पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कौशल्य दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशांद्वारे दिलेले भाषण

Posted On: 12 OCT 2023 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑक्‍टोबर 2023

 

नमस्कार, 

कौशल्य विकासाचा हा उत्सव खरोखरच अनोखा आहे. संपूर्ण देशात कौशल्य विकासाशी संबंधित संस्थांचा असा एकत्रित कौशल्य दिक्षांत सोहळा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आजच्या भारताच्या प्राधान्यक्रमाचा दर्शक देखील आहे. देशातील हजारो युवक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. सर्व युवकांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. 

माझ्या युवक मित्रांनो,

प्रत्येक देशाकडे वेगवेगळ्या प्रकारचे सामर्थ्य असते, जसे की, प्राकृतिक संसाधने, खनिज संपत्ती किंवा लांबच लांब समुद्र किनारे. मात्र या सामर्थ्याचा उपयोग करून घेण्यासाठी एका महत्त्वपूर्ण शक्तीची गरज असते, ती म्हणजे युवा शक्ती. आणि ही युवा शक्ती जितकी सशक्त असते तितकाच देशाचा विकास होतो, देशाच्या संसाधनांचा न्याय वापर होतो. याच विचार प्रणालीनुसार भारत आपल्या युवा शक्तीचे सशक्तीकरण करत आहे, संपूर्ण परिसंस्थेत अभूतपूर्व सुधारणा घडवत आहे. यात देखील देशाचा दुहेरी दृष्टिकोन आहे. आम्ही आपल्या युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण याद्वारे नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहोत. जवळपास 4 दशकांनंतर आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणत आहोत. आम्ही मोठ्या संख्येने वैद्यकीय महाविद्यालये, भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था उघडल्या आहेत. करोडो युवकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे, आम्ही नोकरी देणाऱ्या पारंपरिक क्षेत्रांना देखील बळकट करत आहोत. आम्ही रोजगार आणि नवउद्योजकतेला चालना देणाऱ्या नव्या क्षेत्रांना देखील प्रोत्साहन देत आहोत. आज भारत माल निर्यात, मोबाईल निर्यात, इलेक्ट्रॉनिक्स निर्यात, सेवा निर्यात, संरक्षण उत्पादन निर्यात आणि उत्पादनात क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. आणि सोबतच, अंतराळ, स्टार्ट अप्स, ड्रोन, ॲनिमेशन, इलेक्ट्रिक वाहने, सेमी कंडक्टर यासारख्या अनेक क्षेत्रात तुमच्यासारख्या युवकांसाठी भारत मोठ्या संख्येने नव्या संधी देखील निर्माण करत आहे.

मित्रांनो,

हे शतक भारताचे शतक असणार आहे हे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आणि या मागचे मुख्य कारण म्हणजे भारताची युवा लोकसंख्या हेच आहे. जेव्हा जगातील इतर देशात जेष्ठ नागरिकांची लोकसंख्या वाढत आहे तेव्हा भारत दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे. भारतासाठी ही खूप फायदेशीर बाब आहे. संपूर्ण जग भारताकडून कौशल्य प्रशिक्षित युवकांची अपेक्षा बाळगून आहे. नुकत्याच पार पडलेल्या जी -20 शिखर परिषदेत जागतिक कौशल्य मानचित्रणाचा भारताच्या प्रस्तावाचा स्विकार करण्यात आला आहे. यामुळे तुमच्या सारख्या युवकांसाठी येणाऱ्या काळात उत्तम संधी निर्माण होतील. देश आणि जगभरात निर्माण होत असलेली कोणतीही संधी आपल्याला गमवायची नाही. भारत सरकार तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक गरजेच्या वेळी तुमच्या बरोबर आहे. आपल्या इथे पूर्वीच्या सरकारच्या काळात कौशल्य विकासावर म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. आमच्या सरकारने कौशल्याचे महत्व जाणले आणि त्यासाठी वेगळे मंत्रालय स्थापित केले, वेगळा अर्थ संकल्प जाहीर केला. भारत आपल्या युवकांच्या कौशल्यावर जितकी गुंतवणूक करत आहे तितकी आजवर कधीच करण्यात आली नव्हती. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेने युवकांना भू पातळीवर खूप मोठी शक्ती प्रदान केली आहे. या योजनेअंतर्गत आजवर सुमारे दिड कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता तर औद्योगिक समुहांच्या आसपासच्या परिसरातच नवी कौशल्य केंद्र स्थापित करण्यात येत आहेत. यामुळे उद्योग आपल्या गरजा कौशल्य विकास संस्थांबरोबर सामायिक करू शकतील. आणि त्यानुसार मग युवकांमध्ये आवश्यक कौशल्य संच विकसित करुन त्यांना रोजगार मिळवून दिला जाईल. 

