशीलवार अद्यतने येथे उपलब्ध आहेत: https://dashboard.pmjay.gov.in/pmj/#/
***
G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969479)
Visitor Counter : 263