गृह मंत्रालय
शीख समुदायासाठी मोदी सरकारने केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले संबोधित
देश आणि मानवता यासाठी शीख गुरूंनी दिलेले बलिदान अतुलनीय -अमित शाह
गुरू तेग बहादूर जी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या हौतात्म्यस्थळी उत्सव साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला
राजकीय हेतूने निर्घृण हत्याकांड झालेल्या 1984 च्या दंगली कुठलीही सुसंस्कृत व्यक्ती विसरू शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष तपास पथक स्थापन करून 300 प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू केल्याने दोषींना तुरुंगवास
इतक्या वर्षांनंतर प्रथमच पीडितांच्या 3,328 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये पंतप्रधान मोदी यांच्यामुळे प्राप्त होऊ शकले -अमित शाह
Posted On:
13 OCT 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2023
शीख समुदायासाठी मोदी सरकारने केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केले.
आक्रमकांच्या जुलूमाविरुद्ध 10 पिढ्यांपासून संघर्ष आणि बलिदानाची प्रदीर्घ परंपरा असलेला शीख समाजाव्यतिरिक्त क्वचितच दुसरा कुठला समाज असेल, असे शाह यावेळी म्हणाले. मानवतेसाठी आणि देशासाठी शीख गुरूंनी दिलेल्या बलिदानाची बरोबरी जगात कोणीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. शिखांचे नववे गुरु तेग बहादूर जी यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. काश्मीरमध्ये औरंगजेबाच्या अत्याचाराचा सामना करणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या विनंतीवरून गुरु तेग बहादूर जी तिथे गेले आणि त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जेव्हा जगातील प्रत्येक धर्म आपापल्या विचारांसाठी लढत होता, तेव्हा गुरु नानक देवजींपासून ते दहाव्या गुरुंपर्यंत सर्वांनी जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला, ज्याचे संपूर्ण जग आजवर पालन करत आहे, आणि त्याचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. ते म्हणाले की, शीख समाजाने धर्म आणि काम दोन्हींचा मेळ साधून पुढे मार्गक्रमण केले आहे. ते म्हणाले की जेव्हा धर्मासाठी प्राण अर्पण करण्याची वेळ येते, तेव्हा खरा शीख कधीही मागे वळून पाहत नाही आणि शिखांनी स्वातंत्र्यापासून आजवर देशाच्या रक्षणासाठी सर्वाधिक बलिदान दिले आहे. शीख गुरूंची शिकवण आणि त्यागाचे देशाला कधीही विस्मरण होणार नाही, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांमध्ये गुरु तेग बहादूर जी यांचे 400 वे प्रकाश पर्व, गुरु नानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व, गुरु गोविंद सिंग जी यांचे 350 वे प्रकाश पर्व, लंगरवरील जीएसटी माफ करणे, करतारपूर साहिब कॉरिडॉर बांधणे, सुलतानपूर लोधी हे हेरिटेज सिटी म्हणून घोषित करणे, ब्रिटीश विद्यापीठात गुरू नानक देव जी यांच्या नावाने जागेची स्थापना करणे आणि शीख यात्रेकरूंना पाकिस्तानात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, यासारखे अनेक महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले. ते म्हणाले की 1984 च्या दंगली कोणीही सुसंस्कृत व्यक्ती विसरू शकत नाही, आणि त्या निर्घृण हत्या राजकीय हेतूने प्रेरित होत्या.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन होईपर्यंत कोणालाही अटक झाली नाही आणि कोणाला एक दिवसाचाही तुरुंगवास झाला नाही. ते म्हणाले की, चौकशी आयोग स्थापन करण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडून कोणताही ठोस निकाल प्राप्त झाला नाही. शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसआयटी स्थापन करून 300 प्रकरणे पुन्हा उघडली, ज्यामुळे दोषींना तुरुंगवासाची शिक्षा झाली. ते म्हणाले की या प्रकरणांची सुनावणी अजूनही सुरू आहे, आणि मोदी सरकार पीडितांना न्याय मिळवून देईल. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनीच पीडितांच्या 3,328 कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली, आणि जालियानवाला बाग स्मारकाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारी देशांमधील अत्याचारग्रस्त शीख भगिनी आणि बांधवांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ अंतर्गत नागरिकत्व देण्याचा मार्ग मोदी सरकारने खुला केला.
* * *
R.Aghor/Sonali K/Rajshree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967523)
Visitor Counter : 126