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण हे जाणता की, आता तो काळ राहीला नाही जेव्हा एक कौशल्य आत्मसात केले तर संपूर्ण आयुष्य आपण त्यांच्या आधाराने काढू शकू. आता कौशल्य आत्मसात करणे, वेळोवेळी नवीन कौशल्य प्रशिक्षण घेणे आणि पूर्वी शिकलेल्या कौशल्यांचा ठराविक काळानंतर उजाळा देत राहणे या प्रणालीचे अनुसरण आपण सर्वांनीच करणे गरजेचे आहे. मागणी प्रचंड वेगाने बदलत आहे, कामाचे स्वरूप बदलत आहे. त्यानुसार आपण वेळोवेळी आपल्या कौशल्यांना देखील अद्ययावत करत राहिले पाहिजे. म्हणूनच उद्योग, संशोधन आणि कौशल्य विकास संस्थांनी काळानुरूप आपल्यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कोणत्या कौशल्यात नाविन्य आले आहे, कोणाची गरज कशा प्रकारची आहे, पूर्वी यावरही फारसे लक्ष दिले जात नव्हते. आता ही परिस्थिती बदलली जात आहे. मागच्या 9 वर्षात देशात सुमारे 5 हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश क्षमता 4 लाखाहून अधिकने वाढली आहे. या संस्थांना आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रुपात अद्ययावत करण्यात येत आहे. या संस्थांमध्ये सर्वोत्तम उपायांसह कार्यक्षम आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण देता यावे हाच यामागचा मुख्य हेतू आहे.

मित्रांनो, 

भारतात कौशल्य विकासाची कक्षा सतत रुंदावत चालली आहे. आपण केवळ मेकॅनिक, अभियंते, तंत्रज्ञान किंवा इतर कोणती सेवा इथेपर्यंतच मर्यादित राहू शकत नाही. आता ज्याप्रमाणे स्त्रियांशी संबंधित बचतगट आहेत. आता ड्रोन तंत्रज्ञानासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले जाते आहे. याचप्रमाणे आपल्या विश्वकर्मा मित्रांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे मित्र आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत. यांच्याशिवाय आपले कोणतेही काम पूर्ण होणार नाही. मात्र परंपरागत रुपाने आपल्या वडिलधाऱ्यांकडून जे ज्ञान हे प्राप्त करतात, त्यावरच आपले काम सुरू ठेवतात. आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्यांच्या या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची जोड दिली जात आहे. 

माझ्या युवक मित्रांनो,

जसजसा भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो आहे, तुमच्या सारख्या युवकांसाठी नव्या शक्यता निर्माण होत आहेत. भारत रोजगार निर्मिती एका नव्या उंचीवर पोहोचला असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतात बेरोजगारीचा दर गेल्या सहा वर्षात सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. मी हे बेरोजगारी बाबत बोलत आहे. भारताच्या ग्रामीण आणि शहरी या दोन्ही क्षेत्रात बेरोजगारी जलद गतीने कमी होत आहे. याचाच अर्थ असा आहे की विकासाचा लाभ छोटी गावे आणि शहरे या दोन्ही ठिकाणी समप्रमाणात पोहोचत आहे. यावरून हे देखील लक्षात येते की, छोटी गावे आणि शहरे, या दोन्ही ठिकाणी नव्या संधी देखील समान रूपाने वाढत आहे. या सर्वेक्षणाची आणखीन एक विशेष बाब आहे. भारताच्या कर्मचारी संख्येत महिलांच्या भागीदारीमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. गेल्या काही वर्षात भारतामध्ये महिला सशक्ति करण्यासाठी ज्या योजना राबवण्यात आल्या जे  अभियान चालवण्यात आली त्यांच्या प्रभावामुळेच हे शक्य झाले आहे. 

मित्रांनो,

आंतरराष्ट्रीय संस्था आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने जे आकडे प्रकाशित केले आहेत ते देखील तुम्हा सर्व युवकांचा उत्साह वाढवणारे आहेत. भारत येणाऱ्या वर्षांमध्ये देखील जलद गतीने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनून राहील असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने म्हटले आहे. मी भारताला जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्याची हमी दिल्याचे तुम्हाला आठवत असेलच. भारत येत्या तीन-चार वर्षात जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थेमध्ये सामील होईल याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला देखील पूर्ण विश्वास आहे. म्हणजेच तुमच्यासाठी नव्या संधी निर्माण होतील. तुम्हाला रोजगार आणि स्वरोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळतील.

मित्रांनो,

तुमच्यासमोर अनेकानेक संधी आहेत. आपल्याला भारताला जगातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाचे सर्वात मोठे शक्तिस्थान बनवायचे आहे. आपल्याला जगाला चाणाक्ष आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे. शिकण्याचा शिकवण्याचा आणि प्रगती करण्याची ही मालिका अशीच पुढे चालत राहो. तुम्हाला जीवनात प्रत्येक पावलावर यश मिळत राहो. हीच माझी शुभेच्छा आहे. तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देत मी तुमचे हृदयापासून आभार मानत आहे.

 

* * *

NM/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1967381) Visitor Counter : 128