राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी चित्रपट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
17 OCT 2023 8:37PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 ऑक्टोबर, 2023) नवी दिल्ली येथे विविध श्रेणींमध्ये 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले. त्यांनी वहिदा रेहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देखील प्रदान केला.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल वहिदा रेहमान यांचे अभिनंदन केले . वहिदा रेहमान आपल्या कला आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करत चित्रपटसृष्टीमध्ये शिखरावर पोहोचल्या असे त्या म्हणाल्या. त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यात त्यांच्या भूमिकांनी विशेषत: स्त्रियांशी संबंधित अनेक बंधने तोडली होती . महिला सक्षमीकरणासाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा, असा आदर्श वहीदाजींनी घालून दिला असे राष्ट्रपती म्हणाल्या.
सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार मिळालेल्या पल्लवी जोशी, आलिया भट्ट आणि क्रिती सॅनॉन या अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटांमध्ये सशक्त स्त्री पात्रांच्या भूमिका साकारल्या आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. दिग्दर्शिका सृष्टी लाखेरा यांनी ‘एक था गाव’ या त्यांच्या पुरस्कार विजेत्या चित्रपटात एका 80 वर्षांच्या महिलेच्या लढाऊ वृत्तीचे चित्रण केले आहे हे पाहून आनंद झाल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. स्त्री पात्रांच्या सहानुभूतीपूर्ण आणि कलात्मक चित्रणामुळे समाजात महिलांबद्दल संवेदनशीलता आणि आदर वाढेल, असे त्या म्हणाल्या.
या वर्षी पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांमध्ये हवामान बदल, मुलींची तस्करी, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि सामाजिक शोषण यांसारख्या समस्यांचे चित्रण करण्यात आले आहे हे पाहून राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. आदिवासी समाजाचे निसर्ग आणि कलेवरील प्रेम, महात्मा गांधींच्या आदर्शांची स्थापना, प्रतिकूल परिस्थितीतही दुर्दम्य भावनेने दिलेला लढा, शिक्षणातील परिवर्तनशील सामर्थ्य आणि कला-संस्कृती क्षेत्रातील विशेष कामगिरी अशा विविध विषयांवर उत्तम चित्रपट तयार झाले आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
चित्रपट हा केवळ उद्योग नाही. ते केवळ व्यवसाय आणि मनोरंजनापुरता मर्यादित नाहीत . जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी चित्रपट हे सर्वात प्रभावी माध्यम आहेत. अर्थपूर्ण चित्रपटांमध्ये उपलब्धी तसेच समाज आणि देशाच्या समस्यांचे चित्रण केले जाते असे त्यांनी सांगितले.
चित्रपट उद्योग आपल्याला त्यांच्या चित्रपटांद्वारे भारतीय समाजातील वैविध्यपूर्ण वास्तवाचा ज्वलंत परिचय करून देतो. सिनेमा हा आपल्या समाजाचा दस्तऐवज आहे आणि समाज सुधारण्याचे माध्यम आहे, असे राष्टपती म्हणाल्या. सिनेमातील कलाकार बदलाचे प्रतिनिधी आहेत असे सांगत ते देशाबद्दल माहिती देतात आणि नागरिकांना त्याच्याशी जोडतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींनी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांशी संबंधित सर्व लोकांचे ,समाज आणि चित्रपटसृष्टीत प्रभावी योगदान दिल्याबद्दल कौतुक केले.भारतासारख्या प्रतिभासंपन्न देशात, चित्रपटक्षेत्राशी संबंधित व्यक्ती जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेचे नवे मापदंड यापुढेही निर्माण करत राहतील आणि त्यांनी निर्माण केलेले चित्रपट विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968602)